संघाचा डाव, मधू किश्वर यांच्या खांद्यावरुन मोदींवर नेम…?

The Sangh's Gambit, Modi's Game

  • विजय चोरमारे

गेले काही दिवस सोशल मीडियावर सुब्रमण्यम् स्वामी यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप स्वामी करीत आहेत. पाठोपाठ मधू किश्वर नामक कार्यकर्तीनं सोशल मीडियावरून मोदींच्यावर स्त्रियांच्यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं चारित्र्य हननाचं अस्त्र त्यांच्यावर उलटलं आहे. विशेष म्हणजे हे चारित्र्यहनन कुणी काँग्रेसवाले करीत नाहीत, तर भाजपशी संबंधित मंडळीच करीत आहेत. लोकसभेत उभं राहून जेव्हा निशिकांत दुबे इंदिरा गांधी आणि पंडित नेहरूंचं चारित्र्यहनन करीत होते, तेव्हा टाळ्या वाजवणारे भाजपचे गणंग आता गप्प आहेत. एरव्ही मोदींच्या समर्थनासाठी तुटून पडणारे वाचाळवीरही लपून बसले आहेत. (madhu kishwar on modi)

सुब्रमण्यम स्वामींचे आरोप जुने आहेत, आणि ते सवंगपणे केलेले आहेत. त्यामुळं आता त्यांची चर्चा करण्याच गरज नाही. परंतु मधु किश्वर यांच्या आरोपांची चर्चा करायला हवी. त्याअनुषंगाने भारतीय राजकारणाचा भारतीय जनता पक्षाने खालावलेला स्तर समजून घ्यायला हवा. (madhu kishwar on modi)

मधु किश्वर कोण आहेत?

मधू किश्वर या मूळच्या उदारमतवादी आणि पुरोगामी म्हणता येतील, अशा स्त्रीवादी कार्यकर्त्या. एकेकाळी डाव्या विचारसरणीच्या जवळच्या मानल्या जात होत्या. १९७८ मध्ये त्यांनी ‘मानुषी’  नावाचे नियतकालिक सुरू केले. स्त्रीवादी आणि सामाजिक प्रश्नांवर ते होते. madhu kishwar on modi

२०१४ला केंद्रात मोदींचे सरकार आले आणि अनेकांनी आपले बुरखे काढून ते उजव्या कळपात सामील झाले. मधु किश्वर अशांपैकी एक होत्या. परंतु त्या २०१४ आधीच मोदींच्या गटात सामील झाल्या होत्या. `मोदी, मुस्लिम्स अँड मीडियाः व्हॉईसेस फ्रॉम नरेंद्र मोदीज् गुजरात` हे त्यांचे पुस्तक २०१४ मध्येच प्रसिद्ध झाले आहे. `मोदीनामा` या मोदींच्या चरित्रग्रंथाच्या लेखिका म्हणूनही त्यांची ओळख आहे.

अल्पावधीत त्यांनी मोदी सरकार आणि भाजपची समर्थक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या या संधिसाधू वर्तनावर सामाजिक, वैचारिक क्षेत्रातून टीकाही झाली. तर अशा या मधु किश्वर यांची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सार्वजनिक व्यवहारात खासगीमध्ये अशा गोष्टी सातत्यानं चर्चेत होत्या. परंतु त्यांचा कुणी जाहीर उच्चार करीत नव्हते. आज भाजपमध्ये असलेल्या दिल्लीच्या कपिल मिश्रा यांनी आम आदमी पक्षात असताना विधानसभेत जाहीरपणे काही गोष्टींचा उल्लेख केला होता. कपिल मिश्रा यांचे त्यावेळचे भाषणही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (madhu kishwar on modi)

मधु किश्वर यांच्या निवेदनाचा सारांश

मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवले. मी त्यांच्याविषयी लिहिलेल्या माझ्या पुस्तकाची प्रत देण्यासाठीही त्यांना भेटायला गेले नाही. त्यांचे आवडते अधिकारी भारत लाल यांच्याकडून सही नसलेली पुस्तकाची प्रत पाठवली, असं त्यांनी म्हटलंय.

मोदींच्या जवळिकीमुळे काही महिलांना खासदारकी आणि मंत्रीपदे मिळाली, त्यांची नावे संघाच्या वर्तुळात सुरुवातीपासूनच कुजबुजली जात होती. म्हणूनच मी सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली, असं त्यांनी म्हटलं आहे. (madhu kishwar on modi)

हरदीप पुरी आणि एस. जयशंकर यांचीही चर्चा असायची आणि २०१४ मध्ये मी अमेरिकेत व्याख्यानांसाठी गेले असताना, तिथेही त्यांच्या ऐय्याशीच्या कथा कानावर आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  मधु किश्वर यांनी मोदींशी नावे जोडलेल्या काही महिलांच्या नावांचा उल्लेखही निवेदनात केला आहे.

गुजरातमधील मोदींच्या काही जवळच्या लोकांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील, तसेच ते प्रचारक असतानाच्या त्यांच्या रंगेल कथा आपणास सांगितल्याचा दावाही मधु किश्वर यांनी केला आहे. त्या कथा ऐकून मला मोदींबद्दल इतकी घृणा वाटू लागली की ज्या कार्यक्रमांना—लग्नसमारंभांसह—मोदी येण्याची शक्यता असे, तिथे जाणेही मी टाळू लागले, असं त्यांनी म्हटलंय. भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय यांचा उल्लेख मधु किश्वर यांनी पॉर्न पेडलर असा केला असून त्यांची नियुक्ती हा पक्षाच्या नेतृत्वाच्या वृत्तीचा पुरावा असल्याचं म्हटलंय. (The Sangh’s Gambit, Modi’s Game)

भाजपमधली शांतता चक्रावणारी

खरेतर कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही पदावरील व्यक्तिबाबत असे आरोप झाले तर त्यासंदर्भात अनेक बाजूंनी प्रतिक्रिया येऊ शकतात. पहिले म्हणजे संबंधित नेत्याचे समर्थक आरोप करणा-या व्यक्तिवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठवतील. आरोप खोडून काढतील. आणि उलट काही आरोप करतील. परंतु एरव्ही आकांडतांडव करणारे रविशंकर प्रसाद यांच्यापासून संबित पात्रांपर्यंत कुणीही याचा प्रतिवाद करण्यासाठी पुढे आलेले नाही. नवनाथ बन, केशव उपाध्येही `सूर्यावर थुंकण्याचा प्रकार` वगैरे युक्तिवाद करायला आलेले नाहीत.

असे आरोप करणा-या व्यक्तिच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाऊ शकतो. पोलिस कारवाई केली जाऊ शकते. सगळ्या यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत. कुभांडं रचून विरोधकांना तुरुंगात सडवण्याची तुमची ख्याती आहे. असे असताना मोदींचं चारित्र्यहनन करणा-या व्यक्तिच्या विरोधात चार दिवसांनंतरही कारवाईसाठी कुणी पुढं आलेलं नाही.

मधु किश्वर यांच्या या आरोपांनंतर राष्ट्रीय राजकारणात अनेक प्रश्न चर्चेत आले आहेत. अर्थात विषय मोदींच्या संदर्भातला असल्यामुळं कुठल्याही मेनस्ट्रीम चॅनलवर त्याची दखल घेतली जाणार नाही. एरव्ही राहुल गांधींचं काही लफडं असतं तर सगळ्यांनी त्यांची जुनी नवी फुटेज वापरून स्टोरी रंगवल्या असत्या. पण मोदींशी संबंधित विषय असल्यामुळं तसं धाडस कुणी करणार नाही.

इथं या विषयावर लिहिण्याचं कारण त्याची राजकीय अंगानं चर्चा करणं हाच आहे. सवंगपणे काही चर्चा करायची नाही. म्हणूनच मधु किश्वर यांनी उल्लेख केलेल्या महिलांची नावेही टाळली आहेत. आपल्याला यामागचे राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. (The Sangh’s Gambit, Modi’s Game)

आरोपांचे टायमिंग चर्चेत

.या सगळ्यातून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे मधु किश्वर यांनी आरोपांचा बाँब टाकण्यासाठी हीच वेळ का निवडली असावी? त्याचं कारण असं सांगता येतं की, आजवरच्या राजकीय प्रवासात मोदी सध्या सर्वाधिक कमकुवत स्थितीत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या विश्वगुरुच्या फुग्याला टाचणी लागली आहे. देशांतर्गतही राहुल गांधींनी त्यांचे पुरते वस्त्रहरण केले आहे. संसदेत महिलांना घाबरून पळून जाणारे पंतप्रधान म्हणून त्यांची नाचक्की झाली आहे. अमेरिकेशी केलेल्या करारामुळे त्यांचे हितसंबंध उघड झाले आहेत. एप्स्टिन फाईलमध्ये नाव आल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. आणि इराणसंदर्भातील धोरणामध्येही मार खाल्ला आहे. त्याचे परिणाम देशातील सामान्य लोकांना सोसावे लागत आहेत. ट्रोल गँगही गॅस आणि पेट्रोल टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे गर्भगळीत झाली आहे. खिंडीत सापडलेल्या मोदींवर मोठा बाँब टाकून त्यांना अडचणीत आणण्याचे हे प्रयत्न असल्याचे मानले जाते. (madhu kishwar on modi)

आरएसएसचे कनेक्शन… ?

एकट्या मधु किश्वर हे धाडस करू शकतात की त्यांच्यामागे आणखी कुणी असू शकते, असाही प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा स्वाभाविकपणे नाव पुढे येते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. वाजपेयी-अडवाणींच्या काळातही भाजपवर वर्चस्व टिकवून ठेवलेल्या संघाला मोदी-शहा यांनी आपल्या नियंत्रणात ठेवले आहे. त्यामुळे संधी साधून संघाने हा गेमप्लान आखल्याची चर्चा सुरू आहे.

पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की, एखाद्या नेत्याचे असे चारित्र्यहनन करणे योग्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर एका शब्दात नाही, असे देता येते. पण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात.

लोकसभेत विरोधी सदस्यांनी मोदी किंवा अदानी अशी नुसती नावे उच्चारली तरी ओम बिर्ला अडवतात. परंतु त्याचवेळी निशिकांत दुबे नावाचे भंपक खासदार पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून ते सोनिया गांधींपर्यंत अनेकांच्या चारित्र्यावर जाहीर शिंतोडे उडवतात. तेव्हा ओम बिर्ला निर्लज्जपणे ऐकून घेत असतात. भाजपचे सदस्य खिदळत असतात. उत्तेजन देत असतात. जेव्हा एखादे दुधारी शस्त्र तुम्ही दुस-यावर वापरता, तेव्हा ते तुमच्यावर उलटत असते.

इथे कुणी काँग्रेसवाल्याने मोदींचे चारित्र्यहनन केलेले नाही. त्यांच्या पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामीच बेछूटपणे आरोप करताहेत. मोदींच्या चरित्रकार असलेल्या आरएसएसच्या वर्तुळातल्या मधु किश्वर आरोप करताहेत. म्हणजे तुमचेच लोक आहेत. कारण त्यांना माहीत आहे की, इथे असलेच खेळ चालतात.

संजय जोशी यांचे नाव अनेकांना आठवत असेल. संघ परिवारातले मोठे नाव. संघटक. परंतु त्यांना मोठी संधी मिळत असतानाच त्यांची एक अश्लील सीडी बाहेर आली. त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. त्यामागे उघडपणे नरेंद्र मोदींचं नाव घेतलं जातं.योगायोग म्हणजे संजय जोशी गेले काही दिवस पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रीय झालेले दिसतात.आणि त्याचवेळी मोदी समर्थक म्हणून ओळखल्या जाणा-या मधु किश्वर त्यांची भूमिका बदलली आहे. आणि या अचानक बदललेल्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. (madhu kishwar on modi)

नेतृत्वबदलाच्या शक्यतेची चर्चा

वैयक्तिक मतभेद किंवा नाराजी यामुळे राजकीय क्षेत्रात अनेकदा नेते किंवा विचारवंत आपली भूमिका बदलताना दिसतात. काही विश्लेषकांच्या मते, मधु किश्वर यांचे आरोप म्हणजे भाजप आणि संघ परिवारातील अंतर्गत सत्तासंघर्षाची झलक असू शकते. मधु किश्वर यांनी केलेले आरोप केवळ वैयक्तिक पातळीवर मर्यादित नाहीत. तर त्यातून व्यापक राजकीय संकेतही मिळतात, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

भाजपच्या आणि देशाच्या नेतृत्वात काही बदल करण्याची योजना आरएसएसमध्ये आखली जात आहे का? म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या मजबूत नेतृत्वाला बाजूला करण्याचा विचार संघ करत आहे का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होतो. मात्र, हा मुद्दा सध्या केवळ चर्चेच्या पातळीवरच आहे.

या सर्व घडामोडींमध्ये सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे भाजपमधली शांतता. इतक्या गंभीर आरोपांवरही पक्षाकडून स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही. सगळे प्रवक्ते मूग गिळून गप्प आहेत. पक्ष या आरोपांना फारसे महत्त्व देत नाही आणि त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही, असे भासवण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु त्याचवेळी या आरोपांवर स्पष्टीकरण देणे प्रवक्त्यांसाठी खूप अडचणीचे आहे, असे मानले जाते.

मधु किश्वर यांनी आरोप केले आहेत, मात्र त्या आरोपांमागे कोणती ठोस राजकीय रणनीती आहे का, किंवा भाजपमध्ये मोठा बदल घडवण्यासाठी आरएसएसचे प्रयत्न सुरू आहेत का, याचे ठोस पुरावे मिळत नाहीत.

भारतीय राजकारणात अशा प्रकारच्या चर्चा आणि अफवा नेहमीच असतात. भाजपने जे पेरले आहे, तेच उगवत आहे. ते फुलत फळत आहे. देशाचे राजकारण इतिहासातील सर्वात नीचतम पातळीवर पोहोचले आहे. 

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

इराणचा अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर हल्ला