- ललित मौर्य
आजवर कर्करोग म्हणजे कॅन्सर हा प्रामुख्याने वृद्धापकाळाशी संबंधित आजार मानला जात होता. पण आता वयाच्या पन्नाशीतच तरुणांमध्ये विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे जगभरात आढळून येत आहे. आजच्या तरुणांची ‘जैविक वयोमर्यादा’ म्हणजे बायोलॉजिकल एज त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा अधिक वेगाने वाढत आहेत. शरीरातील पेशी आणि अवयव अकाली वृद्ध होत आहेत. त्यामुळे कमी वयातच कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. (Rise of Cancer in young people)
दीड लाख लोकांची तपासणी
अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या आणि प्रतिष्ठित नेचर मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात हा निष्कर्ष समोर आला. संशोधनासाठी दीड लाखांहून अधिक लोकांची आरोग्यविषयक, जीवनशैलीविषयक आणि जैविक माहिती तपासण्यात आली.
कॅलेंडरनुसार असलेले वय म्हणजे कालानुक्रमिक वय; तर शरीरातील पेशी, ऊती आणि अवयव प्रत्यक्षात किती वृद्ध झाले आहेत, हे दर्शवणारे वय म्हणजे जैविक वय. आजच्या तरुणांचे जैविक वय त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा अधिक वेगाने वाढत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. (Rise of Cancer in young people)
शरीराचे वय आणि जैविक वय
संशोधनात असेही दिसून आले की शरीराचे कालानुक्रमिक वय आणि जैविक वय यांच्यात जितका मोठा फरक असेल, तितका कर्करोगाचा धोका वाढतो. उदाहरणार्थ, १९९० नंतर जन्मलेल्या तरुणांचे शरीर १९६० च्या दशकात जन्मलेल्या लोकांच्या तुलनेत अधिक वेगाने वृद्ध होत असल्याचे आढळले. त्यामुळे ५५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये फुफ्फुस, पोट, गर्भाशय, मोठे आतडे (कोलन) आणि मलाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.
संशोधकांच्या मते, अनेक आधुनिक सवयी शरीराचे अकाली वृद्धत्व वाढवत आहेत. त्यामध्ये— लठ्ठपणा, असंतुलित आणि प्रक्रिया केलेला आहार, मद्यपान, तंबाखूचे सेवन, वायू प्रदूषण, सतत बसून राहण्याची जीवनशैली आणि मानसिक ताण यांचा मोठा वाटा आहे. हे सर्व घटक शरीरावर दीर्घकालीन परिणाम करून पेशींचे वृद्धत्व वेगाने वाढवतात. (Rise of Cancer in young people)
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ
ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या एका अभ्यासानुसार, १९९० नंतर जगभरात ५० वर्षांखालील व्यक्तींमध्ये कर्करोगाच्या नव्या रुग्णांमध्ये सुमारे ७९ टक्के वाढ झाली आहे. त्याच काळात या वयोगटातील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या संशोधनाचा उद्देश लोकांमध्ये भीती निर्माण करणे नाही, तर वेळेत धोका ओळखणे हा आहे. भविष्यात साध्या रक्ततपासण्यांद्वारे एखाद्या तरुणाचे शरीर आतून किती वेगाने वृद्ध होत आहे, हे ओळखता आले तर कर्करोग होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय करता येऊ शकतील, असं संशोधकांनी म्हटले आहे.
(सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या (सीएसई) डाऊन टू अर्थ च्या सौजन्याने)