नवी दिल्ली : प्रतिनिधी : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत भाषण करत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणा देत गोंधळ माजवला. गोंधळातच मोदी यांनी भाषण सुरू ठेवले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर पंतप्रधानांनी भाषण करत विरोधकांवर टीका केली.
काल बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान मोदी भाषण करण्यापूर्वीच सभागृहात विरोधी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या अकरा वर्षाच्या कारकीर्दीत प्रथमच अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत भाषण करता आले नाही. त्यामुळे राज्यसभेत पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. राज्यसभेत भाषणास सुरूवात करताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना खाली बसून घोषणाबाजी करण्याचा सल्ला दिला. (Rajya Sabha during the Prime Minister’s speech)
राज्यसभेत आभार प्रस्तावावर भाषण करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील तरुण भारताच्या क्षमतेला कसे पुढे नेत आहे, यावरही सविस्तर चर्चा झाली आहे. राष्ट्रपतींनी भारताच्या उज्ज्वल भविष्यावर विश्वास व्यक्त केला आहे. हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कारण गेल्या शतकाचा दुसरा तिमाही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात निर्णायक काळ ठरला. मला स्पष्टपणे दिसत आहे की, ही दुसरी तिमाही तितकीच शक्तिशाली असेल आणि विकसित भारताच्या उभारणीच्या दिशेने तितक्याच वेगाने प्रगती करेल. देशातील प्रत्येक व्यक्तीला वाटते की, आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. त्यामुळे आपण आता थांबू नये किंवा मागे वळून पाहू नये. आपण फक्त पुढे जात राहिले पाहिजे आणि आपले ध्येय साध्य केल्यानंतरच सुटकेचा नि:श्वास सोडला पाहिजे. त्यामुळे आपण त्याच दिशेने पुढे जात आहोत, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. मोदी राज्यसभेत संबोधन करत असताना विरोधकांनी सभात्याग केला. (Rajya Sabha during the Prime Minister’s speech)
नरेंद्र मोदी म्हणाले, भारताच्या विकासासाठी अनेक शुभ संधी मिळाल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत देश वृद्ध होत आहेत. तेथील लोकसंख्या वयाच्या त्या टप्प्यावर पोहोचली आहे, ज्याला आपण वृद्ध म्हणून ओळखतो. परंतु आपला देश विकासाच्या नवीन उंची गाठत आहे. त्यामुळे आपला देश तरुण होत चालला आहे. हा देश तरुण लोकसंख्येचा देश बनत आहे. त्यामुळे जगाचे भारताकडे आकर्षण कसे वाढले आहे, हे मी पाहत आहे. जगाला भारताच्या प्रतिभेचे महत्त्व समजत आहे, असे नरेंद्र मोदींनी म्हटले. (Rajya Sabha during the Prime Minister’s speech)