अबब अजगर! खातो किती, पचवतो कसे?

स्टॅन ठेकेकरा, योगेंद्र आनंद : निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या केरळमध्ये, विशेषतः वायनाडच्या दुर्गम जंगलामध्ये मुल्लू कुरुम्बा आदिवासी राहतात. शिकार हे या आदिवासींचे उपजीविकेचे मूळचे साधन. ते खेळ म्हणून किंवा आनंदासाठी शिकार करत नसत, तर उपजीविकेसाठी त्यांना शिकार करावी लागत होती. कालांतराने शिकारीवर बंदी आली आणि या आदिवासींनी शेती करण्यास सुरुवात केली. (Python)

याच भागातील जंगलामध्ये वसलेले एक गाव म्हणजे करीकुन्नू. या जंगलातील एका झाडाखाली वेलियामुथन पहुडले होते. वेलियामुथन या गावातील सर्वांत वयस्करांपैकी एक. गावचे प्रमुखच म्हणा ना. तरुण असताना त्यांनी शिकारीसाठी जाणाऱ्या तरुणांचे अनेक वेळा नेतृत्व केले होते. त्यांच्या समवयस्कांप्रमाणेच आजूबाजूच्या जंगलाची, तेथील प्राण्यांची त्यांना खडा-न्-खडा माहिती होती. आता ते शिकार करत नाहीत; पण जंगल आणि प्राण्यांविषयीचे त्यांच्याकडील माहिती अजूनही विपुल आहे. ते झाडाखाली पहुडलेले असताना, काही मुले पळत त्यांच्याकडे आली आणि ओरडू लागली, ‘आजोबा, आजोबा, चला आणि पाहा.. आम्हाला एक जादूचा ढिगारा सापडला आहे. तिकडे गवतात आहे तो.’

वेलियामुथन : काय? जादू कशी काय?

मुले : आम्ही खेळत होतो आणि त्या ढिगाऱ्यावर थोडा वेळ बसलो. अचानक तो ढिगारा हलू लागला. तो जिवंत आहे, तो जिवंत आहे. आजोबा चला, चला लवकर. आम्ही तुम्हाला दाखवतो.

काय घडले असेल, याचा वेलियामुथन यांना अंदाज आला होता, पण त्यांनी ते चेहऱ्यावर जाणवू दिले नाही. मुलांनी त्यांना हाताला धरून जंगलामध्ये नेले. त्या गवतापासून काही अंतरावरून ते त्यांना ढिगारा दाखवू लागले. ‘तुम्ही काळजीपूर्वक पाहा, तुम्हाला तो ढिगारा हलताना दिसेल,’ ती मुले सांगत होती.

मुले : ‘आजोबा ते काय आहे? त्यामध्ये जीव आहे का? तो जादूचा ढिगारा आहे का?’

वेलियामुथन यांना जाणवले, की मुलांना जंगल आणि तेथील प्राण्यांविषयी आणखी एका रंजक ज्ञानाची माहिती सांगण्याची वेळ आली आहे. त्यांनी मुलांना शांत केले आणि त्यांना थोड्या अंतरावरील एका झाडाच्या सावलीत नेले. (Python)

वेलियामुथन : मुलांनो इकडे या आणि बसा. मी तुम्हाला त्या हलणाऱ्या ढिगाऱ्याच्या जादूची माहिती सांगणार आहे.

मुले : खरंच.. ती जादू आहे का?

वेलियामुथन : हो आणि नाहीसुद्धा.. निसर्ग जे करतो, ते माणसांना जादूमयच वाटून जाते. पण, ती गोष्ट आहे तशीच असते आणि तोच निसर्ग आहे.

मुले : पण तो ढिगारा कसा हलत आहे, ते आम्हाला सांगा. आम्हाला वाटते, त्यामध्ये आत्मा असावा. आम्हाला वाटते की तो ढिगारा हा एक जीव आहे. पण त्याला तर पाय नाहीत, डोळे नाहीत, तरी तो कसा हलत आहे. ती नक्कीच जादू असली पाहिजे.

हलणाऱ्या त्या ढिगाऱ्याविषयी मुलांना प्रचंड कुतूहल वाटत होते आणि त्यातून त्यांच्या डोक्यातून वेगवेगळ्या कल्पना येत होते. वेलियामुथन यांनी त्यांना शांत केले.

वेलियामुथन : मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगतो. पण, तुम्ही आता एका ठिकाणी शांत बसणार आहात का, हे मला सांगा. तुम्ही शांत बसला, तर मी तुम्हाला जे सांगेन ते खरंच खूप भारी असेल.

त्यांच्या या शब्दानंतर मुले लगेच शांत बसली. जादूच्या ढिगाऱ्याचे रहस्य ऐकण्यासाठी ते किती आतूर झाले आहेत, हे त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत होते. आता तर तो ढिगारा आणखी जोरात हलत होता आणि तो आणखी जोरात वेटोळे घालत आहे, असे दिसत होते. आता हळूहळू त्याचे डोके दिसू लागले. त्यानंतर हळूहळू शरीर दिसू लागले, तो आकार वाढू लागला आणि अखेर त्या चिखल व गवतांमध्ये जोरात हालचाल झाली. अरे… तो तर एक साप होता. खूप लांब आणि खूप मोठा साप होता. तो एक अजगर होता.

मुलांच्या मनातील धडधड वाढली आणि त्यांचा त्यांच्या डोळ्यावरही विश्वास बसला नाही. वेलियामुथन यांनी तोपर्यंत झाडावरून पिकलेले फणस काढले. ते कापले आणि मुलांना ते वाटत त्यांना गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.

वेलियामुथन : मुलांनो ऐका.. एखादा अजगर जेव्हा हरीण किंवा त्यासारखा मोठा प्राणी गिळतो, तेव्हा त्याला तो पचवण्यासाठी खूप वेळ जातो. या काळात त्याचे पोट खूप फुगलेले असते. त्यामुळे, त्याला सहजासहजी हालचाल करता येत नाही. त्यामुळे तो वेटोळे घेतो आणि पोटातील प्राणी पचेपर्यंत तो एकाच जागेवर पडून राहतो.

मुले : आजोबा, अजगर असा किती वेळ एका जागेवर बसून राहतो?

‘तुम्ही सांगा,’ वेलियामुथन यांनी मुलांसमोरच प्रश्न टाकला. मुलांचे अंदाज सुरू झाले.. एक दिवस? तीन दिवस? एक आठवडा? ते अंदाज करत होते आणि वेलियामुथन मान हलवत होते.

वेलियामुथन : काही वेळा एका महिन्यापर्यंतचाही काळ लागू शकतो. कधीकधी त्यापेक्षा जास्तही…

आपण काय ऐकत असतो, त्यावर त्या मुलांचा विश्वास बसत नव्हता. एक महिना एकाच जागेवर? तेही हालचाल न करता?

वेलियामुथन : तुम्ही एकदा त्या अजगराकडे पाहा. तो किती संथपणे हालचाल करत आहे, हे तुम्हाला दिसत आहे का? तो खूप जड झाला आहे, त्यामुळे त्याला हालचाल करता येत नाहीये. त्याच्या पोटातील अन्नाची चरबी झालेली आहे आणि अनेक दिवसांत त्याची हालचाल झालेली नाही. तुम्हाला माहीत आहे का, त्याच्या पोटातील चरबी हे खूप चांगले औषध आहे? अजगर अशा पद्धतीने चरबीने भरलेला असतो, त्या वेळी त्याला पकडणे खूप सोपे असते. वाय आकाराची काठी त्यावर ठेवली, तर तो हालचाल करू शकत नाही. त्यानंतर बांबूच्या आतील भागातील टोकदार तुकड्यांचा वापर करा. बांबूच्या आतील भागाचेच तुकडे तुमच्याकडे पाहिजेत, बाहेरचे नको. त्याचे कारण सांगा बरे?

मुलांनी उत्तर माहीत नसल्याचे मान हलवून सांगितले.

वेलियामुथन : बांबूचा बाहेरील भाग घाण असू शकतो. त्यावर खूप जीवजंतू असतात. त्यापेक्षा आतील भाग स्वच्छ आणि निर्जंतुक असतो. आपण बांबूच्या या तुकड्याचा वापर ब्लेडसारखा करू शकतो आणि अजगराच्या पोटाजवळील भाग हळूवारपणे कापू शकतो. त्या त्वचेखाली तुम्हाला चरबी दिसेल आणि ही चरबी मण्यांच्या हारासारखी दिसते. ती तुम्ही पूर्ण बाहेर काढा. त्यानंतर बांबूच्या छोट्या सुया तयार करा. त्या कशाच्या आतील भागाच्या की बाहेर?

मुले एकसुरात ओरडली, ‘आतील भागाच्या!’

वेलियामुथन : बरोबर. आणि त्यानंतर आपण ती त्वचा पुन्हा या सुयांनी शिवायची. त्या त्वचेला पुन्हा पिना मारल्यासारखे करायचे. काही दिवसांनंतर ती जखम भरून निघते आणि त्वचा पूर्वीसारखी होते.

मुले : त्या चरबीचे काय होते, आजोबा?

वेलियामुथन : हो.. ती आपण वितळवायची आणि साठवून ठेवायची. आपण ती जखमा भरून येण्यासाठीचे औषध म्हणून वापरू शकतो. त्वचेच्या आजारांवर तो उपाय आहे आणि वेगवेगळ्या गोष्टींचा त्याचा औषधासारखा वापर होऊ शकतो.

मुले : ती घरामध्ये बाटलीमध्ये भरून ठेवली आहे, ते तेच औषध आहे का?

वेलियामुथन : हो तेच आहे. प्राणी आपल्याला खूप गोष्टी देत असतात. त्यामुळे, या प्राण्यांबरोबरच राहायला आपण शिकले पाहिजे. त्या अजगराला मारण्यापेक्षा आपण त्याची एक शस्त्रक्रिया केली आणि तो अजगरही जिवंत राहिला. तुम्हाला माहितंय का, माझे आजोबा आम्हाला काय सांगत होते? आपण, जेव्हा अजगराची चरबी काढतो, तेव्हा तो खूप आनंदी होत असतो. कारण, चरबी काढल्यानंतर त्याला सहज हालचाल करता येते आणि तो वेगाने इकडे-तिकडे करू शकतो. प्रत्येक वेळी जेव्हा अजगर एखादा मोठा प्राणी खातो, तेव्हा त्याला हालचाल करणे कठीण होते, मग तो आपल्या गावाजवळ येतो आणि आणखी एक शस्त्रक्रिया करून घेण्याची वाट पाहात राहतो.

मुले : पण आजोबा, आपल्या घरातील एका बाटलीमध्ये आणखी काही तरी आहे. त्याला दुर्गंधी येते. ते काय आहे?

वेलियामुथन : तो दुर्गंधी येणारा पदार्थ साळिंदरापासून मिळाला आहे. त्याची वेगळीच गोष्ट आहे. पण आता खूप उशीर झाला आहे, आपण घरी जाऊया.

त्यानंतर वेलियामुथन आणि मुले गावाकडे निघाली. ते गाव निसर्गातील आश्चर्ये आणि रहस्यांनी खूप भरलेले होते. त्या मुलांमधील एक चुणचुणीत मुलगी मोठ्या आवाजात म्हणू लागली, ‘आपल्याला या निसर्गापासून खूप काही शिकण्यासारखे आहे की..’

अजगर हा बिनविषारी साप आहे आणि बहुतांशपणे माणसांना त्याच्यापासून धोका असत नाही. माणूस हा अजगरांचे भक्ष्य नाही. ‘बॉल पायथन’ ही अजगराची प्रजात काही ठिकाणी पाळण्यातही येते.

मुलू कुरुम्बा आदिवासी अजगराची चरबी वितळवतात आणि साठवून ठेवतात. त्याचा ते औषधण म्हणून वापर करतात. जखमा बऱ्या करण्यापासून त्वचेच्या आजारांवर या औषधाचा उपयोग होतो.

अजगराविषयी…

अजगराच्या किती प्रजाती आहेत?

  • जगामध्ये अजगराचे ११ प्रकार आहेत; मात्र विस्तृतपणे विचार केला असता, ३९ प्रकारचे अजगर आढळून येतात. त्यातील केवळ तीन प्रजाती भारतात आढळतात.
  • जाळीदार अजगर हा जगातील सर्वांत वजनदार अजगरांपैकी एक आहे. तो ३० फूट लांबीपर्यंत वाढू शकतो आणि त्याचे वजन १०० किलोपर्यंत असते. हा जगातील सर्वांत वजनदार अजगर नसला, तरी सर्वांत लांब सापांपैकी एक आहे. ‘ग्रीन अॅनाकोंडा’ हा जगातील सर्वांत वजनदार साप आहे, पण तो अजगराचा प्रकार नाही.
  • बर्मिज अजगर हा दुसऱ्या प्रकारातील अजगर असून, तो २० फुटांपर्यंत लांब होऊ शकतो. हा भारतात फारसा आढळत नाही. ईशान्य भारतामध्ये तो आढळतो. म्यानमारमधून (पूर्वीचा ब्रह्मदेश) हा अजगर भारतात आला असण्याची शक्यता आहे.
  • इंडियन रॉक पायथन हा देशात सर्वत्र आढळणारा अजगर आहे. भारतातील तीन अजगरांमध्ये हा सर्वांत छोटा असतो. त्याची लांबी १४ फुटांपर्यंत वाढू शकते. तरीही तो खूप मोठा आहे ना?

अजगराविषयीच्या काही रंजक गोष्टी

अजगराची दृष्टी खूप कमजोर असते. मात्र, त्यांच्याकडे आणखी एक शक्ती असते, ते म्हणजे उष्णता जाणून घेणारे सेन्सर. ओठांद्वारे त्यांना तापमानाची माहिती मिळते. आपल्या भक्ष्याच्या शरीरातून उत्सर्जित होणारे तापमान त्यांचे ओठ जाणून घेतात आणि अंधारातही अजगर शिकार करू शकतो.

सपटणाऱ्या अन्य प्राण्यांप्रमाणेच अजगरही एकाच वेळी शेकडो अंडी देते. त्यानंतर ती अंडी उबवण्यासाठी मादी अजगर त्यावर वेटोळे घालून पडून राहते. अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी त्यानंतर ९० दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. या काळामध्ये मादी अजगर जागेवरून हलत नाही, ती तिचे भक्ष्य शोधण्यासाठीही जागा सोडत नाही.

माणसाच्या वास घेण्याच्या क्षमतेपेक्षा १० हजार पटींनी अजगराची घाणेंद्रिये कार्यक्षम असतात.

अन्य सापांप्रमाणेच अजगरही आयुष्यभर सातत्याने कात टाकत असतो, म्हणजे आपली त्वचा बदलत असतो. आपण नियमितपणे कपडे बदलतो, त्याप्रमाणे. तरुण अजगर महिन्यातून एकदा कात टाकतात, तर वयस्कर अजगरांमध्ये हे प्रमाण तीन-चार महिन्यांतून एकदा असे असते.

अजगरांची त्वचा हे त्यांचे ओळखपत्रच असते. एखाद्या माणसाच्या बोटांचे ठसे अन्य कोणाशी जुळत नाहीत, त्याच प्रमाणे एखाद्या अजगराच्या त्वचेवरील नक्षी दुसर्‍या कोणत्याही अजगराशी जुळत नाही.

अजगर अन्न चावत नाही. अजगर आपले भक्ष्य आहे तसे गिळून टाकतो. त्यानंतर आपल्या शक्तिशाली स्नायूंच्या मदतीने त्या भक्ष्याला चिरडून मारून टाकतो आणि ते अन्न पचवतो.

(https://young.downtoearth.org.in च्या सौजन्याने)

हेही वाचा :

Related posts

हत्तींच्या संवेदनशीलतेचे, परोपकाराचे दर्शन…

पोटातले ओठावर!

Dr. B R Ambedkar : आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केले? : वास्तव आणि विपर्यास