आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा उठवणार: राहुल गांधी

कोल्हापूर, प्रतिनिधी : आरक्षणावरील पन्नास टक्क्यांची मर्यादा उठवण्याबरोबरच जातनिहाय जनगणना करण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही, असा निर्धार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे संविधान सन्मान संमेलनात व्यक्त केला. हॉटेल सयाजी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज पॅव्हेलियनमध्ये देशभरातील हजारावर प्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या या संमेलनाच्या मंचावर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, डॉ. टी. एस. पाटील, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते. श्रोत्यांमध्ये काँग्रेसचे प्रभारी चेन्निथला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नााना पटोले, विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, देशात मागास लोकांची संख्या किती आहे, हे अधिकृतरित्या कुणालाच ठाऊक नाही. जातनिहाय जनगणनेमुळे ते वास्तव समोर येईल. जातनिहाय जनगणना म्हणजे केवळ कास्ट सेन्सस नाही, तर कोणत्या घटकाची किती लोकसंख्या आहे, या वर्गाचा भारताच्या अर्थव्यवस्थेत किती सहभाग आहे, तसेच दलित-आदिवासींच्या हातात किती पैसा आहे हे जाणून घेण्याचा मार्ग आहे. सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण आहे. न्यायव्यवस्था, प्रशासन, प्रसारमाध्यमे आदी क्षेत्रात दलित, आदिवासी, ओबीसींची संख्या किती आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक त्याला विरोध करतात. सामाजिक-आर्थिक परिस्थिचा एक्सरे काढायला ते का विरोध करतात, हा खरा प्रश्न आहे. मोदींनी कितीही डान्स गाणे म्हटले किंवा भाजपने कितीही नाच केला तरी या गोष्टीला कुणी रोखू शकत नाही. जातनिहाय जनगणनेचा निर्णय़ देशाच्या लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर होईल, त्याचा कायदा होईल आणि डेटा आपल्या हाती आल्यानंतर देशाचे खरे राजकारण सुरू होईल. भाजप आणि आरएसएसने बंद केलेले रस्ते आम्हाला खुले करायचे आहेत.

संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले, बाबासाहेबांनी यांनी तीन शब्द दिलेत. शिक्षण, आंदोलन आणि संघटन. या तिन्ही शब्दांचा क्रम आणि आशय दोन्ही महत्त्वाचे आहेत. शिक्षण म्हणजे केवळ शाळा-कॉलेजमध्ये दिले जाणारे शिक्षण नव्हे, तर अवतीभवतीची परिस्थिती नीट समजून घेणे होय. शिक्षण घेतले तर आंदोलनाला दिशा मिळेल आणि संघटनाशिवाय त्याला गती मिळणार नाही.

स्वप्नील कुंभार कुठाय?
कार्यक्रमाच्या प्रारंभी कोल्हापुरातील स्वप्नील कुंभार या तरुणाने राहुल गांधी यांना विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट दिली. त्याचा संदर्भ देऊन राहुल गांधी म्हणाले, मी मघाशी स्वप्नीलशी हस्तांदोलन केले,त्याचा हात हातात घेतल्यानंतर जाणीव झाली की या हातामध्ये कौशल्य आहे, कला आहे. आणि आपल्या व्यवस्थेत ज्याच्या हाती कला आहे त्याला मागे बसवले जाते.
बोलता बोलता राहुल गांधी यांनी स्वप्नील कुठाय, अशी विचारणा केली, तर तो जवळपास नव्हता. तो सभागृहात मागच्या बाजूला निघून गेल्याचे कुणीतरी सांगितले.त्यावर राहुल गांधी म्हणाले, बघा इथेच आपल्याला काय बघायला मिळतेय. ज्या हातात कला आहे, त्याला मागे ढकलले जाते आणि भारतात हे चोवीस तास घडते.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली