कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे प्रबळ नेते राहूल पाटील यांनी मुंबईत उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. काँग्रेस पक्षाचा त्याग करुन राहूल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. ऑगस्ट महिन्यात एक जंगी कार्यक्रमात त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. राहूल पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. (Rahul patil)
२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार राहूल पाटील हे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्याकडून अवघ्या १८०० मतांनी पराभूत झाले होते. त्यांचे वडील स्वर्गीय पी.एन. पाटील हे कट्टर काँग्रेसप्रेमी होती. त्यांची स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर श्रद्धा होती. काँग्रेसनिष्ठ असलेले पी.एन. पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार याची चर्चा गेली अनेक दिवस सुरू होती. भोगावती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या खाईत गेल्याने त्या उर्जितवस्था आणण्यासाठी आणि सहकारी संस्थांना मदत होण्यासाठी राहूल पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. राहूल पाटील आणि जिल्हा बँक संचालक राजेश पाटील या दोघां बंधूंनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. पाटील बंधूंनी काँग्रेसचा त्याग करु नये अशी विनंती सतेज पाटील यांनी केली होती. (Rahul patil)
आज गुरुवारी मुंबईत राहूल पाटील आणि राजेश पाटील बंधूनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशासंदर्भात चर्चा झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे उपस्थित होते. मुश्रीफांनी राहूल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावेत यासाठी प्रयत्नशील होते. राहूल पाटील यांच्यासमवेत गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी.डी. धुंदरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बी.एच. पाटील, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष भारत पाटील भुयेकर, करवीर तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. (Rahul patil)