कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका आणि आय.आय.टी. मंडी यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेने शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे.
महानगरपालिकेने प्रथमच अग्रगण्य तांत्रिक संस्था आय.आय.टी.मंडी यांचे थेट तांत्रिक मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे.आज महानगरपालिका व आयआयटी मंडी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. ही संकल्पना महापौर रुपाराणी निकम यांच्या पुढाकारातून साकार झाली आहे. सदरचा करार महापौर निकम, आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचेशी आय.आय.टी.मंन्डी यांच्यामध्ये झाला. कोल्हापूर शहराला आधुनिक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित शहर बनविण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रमास उपमहापौर अक्षय जरग, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, आयआयटी मंडीचे डीन (फायनान्स) डॉ. सत्त्वशील पोवार, डॉ. अमित शुक्ला व हर्षवर्धन साळुंखे उपस्थित होते. (MoU between Kolhapur Municipal Corporation and IIT Mandi)
देशातील स्मार्ट सिटी मॉडेलकडे वाटचाल
देशातील विविध स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये आयआयटी संस्थांचे तांत्रिक सहकार्य घेतले जाते. शहरी नियोजन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT), डेटा अॅनालिटिक्स व पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्रांतील आयआयटीचा अनुभव कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी मंडीसोबतचा हा करार शहराच्या प्रगतीसाठी ‘गेम चेंजर’ ठरण्याची अपेक्षा आहे. (MoU between Kolhapur Municipal Corporation and IIT Mandi)
यशस्वी अनुभवावर आधारित पुढचे पाऊल
आयआयटी मंडीने यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच्या सहकार्यांतर्गत नवरात्र उत्सवात अंबाबाई मंदिर परिसरात एआय आधारित क्राऊड मॉनिटरिंग प्रणाली यशस्वीपणे राबविली होती. तसेच अलीकडील ज्योतिबा यात्रेतही ही प्रणाली प्रभावीपणे वापरण्यात आली. या दोन्ही उपक्रमांना प्रशासन व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून गर्दी व्यवस्थापन अधिक सुरक्षित व सुकर झाले आहे.
या सहकार्यामुळे कोल्हापूरमध्ये महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. यामध्ये सेफ सिटी प्रकल्प, स्मार्ट सीसीटीव्ही व एआय आधारित देखरेख प्रणाली, रिअल-टाइम मॉनिटरिंग, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, पर्यटन स्थळांवरील क्राऊड मॅनेजमेंट, डिजिटल सुविधा, जीआयएस आधारित शहर नियोजन, डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट, प्रदूषण नियंत्रण, स्मार्ट लाइटिंग, कचरा व्यवस्थापन, पार्किंग सोल्युशन्स व इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची उभारणी यावरही भर दिला जाणार आहे. (MoU between Kolhapur Municipal Corporation and IIT Mandi)
आयआयटी मंडीचा अनुभव शहराच्या विकासाला बळ
आयआयटी मंडी ही संस्था देशातील अग्रगण्य दहा श्रेणीतील आयआयटींपैकी एक असून, स्मार्ट सिटी उपाययोजना, AI, ड्रोन तंत्रज्ञान व अर्बन इनोव्हेशन क्षेत्रात तिचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे कोल्हापूरला जागतिक दर्जाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळणार असून, शहर अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक व नागरिक-केंद्रित बनण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेचा हा निर्णय केवळ एक सहकार्य नसून शहराच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणारा परिवर्तनाचा टप्पा आहे. यामुळे कोल्हापूर शहर अधिक सुरक्षित, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिक-केंद्रित बनणार असून, महाराष्ट्रातील एक आदर्श स्मार्ट शहर म्हणून उदयास येण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे. (MoU between Kolhapur Municipal Corporation and IIT Mandi)