एमएच– सीईटी मध्येही मोठा घोटाळा : सचिन सावंत

Major Scam in MH-CET

जमीर काझी : मुंबई : देशभरात नीट (NEET) पेपरफुटीने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली असताना राज्यात एमएच- सीईटी मोठा घोटाळा झाला आहे. दहावी बारावीला जेमतेम ३५-४० टक्के मार्क्स मिळालेल्याना  या परीक्षेत १०० पर्सेंटाईल्स पडलेले आहेत, या प्रकरणाची उच्चस्तरीय  चौकशी करून दोषींनी कठोर शिक्षा करा, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव  सचिन सावंत यांनी केली आहे.

टिळक भवन येथे  मंगळवारी त्यांनी  एमएच- सीईटी परिक्षेतील घोटाळ्यावर पुराव्यानिशी  सविस्तर माहिती दिली.  ते म्हणाले की,’ या परिक्षेचा अभ्यासक्रम हा ११-१२ वीचा असतो, १० वी १२ परिक्षेत जेमतेम मार्क्स मिळवलेल्या २२ विद्यार्थ्यांना एमएच सीईटीमध्ये मात्र १०० पर्सेंटाईल मिळालेले आहेत. ज्या विद्यार्थ्याला दहावीत  ३७ टक्के मार्क्स मिळाले त्याला एमएच सीईट मध्ये ९९.९७१ टक्के पर्सेंटाईल मिळाले आहेत. बारावीत ज्यांना ५१ टक्के मार्क्स मिळाले अशा दोन विद्यार्थ्यांना एमएच सीईटमध्ये १०० पर्सेंटाईल, ४५ टक्के मार्क्स पडलेल्याला १०० पर्सेंटाईल व ३९ टक्के मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्याला १०० पर्सेंटाईल पडलेले आहेत. (Major Scam in MH-CET)

बारावीत ३५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला १०० पर्सेंटाईल

बारावीला ज्या विद्यार्थ्याला ३५ मार्क्स पडले त्यालाही १०० पर्सेंटाईल पडले आहेत. एमएच- सीईटी गणितात १०० पर्सेंटाइल मिळवलेल्या रँक १, २, ३, ४, ५, ६, १५, १६, १७ आणि १८ या सर्व विद्यार्थ्यांचे एचसीसी गणितातील सरासरी गुण फक्त ६४.३% होते. या राज्यातील दहा अव्वल विद्यार्थ्यांपैकी सहा जणांचे गुण या सरासरीपेक्षाही कमी होते — त्यांचे एचएससी गणितातील गुण अनुक्रमे ६०, ५४,५३,५३,४०, आणि ३५ होते. सीईटी मधील टॉप २० रँकर्सपैकी सहा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत ६०% पेक्षाही कमी गुण मिळाले. रँक १, २, ५, १२, १५ आणि १८ — ज्यांचे सीईट पर्सेंटाइल ९९.९९ किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्यांना एचएससी पीसीएम मध्ये ६०% पेक्षा कमी गुण मिळाले. एका टॉपर ला सीईटी गणितात १०० पर्सेंटाइल मिळाले, पण बोर्डातील एकूण पीसीएम गुण फक्त ३९% होते. टॉप २० मधील १० विद्यार्थ्यांना सीईटी गणितात परफेक्ट १०० पर्सेंटाइल मिळाले. मात्र त्यांच्या एचएससी गणितातील गुण ३५ ते ९७ या दरम्यान आहेत, म्हणजे तब्बल ६२ गुणांचे अंतर आहे.  एका विद्यार्थ्याला सीईट गणितात १०० पर्सेंटाइल, पण एचएससी गणितात फक्त ३५% गुण म्हणजे ६५ गुणांचे अंतर आहे. एचएसी पीसीएम मध्ये फक्त ३९% गुण असूनही राज्यातील टॉप २० मध्ये स्थान मिळाले आहे. (Major Scam in MH-CET)

गणितात नापास विद्यार्थ्याला ९९.९७ पर्सेंटाइल

रँक ६६ चा डेटा देखील गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे. या विद्यार्थ्याला १० वीला गणितात २२ मार्क्स मिळाले होते, तर १२ वीत ३३ मार्क्स मिळाले म्हणजे तो गणितात सपशेल नापास आहे, पीसीएम मध्ये ४७.६७ टक्के मार्क्स आहेत.  त्याला सीईटी मध्ये मात्र ९९.९७ पर्सेंटाईल मिळाले आहेत. सीईटी मध्ये अत्यंत उच्च पर्सेंटाइल मिळवूनही बोर्ड परीक्षेतील कामगिरी त्याच प्रमाणात दिसत नाही. अशा उदाहरणांमुळे सीईटी आणि एचएससी या दोन्ही मूल्यमापन पद्धतींमध्ये मोठी विसंगती असल्याचे  स्पष्ट होते. हा चमत्कार कसा झाला, याचे उत्तर उच्च व तंज्ञ शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी द्यावे. तसेच या परिक्षा कोण नियंत्रित करतो, या परिक्षांवर जोशी नामक व्यक्तीचा काय संबंध आहे, याचाही खुलासा केला पाहिजे, असे सावंत म्हणाले.

भाजप सरकारच्या राज्यात परीक्षा घोटाळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परिक्षा पे चर्चा’ वर दरवर्षी मोठे प्रवचन देत असतात पण त्यांच्याच कार्यकाळात व्यापम सारखे परिक्षा घोटाळे फोफावत आहेत ही चिंतेची बाब आहे. भाजप सरकार असलेल्या राज्यातच परिक्षेत गडबड घोटाळे वाढले आहेत व त्याचा संबध भाजपा नेत्यांशी असल्याचे उघड झाले आहेत. एमएच सीईटीच्या परिक्षेतील घोटाळ्यावर मी एक्स या सोशल मीडियावरून एक पोस्ट केली होती, त्यावर या परिक्षा घेणाऱ्या सेलकडून यादी अस्पष्ट आहे असा खुलासा करण्यात आला आहे. या यादीतीला विद्यार्थ्यांची नावे सार्वजनिक होऊ नयेत म्हणून ती झाकण्यात आली होती. आता मी पुन्हा एमएच सीईटी कमिशनला एक यादी व पत्र देणार आहे, त्यावर त्यांनी खुलासा करावा. एमएचसीईट परिक्षा सेलमध्ये मागील ८-१० वर्षे तेच अधिकारी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला . (Major Scam in MH-CET)

Related posts

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. आर.के. कामत यांची निवड

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विलास लवांडेंना अटक, संग्राम भंडारे मोकाट