Raju Shetty : काटामारीवर आळा घालण्यासाठी ‘एआय’ वापर करा

Raju Shetty

पुणे : प्रतिनिधी : साखर कारखान्यांच्या काटामारी व रिकव्हरी चोरीबाबत पवार काका – पुतण्यांनी कधी भाष्य केले नाही. जर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काटामारी व रिकव्हरी चोरीवर आळा घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते तर राज्यातील उस उत्पादक शेतक-यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर अजून वाढला असता, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. पुणे येथील साखर आयुक्त सिध्दराम सालिमट यांची माजी खासदार शेट्टी यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  (Raju Shetty)

राज्य सरकारन एआय (कृत्रिम बुध्दीमता ) तंत्रज्ञानावर भर देत उसाची उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. याकरिता पवार काका पुतण्यांनी विशेष लक्ष देवून राज्यातील सर्व कारखानदारांना एकत्र करून पुढील हंगामापर्यंत हा प्रयोग संपुर्ण राज्यभर यशस्वी करण्याचा त्यांचा प्रयत्न  आहे. मात्र शेतक-यांनी उसाचे उत्पादन वाढविल्यानंतर कारखानदार काटामारी व रिकव्हरी चोरून  शेतक-यांची सर्रास लूट करू लागले आहेत. याबाबत मात्र पवार काका -पुतणे मुग गिळून का गप्प आहेत ? असा सवाल  खासदार शेट्टी यांनी केला. (Raju Shetty)

राज्य सरकारकडून एआय तंत्रज्ञानासाठी ५०० कोटी रूपयाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान दिले पाहिजे, उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढविली पाहिजे यामध्ये दुमत नाही . याकरिता राज्य सरकार जे प्रयत्न करत आहे ते स्वागतार्ह आहे, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी कौतुक केले. पण  राज्यातील कारखानदारांनी गाळप क्षमता वाढविली मात्र उसाचे क्षेत्र तेवढेच राहिल्याने कारखाना कार्यक्षेत्रात उस कमी पडू  लागल्यामुळे यावर्षी सर्वच कारखान्यांनी  गाळप क्षमतेपेक्षा ३० ते ४० टक्के कमी उस गाळप केला आहे. यामुळे राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेवर परिणाम होवून प्रक्रिया खर्चात वाढ होत आहे. राज्यातील कारखानदार यांना माहित होते कि उसाचे क्षेत्र तेवढेच आहे तरीही हव्यासापोटी संगनमताने गाळप क्षमता वाढविली आहे आणि याचाच परिणाम कारखान्यांच्या उत्पादन खर्चावर होवून उत्पादन खर्चात वाढ होवू लागली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  (Raju Shetty)

         राज्य सरकार व कारखानदारांचे शेतकऱ्यांच्याबद्दलचे  बेगडी प्रेम असून खरच जर त्यांना शेतकरी हित जोपासायचे होते तर उच्च न्यायालयाने एक रक्कमी एफ. आर. पी चा निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आवश्यकता नव्हती, असा आरोपही शेट्टी यांनी केला. ते म्हणाले, साखर कारखाने पुर्ण क्षमतेने चालविण्यासाठी राज्य सरकार व कारखानदार मिळून एआय तंत्रज्ञानावर भर देत आहेत. दुसरीकडे राज्यातील  सर्व कारखानदार सर्रास काटामारी व रिकव्हरी चोरी करू लागले आहेत याबाबत गेल्या अनेक वर्षापासून मागणी करूनही राज्य सरकारकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. ज्या तत्परतेने कारखाने एआय तंत्रज्ञानासाठी झटत आहेत त्याच तत्परतेने काटामारी व रिकव्हरी चोरी थांबविल्यास शेतकाऱ्यांना फायदा होणार आहे. अन्यथा रात्रं दिवस रक्ताच पाणी करून पिकवायच आणि कारखानदारांनी शेतक-यांना लुटायचे हे आता चालणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.  (Raju Shetty)

हेही वाचा :

हिंदी सक्तीबाबत सरकार बॅकफूटवर!

पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; २० वर जखमी

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर