देशासमोर आता नागरिकता चोरीचे  मोठे संकट : मिनाक्षी नटराजन

Meenakshi Natarajan's appeal to save democracy

जमीर काझी :  मुंबई :   देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती. त्यानंतर सीटचोरी होऊन मग पक्ष चोरी केले जाऊ लागले, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागले आहे, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणाच्या प्रभारी मिनाक्षी नटराज यांनी केला. (Meenakshi Natarajan’s appeal to save democracy)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने टिळक भवन येथे “लोकशाही वाचवा निर्धार सभा” आयोजित सभेत त्या बोलत होत्या. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क व अधिकार नाकारले जात आहेत, म्हणून वेळीच सावध व्हा आणि लोकशाही वाचवण्यासाठी आवाज बुलंद करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या सभेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे प्रमुख पाहुणे तर अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज  पाटील,  तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, राष्ट्रीय प्रवक्ते, चरणजित सप्रा, ज्येष्ठ समाजसेविका उल्का महाजन, तिस्ता सेटलवाड, चित्रा राणे, जयंत दिवाण आदी उपस्थित होते. (Meenakshi Natarajan’s appeal to save democracy)

राज्यसभा नव्हे तर जनसभा महत्वाची

यावेळी  मिनाक्षी नटराजन म्हणाल्या की, माझा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीरपणे रद्द केला हा महत्वाचा प्रश्न नाही तर माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी एक मोठे षडयंत्र रचले होते. भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही त्यांनी तिसरा उमेदवार उभा केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. आमच्या तक्रारीची दखलही न घेता निर्णय देण्यात आला. माझ्या उमेदवारीवर आक्षेप घेऊन मला पुरेसा वेळ व संधी दिली नाही पण झारखंडमधील एका उमेदवाराला मात्र त्याच्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २४ तासांचा वेळ दिला, आमचे ऐकूणही घेतले नाही. यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला व लोकांनी आवाज उठवला. माझ्यासाठी राज्यसभा नाही तर जनसभा अधिक महत्वाची आहे, असेही नटराजन म्हणाल्या.

मनुवादी विरुद्ध संविधानवादी

 प्रदेशाध्यक्ष  सपकाळ  म्हणाले की, ‘ नटराजन यांचा राज्यसभेचा अर्ज बेकायदेशीरपणे रद्द करून  लोकशाहीवरच अन्याय केला आहे. देशात आज ‘करो या मरो’ची परिस्थिती असून आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची गरज आहे. देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी हे दोनच विचार आहेत आणि लोकशाही व संविधान वाचवणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे, असे सांगितले.

देशाची सद्यस्थिती ब्रिटीश राजवटीपेक्षा वाईट

तुषार गांधी  म्हणाले की, ‘देशातील आजची परिस्थिती ब्रिटीश राजवटीपेक्षा वाईट आहे. सध्या वैचारिक गुलाम बनवले जात आहे, या सरकार विरोधात रस्त्यावरची मोठी लढाई लढावी लागणार आहे. सरकारविरोधात मोठा लढा निर्माण केला तरच सत्तेला हादरे बसतील पण मोठा विरोधी आवाजच होत नाही म्हणून सरकार त्याचा फायदा उठवत आहे. संविधानाला विरोध हा काही आता केला जात नाही तर संविधान निर्माण होत असल्यापासूनच त्याला विरोध केला जात होता. सत्ताधारी भाजपा संविधानाला सशक्त करणाऱ्या संस्थांवरच घाला घालत आहे, या संस्था टिकल्या तरच संविधान टिकेल. सरकारच्या नाकात दम  आणणाऱ्या आंदोलनाची गरज असल्याचे सांगितले. (Meenakshi Natarajan’s appeal to save democracy)

Related posts

तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो….

आमदार क्षीरसागरांनी मांडले वकिलांना संरक्षण देणारे महाराष्ट्र अधिवक्ता विधेयक

राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; उद्धव ठाकरेंचे भाजपा विरुद्ध रणशिंग