दादा तू पळ, मी मागे आहेच

Manifestos of both NCP factions were released in Pune

पुणे :  प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असून राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रसिद्ध केला. प्रचारसभेमध्ये सुप्रिया सुळेंच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी ‘दादा तू पुढे पळ, मी मागेच आहे’, असे उत्तर दिले.

अजित पवार म्हणाले की, ”तिने मला सांगितलं दादा, तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं मी तुझ्या मागे आहेच.” अजित पवारांचे हे उत्तर ऐकून सगळ्यांबरोबर सुप्रिया सुळेंनाही हसू आवरता आले नाही. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की “तुम्ही माझं सोशल मिडिया फॉलो करता. गेले आठ दिवस मी कुठे आहे हे तुम्हाला त्यातून नक्की कळेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Manifestos of both NCP factions were released in Pune)

जाहीरनामा प्रसिद्ध् केल्यानंतर अजित पवार म्हणाले की, आज मी नेता म्हणून नाही, तर पुणेकर म्हणून बोलत आहे. कारण जिथं आपलेपणा असतो, तिथं कारणं दिली जात नाहीत. तिथं जबाबदारी घेतली जाते. गेल्या सहा महिन्यांत वॉर्डनिहाय सर्वेक्षण, पुणेकरांशी थेट संवाद आणि त्यांच्या रोजच्या समस्या समजून घेत हा ठोस वचनांचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख गोष्टी

१) या जाहीरनाम्याचा पाया ‘पाच कामं – पक्का वादा’ आहे. दररोज नळाद्वारे, पुरेशा दाबासह पाणीपुरवठा. टँकर माफियांवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही. पाण्याची गळती थांबवून पाईपलाईन उन्नतीकरण आणि वेळेत दुरुस्त्या करणार.

२) रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणार. मिसिंग लिंक प्रकल्प आणि विकास आराखड्यातील रस्ते ठराविक कालमर्यादेत पूर्ण करणार. नव्यानं समाविष्ट गावांमध्येही शहर मानकांनुसार रस्ते उभारणार.

३) पुणे खड्डेमुक्त शहर करणार. खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदाराला वेळेची मर्यादा राहणार. कामाकडे दुर्लक्ष केल्यास दंड आणि संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार. टिकाऊ रस्ते उभारण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार.

४) स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन कामकाज नीट होणार. आज निर्माण होणाऱ्या ९८० एमएलडी सांडपाण्यापैकी प्रक्रिया क्षमतेतील तफावत भरून काढत नद्यांमध्ये जाणारं प्रदूषण थांबवणार. स्वच्छता ही मोहीम नव्हे, तर दररोजच्या कामातील व्यवस्था बनणार.

५) आरोग्यसेवा सुलभ आणि परवडणारी होणार. वॉर्ड निहाय दवाखाने, सुधारित व नवीन रुग्णालये, खाटांची वाढ, मातृसेवा, कर्करोग उपचार, बर्न वॉर्ड, आयसीयू, टेलिमेडिसिन आणि गरीबांसाठी विमा सहाय्य सेवा उपलब्ध राहणार.

६) विकास हा पर्यावरणाचं नुकसान करून होणार नाही. नाले, ओढे, ड्रेनेज स्वच्छ करणं आणि हरित क्षेत्रांचं संरक्षण करणं, अतिक्रमण रोखणं, पूर व प्रदूषणावर दीर्घकालीन उपाय करणं, पर्यावरणाशी समतोल राखणं हाच विकासाचा खरा मार्ग आहे. व्यवस्था करताना सन्मान आणि स्थैर्य महत्त्वाचं आहे. पुनर्वसन सन्मानानं झालं पाहिजे. उपजीविकेचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी मोफत पीएमपीएमएल बस प्रवास, मोफत मेट्रो प्रवास, छोट्या घरांसाठी शून्य मालमत्ता कर सवलत आणि शिक्षण थांबू नये म्हणून मोफत टॅब्लेट्स दिले जाणार.

७) लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आणि कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज, स्वाभिमानानं उपजीविकेसाठी सहाय्य केलं जाणार.

८) शिक्षण हा पाया आहे. म्हणूनच १५० “पुणे मॉडेल स्कूल” उभारणार. जागतिक दर्जाचं सार्वजनिक शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुणवत्तेची हमी देणार. आज ९०% विद्यार्थी ऑनलाईन शिकू इच्छितात, त्यामुळे डिजिटल शिक्षणासाठी मोफत टॅब्लेट्स अत्यावश्यक आहेत. (Manifestos of both NCP factions were released in Pune)

हा जाहीरनामा पुढील पाच वर्षांसाठी आहे. पूर्वी दिलेल्या जबाबदाऱ्या जशा पूर्ण केल्या, तसाच पुण्याची दिशा बदलण्याचा हा संकल्प आहे. हा जाहीरनामा कौतुकासाठी नाही, मोजमापासाठी आहे. दररोज पाणी नाही, रस्ते खराब झाले, आरोग्यसेवा मिळाली नाही किंवा प्रदूषण वाढलं, तर आम्हाला जाब विचारा. ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो. मी हा जाहीरनामा वचन देणारा म्हणून नाही, तर जबाबदारी स्वीकारणारा पुणेकर म्हणून पुण्यासमोर ठेवला आहे, असे अजित पवार म्हणाले. (Manifestos of both NCP factions were released in Pune)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर