Purandar airport : शरद पवारांचा अजित पवारांना फोन

Purandar airport

पुणे : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोबाईलवर थेट कॉल केला. ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे निर्णय घेतील’ या शरद पवाराच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असताना रविवारी थोरल्या पवारांनी धाकट्या पवारांना फोन केल्याने चर्चेला उधाण आले.

शरद पवार आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पुण्यात शरद पवारांना भेटण्याठी पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटायला आले होते. शेतकऱ्यांच्या भावना शरद पवारांनी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी थेट पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना फोन करुन चर्चा केली. पुणे विमानतळासाठी जागा संपादन आणि शेतकऱ्यांचा विरोध या प्रश्नांवर दोघांमध्ये संवाद झाला. पुण्याचे जिल्हाधिकारी यामध्ये लक्ष घालत असल्याची माहिती अजित पवारांनी शरद पवारांना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक थोरल्या आणि धाकटया पवारांनी प्रचारात एकमेकांवर टोकाची टीका केली होती. लोकसभा निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. तर विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला यश मिळाले. अजित पवार महायुतीत सलग दुसऱ्यांदा उप मुख्यमंत्री झाले. त्यानंतर रयत शिक्षण संस्था, साखर महासंघ, बारामतीतील काही संस्थांच्या बैठकीमध्ये पवार काका पुतणे एकत्र बैठकीला उपस्थित राहू लागल्याने दोघांमध्ये तुटलेला संवाद पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. पण अजित पवार यांनी मात्र दोन्ही एकत्र गट येण्याची कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्याचे सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक