साबरमती जेलमध्ये बसून लॉरेन्स बिश्नोईचा मुंबईत धुडगूस : हर्षवर्धन सपकाळ

Lawrence Bishnoi creates a ruckus in Mumbai

जमीर काझी : मुंबई  : कुख्यात माफिया लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील साबरमती जेलमध्ये बसून मुंबईत धुडगूस घालत आहे.  भाजपा महायुती सरकारने बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली परवानगी दिली आहे का? तो सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर साबरमतीच्या जेलमधून बिश्नोईच्या मुसक्या आवळून मुंबईच्या ऑर्थर रोड जेलच्या अंडासेलमध्ये बसवून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी  केली. टिळक भवन येथे माध्यमांशी ते बोलत होते. (Lawrence Bishnoi creates a ruckus in Mumbai)

फडणवीस निष्क्रीय गृहमंत्री

ते म्हणाले, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. फक्त बॉलिवूडच भितीच्या सावटाखाली जगत नसून संपूर्ण महाराष्ट्र भितीच्या सावटाखाली आहे. सरकारच्या नाकाखाली टिच्चून मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर जिवघेणा हल्ला करण्यात आला. याआधी एका माजी मंत्र्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. राज्यात वाढलेली गुन्हेगारी, माफियागिरी, गँगचा सुळसुळाट हे गृहविभागाचे अपयश असून राज्याला देवेंद्र फडणवीस हे निष्क्रिय गृहमंत्री लाभलेले आहेत, त्याचा हा परिणाम आहे. राज्याला आतातरी पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा असेही त्यांनी सांगितले. (Lawrence Bishnoi creates a ruckus in Mumbai)

जरांगेंच्या ५०० कोटी देवाण घेवाणीची ईडीची चौकशी करा

 मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी ५०० कोटीच्या देवाण घेवाणीची ऑडीओ क्लिप जाहीर केली आहे. त्यात ज्यांची नावे आहेत त्यासर्वांची चौकशी झाली पाहिजे, ५०० कोटी  कुठून आले? कोणी आणले? कोणाला दिले? याची ईडी चौकशी करा.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतलेले आहे, त्यांना अटक करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

मोदींच्या मंत्र्याचे एपस्टिन कनेक्शन

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे जामनगरमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांची भेट घेत असतानाच मोदी सरकारमधील मंत्री हरदिप पुरी यांचा एपस्टिनबरोबरचा फोटो समोर येणे हा काही योगायोग नाही. आपण एपस्टिनला एका शिष्टमंडळासोबत भेटलो होतो, असा दावा हरदीप पुरी यांनी केला होता पण फोटोत तर ती खाजगी भेट दिसत आहे. जगभरातील ज्या देशातील व्यक्तीचे नाव एपस्टिनबरोबर आले त्यांच्या चौकशा सुरु आहेत, राजीनामे घेतले आहेत पण मोदी सरकारमधील मंत्री हरदीप पुरी यांना मात्र वाचवले जात आहे. संसदेत एपस्टिन शब्द उच्चारला तरी माईक बंद केला जातो, बोलू दिले जात नाही. एवढया घाणेरड्या प्रकरणात मोदी सरकारमधील मंत्र्याचे नाव आले असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.  (Lawrence Bishnoi creates a ruckus in Mumbai)

शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख जमा करा

  राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे, शेतकरी हवालदिल आहे पण भाजपा महायुती सरकारची मदत म्हणजे ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ असा प्रकार आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे आणि शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीचा प्रकाश पडेल का, हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. सरकार फक्त पोकळ घोषणा करत आहे. तातडीने शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी १ लाख रुपये जमा करा, सरसकट कर्जमाफी करा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करा, पिण्याच्या पाण्याची सोय करा, शेतमजुरांना अनुदान व मोफत १२ गॅस सिलेंडर द्या, जुनी रोजगार हमी योजना लागू करा, मुलांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करा, विद्यार्थ्यांना मोफत एसटी बसचा पास द्या, अशा मागण्या  सपकाळ यांनी केल्या.

Related posts

फ्रेंडशिप फाईल’… हा लोकशाहीवरचा बलात्कारच : राज ठाकरे 

पोलंडने कोल्हापुरात इंडस्ट्रियल हब उभारावे ; संभाजीराजेंची पोलंडच्या पंतप्रधानांकडे विनंती  

जरांगेंकडून ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी एसआयटी ची मागणी