नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही. ‘‘जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे,’’ असे ते म्हणाले. (PM Modi Warns)
‘‘या घृणास्पद कृत्यामागे असलेल्यांना सोडणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल,’’ असे मोदी यांनी म्हटले आहे.
अमित शहा श्रीनगरमध्ये
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. तेथे ते उच्चस्तरीय बैठक घेतील. दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा तसेच सुरक्षेचा आढावा ते घेतील. दहशतवादी हल्ला आणि शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
दरम्यान, या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. (PM Modi Warns)
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला धक्कादायक आणि वेदनादायक आहे. हे भयानक आणि अमानवी कृत्य आहे. त्याचा निषेध केला पाहिजे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करते, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
सरकारने जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘सरकारने जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करू नयेत. त्या पलीकडे जाऊन जबाबदारी घ्यावी,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.
‘‘जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला भ्याड दहशतवादी हल्ला अत्यंत निंदनीय आहे. या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. हा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो,’’ असे त्यांनी म्हटले आहे. (PM Modi Warns) ‘‘संपूर्ण राष्ट्र दहशतवादाविरुद्ध एक आहे. जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याच्या पोकळ दाव्यांच्या पलीकडे जाऊन सरकारने ठोस उपाययोजना राबवावी. सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अशा क्रूर घटना पुन्हा घडू नयेत आणि निष्पाप नागरिकांना अशा प्रकारे आपले प्राण गमवावे लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी, ’’ अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.