पुणे : प्रतिनिधी : पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यात परत भेट झाली. त्यानंतर पवार काका पुतण्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या तिघांमध्ये एकत्र चर्चा झाल्याने राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याचा चर्चेने जोर धरला आहे. पण दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येण्याच्या वृत्ताचा अजित पवार यांनी मात्र इन्कार केला आहे. (Rastrawadi meeting)
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांवर टीका केली होती. पण विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवल्याने महाविकास आघाडी बॅकफुटवर गेली. त्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि रयत शिक्षण संस्थामधील बैठकामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र बैठकीला उपस्थित असतात. अजित पवार यांच्या मुलाच्या साखरपुड्यालाही शरद पवार उपस्थित राहिल्याने पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. (Rastrawadi meeting)
आज पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर उद्योग आणि कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचे पहायला मिळाले. बैठकीनंतर पवार काका पुतणे आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता यात चर्चा करण्यासारखे काय आहे? कारण आम्ही एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढेल याबाबत चर्चा करत होते, असे अजित पवार म्हणाले. (Rastrawadi meeting)
भविष्यात शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार का असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, माझ्या मुलाच्या साखरपुड्याला शरद पवारांच्या कुटुंबातील सर्वजण आले होते. घरातील कार्यक्रम असतील तर कुटुंब म्हणून आम्ही एकत्र असतो. आमची विचारधारा वेगवेगळी आहे. पण बाकीच्या बाबतीत कुटुंब म्हणून सुख दुखात आम्ही एकत्र असतो, असे अजित पवारांनी सांगितले. (Rastrawadi meeting)