रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेला निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप एका नव्या वादात सापडला आहे. मी ब्राह्मणांवर लघवी करतो, अशी प्रतिक्रिया त्यानं सोशल मीडियावर व्यक्त केल्यामुळं त्याच्याविरोधात टीकेची झोड उठत आहे. एका वकिलाने त्याच्याविरोधात पोलिसांतही तक्रार केली आहे. एवढ्या सगळ्या गोंधळानंतर अनुराग कश्यपने काय भूमिका घेतलीय आणि हा नेमका वाद कसा आणि कुठून सुरू झाला हे आपण समजून घेऊ. (Anurag Kashyap Controversy)
-विजय चोरमारे
फुले चित्रपटापासून वादाची सुरुवात
या सगळ्या वादाचं मूळ अनंत महादेवन दिग्दर्शित फुले हा चित्रपट आहे. या चित्रपटावरून आधीच वाद सुरू आहे. त्यानिमित्तानं अनुराग कश्यपनं एक ट्विट केलं. त्यात त्यानं सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यानं म्हटलं आहे की,
‘‘‘पंजाब ९५’, ‘टीस’, ‘धडक २’, ‘फुले’ आणि अशा आणखी किती तरी चित्रपटांच्या निमित्तानं जातीयवादी, प्रांतवादी आणि धर्मवादी सरकारचा अजेंडा दिसून येतो. सरकारने या चित्रपटांवर बंदी घातली, कारण ते स्वतःचा चेहरा आरशात पाहू शकत नाहीत. सरकारला इतकी शरम वाटायला लागली आहे की, यावर बोलायलाही तयार नाहीत. शेवटी एका चित्रपटामुळे त्यांना एवढा त्रास का होतोय? डरपोक कुठले..’’ (Anurag Kashyap Controversy)
जातिव्यवस्थाच नाही तर ब्राह्मण कुठून आले?
‘‘धडक 2’ च्या स्क्रीनिंगदरम्यान सेन्सॉर बोर्डचा एक सदस्य म्हणाला, मोदींनी भारतात जातिव्यवस्था संपवून टाकली. हाच आधार घेऊन ‘संतोष’ हाही चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकलेला नाही. आता ‘फुले’ चित्रपटामुळे ब्राह्मणांना त्रास होतोय. भाऊ, जर जातिव्यवस्था अस्तित्वातच नाही, तर मग कुठले ब्राह्मण? तुम्ही कोण? तुमची का एवढी जळतेय? जर जातिव्यवस्था अस्तित्वातच नव्हती, तर मग जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले कशासाठी होते?’’
‘‘एक तर तुमचा ब्राह्मणवाद अस्तित्वातच नाही- कारण तुमच्या मोदींसंदर्भातील म्हणण्यानुसार भारतात जातिव्यवस्था नाही. किंवा सगळे मिळून सर्वसामान्य लोकांना मूर्ख बनवताय. भाऊ, एकदा सगळे मिळून ठरवा की भारतात जातिवाद आहे की नाही ते. लोक मूर्ख नाहीत. तुम्ही ब्राह्मण आहात की जे वर बसलेत ते तुमचे बाप आहेत– आधी हे ठरवा.’’ (Anurag Kashyap Controversy)
‘‘माझा प्रश्न असा आहे की जेव्हा चित्रपट सेन्सॉर बोर्डकडे जातो, तेव्हा त्यावर चार बोर्ड सदस्य निर्णय घेतात. मग त्या चार सदस्यांव्यतिरिक्त इतर लोकांकडे या चित्रपटाची माहिती कशी पोहोचते? कारण त्यांच्याकडे तर चित्रपट पाहण्याचा अधिकारच नसतो. या संपूर्ण यंत्रणेत गोंधळ आणि भ्रष्टाचार आहे.’’
ट्रोलधाड अवतरली..
आता बघा… अनुराग कश्यपनं सेन्सॉर बोर्डाची भूमिका, एकूण जातिव्यवस्था यासंदर्भात स्पष्टपणे मते नोंदवली आहेत. असं कुठल्याही जातीसंदर्भात प्रश्न विचारले की, त्या जातीचे ट्रोल सरसावतात. इथं तर अनुराग कश्यपनं थेट ब्राह्मणांच्याच दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. त्यामुळं प्रशांत कोरटकर वृत्ती चवताळल्या. अनुराग कश्यपला शिविगाळ सुरू केली. धमक्या सुरू झाल्या. एका निनावी ट्रोलनं त्यांना ब्राह्मण तुमचे बाप आहेत, असं म्हटलं. खरंतर अनुराग कश्यप असो किंवा कुणीही शहाण्या व्यक्तिनं अशा हिंस्त्र झुंडीतल्या अनौरस लोकांच्या नादी लागायचं नसतं. पण अनुराग कश्यपनं चूक केली. आता माणूस कितीही शहाणा असला तरी कधीतरी संयमाचा कडेलोट होतो आणि जशास तसं उत्तर दिलं जातं. आता पुन्हा हीसुद्धा त्यांची स्ट्रॅटेजी असते. आधी समोरचा माणूस भडकेल अशा कमेंट करायच्या. त्याला सतत चिथावणी द्यायची. कधीतरी रागानं तो प्रत्युत्तर देतो. कमेंट करतो. मग त्या कमेंटचा स्क्रीनशॉट व्हायरल करायचा. त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा वगैरे. अनुराग कश्यप अशा ट्रॅपमध्ये सापडला. ब्राह्मण तुमचे बाप आहेत, या कमेंटवर त्यानं ब्राह्मणांवर मी मुततो. काही प्रॉब्लेम आहे का? अशी प्रतिक्रिया दिली. ती व्हायरल करून अनुराग कश्यपला चहूबाजूंनी घेरलं जातंय. (Anurag Kashyap Controversy)
दिलगिरीची वस्तुस्थिती काय?
त्यानंतर अनुराग कश्यपनं दिलगिरी व्यक्त केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. अनुरागची माफी, अनुरागची दिलगिरी, अनुराग नरमला अशा या बातम्या आहेत. परंतु तो अनुराग कश्यप आहे. त्यानं खरोखर दिलगिरी व्यक्त केली आहे का, हेही नीट तपासायला पाहिजे.
सगळ्या वादानंतर अनुराग कश्यपनं इन्स्टाग्रामवर पोस्ट म्हटलंय की, ‘‘माझ्या मुलीला, कुटुंबाला, मित्रांना आणि सहकाऱ्यांना बलात्काराच्या आणि ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.’’
अनुराग म्हणतो की, ‘‘मी जे बोललो ते मी मागे घेऊ शकत नाही आणि घेण्याची इच्छा देखील नाही. ही माफी माझ्या पोस्टसाठी नाही, तर एका वाक्यासाठी आहे जे संदर्भाशिवाय उचलून घेतले गेले. त्यामुळे द्वेष निर्माण झाला. कोणतेही कृत्य किंवा विधान इतके महत्त्वाचे नाही की त्यामुळे तुमच्या मुलीला, कुटुंबाला, मित्रांना आणि सहकाऱ्यांना बलात्कार व ठार मारण्याच्या धमक्या मिळाव्यात — हे ‘संस्कारांचे ठेकेदार’ देत आहेत.’’
मला शिव्या द्या, पण कुटुंबानं काय केलंय
अनुरागने म्हटले, ‘‘कोणी मला शिव्या द्यायच्या असतील तर देऊ शकतात, पण माझ्या कुटुंबाला यात ओढू नका. एखादी गोष्ट जर एकदा बोलली गेली असेल तर ती मागे घेता येत नाही आणि मी घेणारही नाही. पण मला जर काही शिव्या द्यायच्या असतील त्या द्या. माझे कुटुंब काहीही बोलले नाही, ना ते काही म्हटले आहे. त्यामुळे जर माफी हवीच असेल, तर ही माझी माफी आहे. ’’
‘‘ब्राह्मण लोकांनो, स्त्रियांना सोडून द्या– एवढे तरी संस्कार शास्त्रांमध्ये आहेत, ते फक्त मनुवादी विचारांमध्ये नाहीत. तुम्ही कोणत्या प्रकारचे ब्राह्मण आहात ते ठरवा. उरलेली माफी माझ्याकडून.’’ (Anurag Kashyap Controversy)
त्याने आपल्या पोस्टला कॅप्शन दिली आहे :
‘‘मनुवादी आणि गैर-संस्कारी ब्राह्मणांसाठी माफी.’’
इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये अनुरागने आपली ती कथित वादग्रस्त टिप्पणी शेअर केली आहे.
एका व्यक्तीच्या ‘‘ब्राह्मण तुझे बाप आहेत’’ या कॉमेंटला उत्तर देताना, अनुरागने लिहिले होते :
‘‘ब्राह्मण पे मैं मूतूंगा…कोई प्रॉब्लेम?’’
या पोस्टसोबत त्याने लिहिले :
‘‘उत्तर सगळ्यांनी वाचलेच आहे… आता राग व्यक्त करत आहेत… आग पेटली आहे…
संदर्भ बघा रे डरपोक लोकांनो… संपूर्ण आयुष्य शास्त्रांच्या मागे लपणारे, कोणतेही मौल्यवान कार्य न करणारे, इतरांना तुच्छ दाखवून स्वतःला मोठे समजणारे आळशी लोक…
माझ्यासाठी तुम्ही लोक कायमच मूर्ख (चुतिया) राहाल. ’’
या सगळ्या घडामोडींनंतर…
शुक्रवारी, एका वकिलाने मुंबईत अनुराग कश्यपविरुद्ध तक्रार दाखल केली.
अनुराग कश्यप यांच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करावी आणि एफआयआर नोंदवावा, असे ट्विट त्याने केले आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे किंवा वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असेल, तर ते योग्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे हाताळले गेले पाहिजे. जेणेकरून समाजाचे स्वास्थ्य बिघडणार नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हे ट्विट त्याने मेन्शन केले आहे.
केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने ७ एप्रिल रोजी ‘फुले’ चित्रपटाला ‘U’ प्रमाणपत्र दिले आणि काही सुधारणा सुचवल्या.
त्यामध्ये ‘मांग’, ‘महार’, ‘पेशवाई’ या शब्दांना काढून टाकणे आणि ‘३००० वर्षांची गुलामी’ या ओळीला ‘काही वर्षांपूर्वीची गुलामी’ असे बदलणे अपेक्षित होते.
चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या सर्व सूचनांचे पालन केल्याचे म्हटले आहे. (Anurag Kashyap Controversy)
प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘फुले’ चित्रपटाचे प्रदर्शन ११ एप्रिल रोजी होणार होते.
पण ब्राह्मण समाजातील काही लोकांनी चित्रपटातील दृश्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे प्रदर्शन लांबले आणि आता हा चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. ‘फुले’ हा चित्रपट महात्मा जोतीराव फुले (भूमिकेत प्रतीक गांधी) आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले (भूमिकेत पत्रलेखा) यांच्या जीवनावर आधारित आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट जातीभेद व स्त्रीभ्रूणहत्या/लैंगिक विषमता याविरुद्ध त्यांच्या संघर्षावर प्रकाश टाकतो. शाळेत शिकवायला जाणाऱ्या सावित्रीबाईंवर एक ब्राह्मण मुलगा शेण फेकून मारतो, असे दृश्य दाखवले. त्यावर काही ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला होता. आता अनुराग कश्यपच्या निमित्ताने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे.