NCP Anniversary : राष्ट्रवादी काँग्रेसः २६ वर्षांची वाटचाल दहा मुद्यांद्वारे जाणून घेऊया

NCP Anniversary

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला मंगळवारी १० जून रोजी २६ वर्षे पूर्ण होत आहेत. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या या पक्षात रौप्यमहोत्सवी वर्षात फूट पडली. आज पक्षाची दोन शकले झाली आहेत. दहा प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजवरच्या वाटचालीचा मागोवा घेऊया. (NCP Anniversary)

  • विजय चोरमारे

१. श्रीमती सोनिया गांधी राजकारणात सक्रीय झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माच्या मुद्यावरून काँग्रेसविरोधात रान उठवले. शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत तो मुद्दा उपस्थित केला. त्यावरुन त्यांचे काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले.

२. काँग्रेसमधून निलंबनानंतर शरद पवार यांनी मुंबईत १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पाठोपाठ आलेली विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली. या निवडणुकीत राष्ट्रवादीला विधानसभेमध्ये ५८ जागा मिळाल्या. (NCP Anniversary)

३. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी दरी निर्माण झाली असतानाही १९९९ मध्ये सरकार स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा शिवसेना-भाजप युतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या. त्यांनी डाव्या आघाडीतील पक्षांसोबत राज्यात सरकार स्थापन केले. पक्षाच्या स्थापनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आला.

४. राष्ट्रवादी काँग्रेसने तरूणांना मंत्रिमंडळात संधी दिली. त्यांनी आक्रमकपणे काम केले, त्याचा परिणाम २००४च्या निवडणुकीवर झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वाधिक ७१ जागा मिळवणारा पक्ष ठरला. आघाडीच्या सूत्रानुसार सर्वाधिक जागा मिळवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होता. परंतु तीन जादा मंत्रिपदावर तडजोड करून मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिले. यावरून अजित पवारांसह पक्षातील काही नेत्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले. (NCP Anniversary)

५. २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा कमी झाल्या, परंतु काँग्रेससोबत तिस-यांदा सत्तेत आला.

६. आदर्श घोटाळ्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस टार्गेटवर आली. सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. विधानसभा निवडणुकीत सिंचन घोटाळाच भाजप-शिवसेनेच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य राहिला. सिंचन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची प्रतिमा मलीन झाली.

७. २०१४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती वाताहत झाली. दहा वर्षांपूर्वी सर्वात मोठा असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला.

८. सत्ता स्थापनेच्या खेळात राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपने सरकार स्थापन केले. भाजपला पाठिंबा देण्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेवर चौफेर टीका झाली. सत्तेच्या काळात भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या आपल्या पक्षातील नेत्यांना वाचवण्यासाठी पवारांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जाते. परंतु त्यामुळे पवारांच्या राजकीय कारकीर्दीला कायमचा डाग लागला. (NCP Anniversary)

९. २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना युतीसाठी अत्यंत सोपी असल्याचे मानले जात होते. परंतु ७९ वर्षांच्या शरद पवार यांनी प्रचाराचा झंझावात निर्माण केला आणि एकहाती निवडणूक फिरवली. भाजपला १०५ जागांवर रोखले. दोन्ही काँग्रेस शंभरच्या जवळ पोहोचल्या. त्यामुळे शिवसेनेने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. ती भाजपने नाकारली. त्यातून महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले.

१०. दोन जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांच्यासह चाळीस आमदारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी पक्षाचे चिन्ह नाव या दोन्हींवर दावा केला. निवडणूक आयोगाने तो दावा मान्य केला, परंतु ते प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

Related posts

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून एके-४७ मधून फायरिंग

काँग्रेसने आयआयटी स्थापन केल्या, तुम्ही गोमुत्र, शेण गोळा करायला सांगता