Punjab Wins : पंजाब किंग्जची राजस्थानवर मात

Punjab Wins

जयपूर : पुन्हा सुरू झालेल्या आयपीएलच्या अठराव्या मोसमामध्ये रविवारी पंजाब किंग्ज संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा १० धावांनी पराभव केला. या विजयामुळे पंजाबच्या खात्यात १७ गुण झाले असून गुणतक्त्यात पंजाबचा संघ दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. (Punjab Wins)

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने नेहल वधेरा आणि शशांक सिंगच्या अर्धशतकांमुळे ५ बाद २१९ धावा केल्या. पंजाबची अवस्था ३ बाद ३४ अशी असताना वधेरा व कर्णधार श्रेयस अय्यरने चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचून संघाला शतकी टप्पा ओलांडून दिला. बोटाला दुखापत झाली असतानाही श्रेयसने फलंदाजीस येत ३० धावा केल्या. त्यानंतर वधेराने शशांकसोबतही अर्धशतकी भागीदारी रचली. नेहलने ३७ चेंडूंमध्ये प्रत्येकी ५ चौकार व षटकारांसह ७० धावांची खेळी केली. वधेरा बाद झाल्यानंतर शशांक आणि अझमतुल्ला ओमरझाई यांनी अखेरच्या चार षटकांमध्ये ६० धावा वसूल केल्यामुळे पंजाबला २१९ धावांपर्यंत पोहोचता आले. शशांकने ३० चेंडूंमध्ये ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५९ धावा फटकावल्या. ओमरझाई ९ चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला. (Punjab Wins)

पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने राजस्थानला झंझावाती सुरुवात करून दिली होती. अर्शदीपच्या पहिल्याच षटकात जैस्वालने २२ धावा फटकावल्या. या दोघांनी सुरुवातीच्या पाच षटकांमध्येच ७६ धावांची सलामी दिली. अखेर फिरकीपटू हरप्रीत सिंगने वैभवला बाद करून ही जोडी फोडण्यात यश मिळवले. वैभवने १५ चेंडूंमध्ये प्रत्येकी ४ चौकार व षटकारांसह ४० धावा फटकावल्या. हरप्रीतनेच नवव्या षटकात यशस्वीलाही बाद केले. २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करणारा यशस्वी पुढच्याच चेंडूवर बाद झाला. त्याने ९ चौकार व एका षटकारासह ५० धावा केल्या. त्यानंतर ठरावीक अंतराने राजस्थानच्या विकेट पडत राहिल्या. मधल्या फळीतील ध्रुव जुरेलने अखेरच्या षटकापर्यंत विजयासाठी कसोशीने प्रयत्न केले. परंतु, त्याला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. त्यामुळे अखेर राजस्थानला २० षटकांअखेर ७ बाद २०९ धावांपर्यंतच पोहोचता आले. ध्रुवने ३१ चेंडूंमध्ये ३ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. पंजाबकडून हरप्रीतने तीन, तर मार्को यान्सन व अझमतुल्ला ओमरझाई यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Punjab Wins)

संक्षिप्त धावफलक : पंजाब किंग्ज – २० षटकांत ५ बाद २१९ (नेहल वधेरा ७०, शशांक सिंग नाबाद ५९, श्रेयस अय्यर ३०, तुषार देशपांडे २-३७, रियान पराग १-२६) विजयी विरुद्ध राजस्थान रॉयल्स – २० षटकांत ७ बाद २०९ (यशस्वी जैस्वाल ५०, ध्रुव जुरेल ५३, वैभव सूर्यवंशी ४०, हरप्रीत ब्रार ३-२२, मार्को यान्सन २-४१).

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर