मुंबई : प्रतिनिधी : अमेरिकेकडून भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचे सूतोवाच केले जात आहे. भारतातील मासेमारी, चर्मोद्योग, टेस्क्टाईल, जेम्स अँड ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मासिटिकल्स आणि आयटी क्षेत्रालाही आगामी काळात फटका बसण्याचा धोका आहे. अमेरिकेने टॅरिफ वाढवल्यामुळे भारताचा माल अमेरिकेला विकला गेला नाही तर येत्या सहा महिन्यात तीन कोटी भारतीयांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. (Prakash Ambedkar)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातील फक्त एकाच कंपनीला फायदा मिळवून देण्याच्या धोरणामुळे देशातील उद्योग व्यवसायिक आणि कामगारांना बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे, असा धोक्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत भारतीय जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदी यांना सांभाळायचे की आपले उद्योग, व्यवसाय आणि रोजगार जपायचे याचा निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे सांगत त्यांनी भारतीय नागरिकांना मोठे आवाहन केले आहे. (Prakash Ambedkar)
भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. याचा फायदा अंबानी यांना झाला असून, त्याचा तोटा सामान्य भारतीयांना होणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले, “रशियाकडून तेल खरेदी सुरु असल्यामुळे अमेरिकेसोबतचे भारताचे संबंध खराब झाले. अमेरिकेबरोबर संबंध खराब झाल्याने ५०% टॅरिफ लावण्यात आले आहे. भारताचा अमेरिकेसोबत मोठा व्यापार हा टेक्स्टाईल, जेम्स अँड ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मासिटिकल्स आणि पेट्रोलियम पदार्थांमधील आहे.
भारतातील वस्त्रोद्योगातील (टेक्सटाइल्स) ५० ते ६०% माल हा अमेरिकेला जात होता. नव्या टॅरिफ धोरमामुळे भारतात तयार झालेले कपडे आता अमेरिकेत जाणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक कोटी १० लाख लोकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे, ते पुढील काही दिवसांत बेरोजगारी होईल, असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवला केला. (Prakash Ambedkar)
जेम्स अँड ज्वेलरीची भारतातील इंडस्ट्री ट्रम्प टॅरिफमुळे कोसळणार आहे. या उद्योगामध्येही मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होणार आहे. इलेक्टॉनिक्समध्ये एक लाख ८७ हजार, फार्मासिटिकल्स उद्योगांमध्ये एक लाख ६२हजार आणि इतरही उद्योगांमध्ये लाखांवर बेरोजगारी निर्माण होणार असल्याचे संकेत प्रकाश आंबेडकरांनी आकडेवारीसह दिले आहेत. अमेरिकेने टॅरिफ वाढवल्यामुळे भारताचा माल अमेरिकेला विकला गेला नाही तर येत्या सहा महिन्यात तीन कोटी भारतीयांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मासेमारीच्या उद्योगावर अमेरिकेच्या टॅरिफमुळे मोठा परिणाम होणार असल्याचा धोका प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, भारतातील एकूण मासे निर्यातीपैकी ९२ टक्के हिस्सा अमेरिकेला जातो. वाढलेल्या टॅरिफमुळे आता मासेमारी उद्योग संकटात सापडणार आहे. चर्मोद्योगातील ५० टक्के हिस्सा अमेरिकेला जातो. भारतातील अशा विविध उद्योगांचा डेटा गोळा केला तर या सगळ्या उद्योगांमधील चार ते साडेचार कोटी भारतीयांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार आहे, त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतामध्ये स्वतःचे इंटरनेट नाही. गुगलचे जगातील उत्पन्न खूप मोठे आहे, पण त्या तुलनेत भारतातील गुगलचे उत्पन्न केवळ 3 ते 4 बिलियन डॉलर इतके आहे. जर भविष्यात इंटरनेट म्हणजे गुगलने भारतातील सुविधा बंद केली तर, परिस्थिती खूप वाईट होईल. यामुळे आयटी क्षेत्रावर वाईट परिणाम होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इगोमुळे ही परिस्थिती भारतावर येणार आहे. त्यामुळे आता देशवासियांना निर्णय घ्यावा लागेल की मोदींचा इगो जपायचा की आपला रोजगार जपायचा? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. (Prakash Ambedkar)