Report in Sputnik India: मोसादचा ‘तो’ अहवाल अन् रशियन प्रोपगंडा!

Report in Sputnik India

‘स्पुटनिक इंडिया’त एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी म्हणजे मोठाच गौप्यस्फोट होता. भारतातील काँग्रेस पक्ष, त्याचे नेते राहुल गांधी यांच्यावर टाकलेला तो आरोपांचा बॉम्ब होता. पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास ‘स्पुटनिक इंडिया’च्या संकेतस्थळावरून तो फोडण्यात आला. (Report in Sputnik India)

-रवि आमले

‘मोसादने कशी केली अदानींच्या शत्रूंचा पर्दाफाश करण्यास मदत’

‘हाऊ मोसाद हेल्प्ड् एक्स्पोज एनिमीज ऑफ अदानी’

‘स्पुटनिक इंडिया’च्या बातमीचा हा मथळा. ही बातमी म्हणजे मोठाच गौप्यस्फोट होता. भारतातील काँग्रेस पक्ष, त्याचे नेते राहुल गांधी यांच्यावर टाकलेला तो आरोपांचा बॉम्ब होता. पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी ६.५६ वाजता ‘स्पुटनिक इंडिया’च्या संकेतस्थळावरून तो फोडण्यात आला. (Report in Sputnik India)

‘स्पुटनिक’च्या धैर्य माहेश्वरी नामक वार्ताहराने दिलेली ती बातमी मोठीच खळबळजनक होती. ती सांगत होती, की काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे किती ‘देशद्रोही’ आहेत. ते कसे मोदी आणि अदानी यांच्याविरोधात ‘कटकारस्थाने’ करीत आहेत. बरे, ते यात एकटेच नाहीत. आपल्याकडील हिंदुत्त्ववादी नेते आणि पत्रकार आणि जल्पक हे सातत्याने ज्यांची ज्यांची नावे घेत असतात, त्या सगळ्यांच्या साथीने राहुल हे अदानींविरोधात काम करीत आहेत. म्हणजे त्यात आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनातील महत्त्वाचे नेते आणि अमेरिकेतील ‘डीप स्टेट’. हे ‘डीप स्टेट’ म्हणजे अमेरिकेतील बडे उद्योजक, झालेच तर सीआयए, एफबीआय आदी गुप्तचरसंस्थांतील काही गुप्तचर यांची गुप्तसंस्था. आणि अर्थातच जॉर्ज सोरोस. त्यांचे नाव घेतल्याशिवाय आज कोणतीही कटकाल्पनिका सफळ-संपूर्ण होऊच शकत नाही. तर अशा सर्वांना सोबत घेऊन या राहुल गांधी यांनी काय केले, तर त्यांनी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या गुंतवणूक सल्लागार कंपनीच्या लोकांच्या साह्याने मोठे षड्‌यंत्र रचले. आणि मग त्यातून आला अदानींच्या विरोधातील तो सुप्रसिद्ध हिंडेनबर्ग अहवाल. (Report in Sputnik India)

ही बातमी प्रसिद्ध होताच, लागलीच आपल्याकडील माध्यमांनी ती उचलली. त्यावरून त्यांचा त्यांचा येळकोट सुरू झाला. आता यावर आपल्या दोनच प्रतिक्रिया असू शकतात. एक म्हणजे ज्यांना आपण बालिश म्हणत होतो ते राहुल गांधी हे फार हुशार नेते आहेत. एवढे, की अत्यंत चलाखीने ते  कटकारस्थान करू शकतात, असे म्हणायचे. किंवा मग विचारायचे, की या आरोपांस पुरावा काय? की काय नेहमीप्रमाणेच हीसुद्धा एक ‘फेक न्यूज’ आहे? हे जाणण्यासाठी प्रथम ‘स्पुटनिक इंडिया’ने नेमके काय म्हटले आहे ते पाहणे आवश्यक ठरते.

० ० ० ००००

या बातमीच्या मुळाशी आहे हिंडेनबर्ग अहवाल. ही अमेरिकेतील एक गुंतवणूक सल्लागार कंपनी. तिने २४ जानेवारी २०२३ रोजी अदानींविरोधात एक अहवाल जाहीर केला. तो अहवाल म्हणजे अदानींवरील आरोपपत्रच होते. अदानी समूहाने केलेली फसवाफसवी त्यात तपशीलवार उघड करण्यात आली होती. या अहवालाने जगभर खळबळ माजली. अदानींचे समभाग गडगडले. त्यांना अब्जावधी रूपयांचा तोटा झाला. विरोधी पक्षांनी – त्यात राहुल गांधी हे आघाडीवर होते – या प्रकरणावरून मोदी सरकारला घेरले. संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशीची मागणी केली. मोदी ती मान्य करणे अशक्यच. उलट अदानींना राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र देत अवघी जल्पकसेना त्यांच्या पाठीशी उभी करण्यात आली. अदानी-अंकित माध्यमांच्या तर अंगात आले. सर्वांनी मिळून राहुल गांधी यांना घेरले. आणि आता या सर्व पार्श्वभूमीवर ‘स्पुटनिक’चे हे आरोपवृत्त आले.

या बातमीचे सार असे, की अदानींनी इस्रायली कंपनीशी करार करून तेथील हैफा बंदराचे अधिग्रहण केले. हा १.२ बिलियन डॉलरचा करार होण्याच्या काही आठवडे आधी हिंडेनबर्गचा अहवाल आला. त्या करारासाठी जी बैठक झाली, त्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू उपस्थित होते. ते गौतम अदानींना म्हणाले, ‘हा अहवाल… तुमच्या व्यवसायासाठी अत्यंत धोकादायक आहे तो. हो ना?’ त्यावर अदानी उत्तरले, ‘अजिबात नाही. तो पूर्णतः खोटा आहे.’ नेतान्याहू म्हणाले, ‘हो. आम्हाला वाटलेच, की तो बनावट आहे. पण तुम्हाला जरी तो धोकादायक वाटत नसला, तरी आम्हाला काळजी करायलाच हवी. त्याने तुमचे बळ कमी झाले, तर त्यामुळे केवळ हा बंदराचा व्यवहारच कोलमडणार नाही, तर आम्ही भारताबरोबर जे जे उभारले आहे ते सर्व कोसळून पडेल.’ यानंतर नेत्यानाहूंनी अदानींना आश्वस्त केले, की ‘इस्रायल आपल्या मित्रांचे संरक्षण करतो. आम्ही यात नीट काळजीपूर्वक लक्ष घालू.’ एवढेच नव्हे, तर नेतान्याहू यांनी हिंडेनबर्ग अहवाल हा इस्रायलवरचा ‘अप्रत्यक्ष हल्ला’ आहे, असेही म्हटले. अदानींवरील आरोप हा इस्रायलवरचा अप्रत्यक्ष हल्ला वाटला नेतान्याहूंना! (Report in Sputnik India)

‘स्पुटनिक’च्या बातमीतच हे सर्व संवाद आहेत. आता हे त्या बातमीदाराला कोणी सांगितले? तर सूत्रांनी. या सूत्रांनी हेही सांगितले, की अदानी-नेतान्याहू भेटीनंतर काही दिवसांतच ‘मोसाद’ने हिंडेनबर्गच्या जागतिक जाळ्याविरोधात मोहीम सुरू केली. तिचे नाव ‘ऑपरेशन झेपेलीन’. किती काव्यगत न्याय साधलाय मोसादने या नावातून. ‘झेपेलीन’ हा पहिल्या महायुद्धाच्या काळात वापरण्यात आलेल्या लंबगोलाकार प्रवासी विमानांचा प्रकार. तर ‘हिंडेनबर्ग’ हे झेपेलीन प्रकारच्या एका जर्मन प्रवासी विमानाचे नाव. यासाठी मोसादने ‘झोमेट’ (ह्युमिन्ट) आणि ‘केशेट’ (सायबर ऑप) हे विभाग कामास लावले. (ही नावे व त्यांची माहिती विकिपिडियावर सहज उपलब्ध आहे. असो.) या ऑपरेशन अंतर्गत मोसादने ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या संगणकाचे सर्व्हर ‘हॅक’ केले. हिंडेनबर्गचे संस्थापक आणि अन्य पदाधिकारी यांच्यावर नजर ठेवली. आणि त्यातून काय समोर आले?

बातमी काय सांगते?

बातमी सांगते – चळवळे वकील (ज्यांना आपण आंदोलनजीवी वकील म्हणतो ते.), पत्रकार, हेज फंड्स आणि राजकीय नेते यांचा या प्रकरणातील सहभाग समोर आला. त्यातील अनेकांचे बायडेन प्रशासन, अमेरिकी डीप स्टेट आणि जॉर्ज सोरोस यांच्याशी असलेले सबंध ऑपरेशन झेपेलिनच्या ३५३ पानी फायलीतून समोर आले. एवढेच नव्हे, तर राहुल गांधींवरही मोसाद नजर ठेवून होती. आणि त्यातून हे समोर आले, की अदानी आणि मोदींना हानी पोहोचवण्यासाठी राहुल गांधी हे हिंडेनबर्गच्या संस्थापकाशी समन्वय साधून होते. या बातमीचे जे बातमीदार आहेत, त्यांच्याकडे मोसादच्या काही ‘चॅट्स’ची माहितीही असल्याचे दिसते. कारण बातमी सांगते, की मोसादच्या चॅट्समध्ये राहुल गांधी यांचा उल्लेख ‘कडवट घराणेशहा’ – ‘बिटर डायनास्ट’ – असा करण्यात आला आहे. (Report in Sputnik India)

या घराणेशहाला काही पाश्चिमात्य माध्यमे, भारतातील विरोधी पक्षांतील काही नेते हेही मदत करीत होते. सोरोस तर होतेच, पण अलीकडे अमेरिकेतील एक संस्था ट्रम्प टोळीच्या निशाण्यावर आहे. तिचे नाव यूएसएड. ती यात कशी नसणार? तीही होती. तिने पाश्चात्य माध्यमांतून तसेच ‘ऑर्गनाइझ्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ (ओसीसीआरपी) यांच्या माध्यमातून अदानीविरोधी ‘नॅरेटिव्ह’ पसरले जावे यात महत्त्वाची भूमिका निभावली. तर येणे प्रकारे ट्रम्प आणि मोदी आणि नेतान्याहू आणि अदानी यांचे जे जे विरोधक गणले जात आहेत, त्या त्या सर्वांनी राहुल गांधी यांना साह्य केले असे या बातमीतून दिसते. हेरगिरी, डीप स्टेट, बडे उद्योजक, देशद्रोह… अवघा मसाला ठासून भरलेली ही बातमी. यात कुठे दिसत नाही ते फक्त पुतीन यांच्या रशियाचे नाव. पण याचा अर्थ असा नाही, की रशिया या प्रकरणात कुठेही नाही. उलट रशियाचा तर ‘स्पुटनिक इंडिया’ने दिलेल्या या बातमीशी फार जवळचा संबंध आहे. (Report in Sputnik India)

०००

‘स्पुटनिक इंडिया’विषयी…

‘स्पुटनिक इंडिया’ ही भारतात काम करणारी वृत्तसंस्था. तिच्या मातृसंस्थेचे नाव ‘स्पुटनिक’. रशियातील ‘रोझिया सेगोद्न्या’ या माध्यम कंपनीद्वारे ती चालवली जाते. पण तिच्यावर नियंत्रण आहे रशियन सरकारचे. १० नोव्हेंबर २०१४ रोजी तिची स्थापना झाली. खरे तर नामबदल झाला. तत्पूर्वी या संस्थेचे नाव होते ‘नोव्होस्ती’. 

नोव्होस्ती या शब्दाचा अर्थ आहे – बातमी. ही मुळात सोव्हिएत रशियाच्या केजीबी या गुप्तचरसंस्थेची ‘फ्रंट’ होती. ‘केजीबी’तर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘ॲक्टिव्ह मेझर्स’मध्ये तिची महत्त्वाची भूमिका असे. ॲक्टिव्ह मेझर्स याचा अर्थ रशियाच्या परराष्ट्र धोरणास साह्यभूत ठरतील अशा गोपनीय कपट कारवाया. त्यात बनावट कागदपत्रे, अहवाल तयार करणे, माध्यमांतून आपल्याला हवी ती माहिती पेरणे, अपमाहिती पसरवणे या गोष्टींचाही समावेश असे. त्या काळात नोव्होस्ती भारतातही सक्रिय होती. त्याची काही उदाहरणे ‘परकीय हात’ या पुस्तकात येतात. तर २०१३ मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही संस्था बंद केली. तिची मालकी ‘रोझिया सेगोद्न्या’कडे सोपवली. तिचे ‘स्पुटनिक’ असे नामांतर केले. आता ती पुतीन यांच्या भू-राजकीय धोरणांना अनुकूल असा लोकानुबोध – नॅरेटिव्ह – तयार करणे, अपमाहिती पसरवणे अशी ‘महत्त्वपूर्ण’ कामे करते. (Report in Sputnik India)

पुतीन यांचे प्रोपगंडा हत्यार

स्पुटनिक हे पुतीन यांचे प्रोपगंडा हत्यार असल्याचे आता लपून राहिलेले नाही. वेळोवेळी तिचा पर्दाफाश झालेला आहे. कोव्हिड महासाथीच्या काळात पाश्चात्य जगतात निर्माण झालेल्या अनेक षड्‌यंत्र सिद्धांताचे मूळ स्पुटनिकमध्ये असल्याचे उघड झाले आहे. युक्रेन हा देश नाझींद्वारे चालवला जातो, अशा कटकाल्पनिकाही तिच्याच. तिच्या अशा कारवायांमुळे २०२२ मध्ये युरोपियन युनियनने तिच्यावर बंदी घातली. फेसबुक (मेटा), ट्विटर (एक्स) आणि यूट्यूबने तिच्यावर निर्बंध लादलेले आहेत. एवढेच नव्हे, तर स्पुटनिक आणि ‘रोझिया सेगोद्न्या’ या कंपनीची अन्य रेडिओ व टीव्ही माध्यमे यांनी अमेरिकेच्या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचे – अमेरिकी नागरिकांत फूट पडावी यासाठी अपमाहिती पसरवणे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने खरे भासतील अशा बनावट चित्रफिती वा ध्वनिफिती निर्माण करणे असे अनेक उद्योग केल्याचे उघड झाले आहे. आणि त्यामुळेच ४ सप्टें. २०२४ रोजी अमेरिकेच्या ‘डिपार्टमेन्ट ऑफ ट्रेझरी’ने या माध्यम संस्थांवर निर्बंध लादले. तर अशा या रशियासाठी काम करणाऱ्या स्पुटनिकची शाखा भारतात खुलेआम काम करीत आहे. एरवी परकीय हात, डीप स्टेट यांचे येता-जाता नामस्मरण करणारी माध्यमेही त्याविषयी मूग गिळून गप्प आहेत. कदाचित त्यांच्या ‘टूलकिट’मध्ये स्पुटनिकचा समावेश नसावा.

या अशा रशिया संचलित प्रोपगंडा माध्यमाने दिलेली बातमी आता आपल्याकडील अनेक माध्यमे ‘चालवित’ आहेत. अपमाहिती मोहिमांत तेच तर अपेक्षित असते. इस्रायल आणि मोसादवर अनेक भारतीयांची ‘श्रद्धा’ आहे. हे स्पुटनिकच्या प्रोपगंडाकारांना चांगलेच माहीत असणार. त्यामुळे काही सत्यांच्या आवरणाखाली असत्य आणि अर्धसत्यांची चलाख पेरणी करून त्यांनी हे बनाव-वृत्त बनवल्याचे दिसते. मोसादच्या सूत्रांनी म्हणे माहिती दिली, त्यांनी पंतप्रधानांच्या बैठकीतील संवाद जसेच्या तसे सांगितले, अदानींवरील हल्ला इस्रायलला त्यांच्यावरील अप्रत्यक्ष हल्ला वाटला, मग मोसादने म्हणे पित्रोदांचा संगणक हॅक केला, राहुल गांधींवर नजर ठेवली… 

हिटलरच्या ‘माईन काम्फ’ मध्ये महा-असत्य – बिग लाय – नावाची एक संकल्पना आहे. तुम्ही जेवढे प्रचंड खोटे बोलाल, तेवढा लोक त्यावर विश्वास ठेवतील. कारण लोकांना वाटेल, की कोणी एवढा खोटारडेपणा कसा काय करू शकेल? तेव्हा जे बोलताहेत, त्यात काही तरी तथ्य असणारच. हेच तत्त्व या बातमीत दिसते आहे. रशियाच्या ‘ॲक्टिव्ह मेझर्स’चा, ‘फेक न्यूज’चा हा एक उत्तम मासला आहे.

(लेखक हे पत्रकार असून, त्यांचे ‘परकीय हात – विदेशी हेरसंस्थांच्या भारतातील कारवाया आणि कारस्थाने’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर