मुंबई : प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात २००८ मध्ये झालेल्या भीषण मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात विशेष एनआयए न्यायालयाने माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता केली. सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट आहे. मालेगावातील भिक्खू चौकात झालेल्या स्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले. रमजान महिन्यात हा स्फोट झाला होता. (Malegaon bomb blast case)
गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात मालेगाव बॉम्बस्फोटाच्या सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी बॉम्ब ब्लास्ट झाल्याचे सरकारी पक्षाकडून सिद्ध करण्यात आले. पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी वकीलांना अपयश आल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले. ही घटना नक्कीच दुर्दैवी होती, असे कोर्टाने म्हटले. पण तपासात अनेक त्रुटी होत्या. या सगळ्या त्रुटीचे वाचन देखील न्यायालयात करण्यात आले. पंचनामा योग्य नव्हता. जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही, असे निरिक्षणही न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे पुराव्यांच्याअभावी मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचेही यावेळी न्यायालयाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. (Malegaon bomb blast case)
महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या दुचाकीमध्ये ब्लास्ट झाला होता. ती दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्या दुचाकीचा चेसीस नंबर हा साध्वीच्या नावावर असल्याचे वकीलांना सिद्ध करण्यात आले नाही, असेही यावेळी न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले नाही. बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेचे दाव्यांवर न्यायालयाचे समाधान झाले नाही. आधी लावलेला मकोका नंतर मागे घेतल्याने याअंतर्गत सगळे जबाब निरर्थक असल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. युएपीए साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे. त्यामुळे युएपीए लागू होत नाही. लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवरदेखील न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आले. (Malegaon bomb blast case)
आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा पुरावा नाही, असंही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं न्यायालयाकडून सांगण्यात आले. कोर्टाने सांगितले की, ३२५ लोकांचे जबाब नोंदवण्यात आले. पण त्यापैकी कोणीही कर्नल पुरोहित यांनी ऑन ड्युटी असताना आरडीक्स मिळवले, ते नेमके कोणत्या पद्धतीने पुरवण्यात आले, हे सरकारी वकीलांना सिद्ध करता आले नाही. त्याशिवाय, हे बॉम्ब नेमके कुठे बनविण्यात आले, हे सुद्धा न्यायालयामध्ये सिद्ध करता आले नाही. त्यामुळे हे सात जण आरोपी आहेत, असे कोर्टाला सिद्ध करता आले नाही आणि त्याचमुळे कोर्टाने आरोपींची निर्दोष सुटका केल्याचे आरोपीच्या वकिलांकडून सांगण्यात आले आहे. (Malegaon bomb blast case)