Krishna and Bhishma : कृष्ण आणि भीष्म.

Krishna and Bhishma

कृष्ण हा मुक्त, स्वतंत्र आणि न्यायी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारा होता. याउलट भीष्म हा बंदिस्त, पारतंत्री व अन्यायी व्यवस्थेचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष पुरस्कर्ता होता. या तुलनेनुसार कृष्ण हा बहुजनांच्या बाजूने उभा रहात त्यांचे कुशल, प्रगल्भ व चतुर नेतृत्व करणारा होता. भीष्म हा त्या काळातील अभिजनांचा म्हणजे उच्चभ्रूंच्या धोरणांवर आधारित रोबोटिक, वैचारिकदृष्ट्या मागासलेल्या किंवा बुरसटलेल्या राजकारणाचे नेतृत्व करणारा होता.

डॉ. गिरीश जाखोटिया.

तुम्ही दक्षिणेत केरळला गेलात तर समतावादी कृष्ण आणि बळी राजाचे चाहते तुम्हाला घरोघरी दिसतील. गुरुवायुर हे कृष्णाचे सुप्रसिद्ध मंदिर इथलेच. तुम्ही उत्तर भारतात जाऊ लागलात की अनेक उच्चवर्णीयांमधील अन्यायकारी “भीष्म प्रवृत्ती” तुम्हाला दिसू लागेल. याउलट तुम्ही दक्षिणेत जाल तर बहुतेक ठिकाणी तुम्हाला “कृष्णप्रवृत्ती”चा आनंददायी अनुभव येईल. लबाडीचा किंवा कपटकारी भाग असा की आतून भीष्मप्रवृत्ती जोपासणारे अनेकजण बाहेरून कृष्णाष्टमी साजरी करण्याचा आव आणतात. उच्चवर्णीय पुरुषी वर्चस्व जोपासणाऱ्या बहुतांश उत्तर भारतीयांना तशाच देवता आवडत असतात, याबाबत आश्चर्य वाटू नये. गमतीचा भाग म्हणजे भीष्म हा स्वतःच्या आयुष्यातील खूप पुढच्या वळणावर कृष्णाला ओळखू शकला, परंतू तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. दुसरा योगायोग असा की दोघेही ययातीपुत्र “यदू”च्या चांद्रवंशातले. म्हणजे नंतर ‘यदू’ व ‘कुरु’ अशा दोन शाखा विकसित झाल्या. मातृसत्ताक किंवा स्रियांबद्दलचा आदर बाळगणाऱ्या यदुकुळात कृष्ण जन्मला, वाढला. भीष्म मात्र चातुर्वर्ण्यव्यवस्था व पुरुषी वर्चस्व आचरणात आणणाऱ्या कुरूवंशात जन्मला व वाढला. कृष्ण हा शाम रंगाचा तर भीष्म हा गौरांग. गंगा या श्वेत आर्यनारीचा तो पुत्र असल्याने श्वेतवीर म्हणूनही ओळखला जायचा. दोघेही आपापल्या मातेचे “आठवे बाळ”. अर्थात एवढेच साम्य इथे संपते. बाकी यांच्या विचारसरणीतले अंतर इतके की महाभारताचे युद्ध हे याच दोन विचारसरणींमध्ये मुख्यत्वे झाले. पांडव हे मातुल घराण्यातील “स्री – आदरा”चा वारसा पुढे नेणारे होते तर कौरव हे स्रीला कस्पटासमान मानणारे. हां, अपवाद व अपवादात्मक उदाहरणे ही असतातच. चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या नैमित्तिक प्रभावाखाली युधिष्ठिर या जेष्ठ पांडवाने द्रौपदीला द्यूतात पणाला लावण्याचा अक्ष्यम्य अपराध केला होता. कौरवांकडील विदूर, युयुत्सू व विकर्ण यांनी मात्र द्रौपदी वस्रहरणाला विरोध केला होता. (Krishna and Bhishma)

          तुमचे व्यक्तीमत्व हे अंतीमतः तुम्ही अंगिकारलेल्या तत्वज्ञानातून घडत जाते. तत्वज्ञानाची बाळगुटी ही वेगवेगळ्या प्रकारे लहानपणापासूनच मिळत जाते. समोरच्याचे हक्क मारुन मी एकटाच “विजयी” होतो, हे एक तत्वज्ञान. याउलट एकमेकांच्या सहाय्याने आपण “सारेच विजयी” होऊयात हे दुसरे तत्वज्ञान. आपण सारे समान आहोत, मानव आहोत हे समतेचे तत्वज्ञान. आमची जात, वंश, वर्ण, धर्म हे सर्वोच्च ! – हे विषमतेचे तत्वज्ञान. यातील समतेच्या तत्वज्ञानाला कृष्णाने आचरणात आणले. भीष्म नेहमी विषमतेच्या समर्थनार्थ कार्य करीत राहिला. तुम्ही बलवान आहात हे तुमच्या उद्देशाने ठरले पाहिजे, शक्तीने नव्हे. शक्ती तर डायनोसॉरकडेही खूप होती. गांधीजी बलवान होते कारण ते एका बलिष्ठ सत्तेविरुद्ध निःशस्त्र उभे राहिले. आज छोटी छोटी राष्ट्रे जेव्हा धैर्याने ट्रंप साहेबांना विरोध करतात तेव्हा ती अमेरिकेपेक्षा बलवान ठरतात. थोडक्यात असे की “बलवान कोण” हे ठरविताना ‘सापेक्षतेचा सिद्धांत’ हा लागू होतोच. महाभारतीय युद्धात कृष्णाने उद्देशावर आधारित छोट्या छोट्या राजांची व त्यांच्या सैनिकांची मोट बांधली होती. समोर शत्रू म्हणून भीष्म, द्रोणाचार्य व कर्ण हे परशुरामाचे अजेय धनुर्धारी शिष्य उभे होते. भीष्म हा इतका पराक्रमी होता की अंबेवरील अन्यायाचे परीमार्जन करण्यासाठी स्वतः परशूराम भिष्माशी लढले पण आपल्या या शिष्याला ते पराभूत नाही करू शकले. अशा महारथी भिष्माने अन्यायी कौरवांविरुद्ध धनुष्य उचलले असते तर महायुद्ध झालेच नसते. सामान्यांची लढण्याची जिद्द ही बव्हंशी त्यांच्या सामूहिक उद्देशातून तयार होते आणि उद्देशासोबत अखेरपर्यंत जिवंत राहते. अशा सामान्य परंतु जिद्दी रयतेला एक असामान्य नेता मिळाला की सत्याच्या विजयास प्रारंभ होतो. याच सत्याच्या तत्वज्ञानावर आधारित शिवरायांचे पाच हजार मावळे हे आदिलशाहीच्या एक लक्ष सैनिकांविरूद्ध यशस्वीपणे लढले. युक्रेन हे छोटे राष्ट्र बलाढ्य रशियाविरूद्ध असेच चिकाटीने लढते आहे. व्हिएतनामही अमेरिकेविरुद्ध तीस वर्षे लढले आणि अमेरिका पराभूत झाली. निष्कर्ष असा की जगण्याचे, लढण्याचे तत्वज्ञान हे महत्वाचे. बाकी सहज जन्मून सहज मरणारे कोट्यवधी लोक असतातच की ! (Krishna and Bhishma)

           कृष्णाला सुरूवातीपासूनच कंस, जरासंध, शिशुपाल, रूक्मी व नंतर नरकासुर, दुर्योधन, भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य इ. “विषमकारी” शत्रूंशी सामना करावा लागला. त्याचे सारे बालपणच संकटांनी घेरलेले होते. सांदिपनी मुनींकडील अल्पकालीन मार्गदर्शन सोडल्यास कृष्ण हा स्वयंप्रेरीत व स्वयंशिक्षित होता. त्याने जगण्याचे अमर्याद असे न्यायाधिष्ठित तत्वज्ञान बनविले होते. आजूबाजूला चातुर्वर्ण्यव्यवस्थेचे जंजाळ उभे असतानाही तो विवेक आणि तर्कावर आधारित आपले “मानवीय तत्वज्ञान” पुढे नेत राहिला. गंगापुत्र भिष्माला मात्र उच्चवर्णीय आर्य व्यवस्थेत अनेक दिग्गज गुरू मिळालेले होते जे गंगेने आपल्या अभीजनीय समाजातून उपलब्ध करून दिलेले होते. वशिष्ठांनी भिष्माला वेद शिकवले. परशूरामांनी युद्धकौशल्य शिकवले. बृहस्पतीनी राज्यशास्त्र शिकवले. गंगेच्याच उच्चवर्णीय आर्य समाजाच्या प्रमुखाने म्हणजे इंद्राने भिष्मास अनेक महत्त्वाची शस्त्रास्त्रे प्रदान केली. असा हा सर्वविद्यापारंगत भीष्म एक विशेष व्यक्तीत्व होताच. परंतु आज कृष्ण हा प्रातःस्मरणीय आहे, भीष्म नाही. म्हणजे इतक्या साऱ्या कला, विद्या, कौशल्ये प्राप्त केलेला भीष्म हा “चुकीच्या उद्देशां”मुळे चुकत गेला नि अन्याय करत गेला. बापाला सत्यवतीशी लग्न करता यावे म्हणून हा देवव्रत एक भयंकर प्रतिज्ञा करता झाला नि म्हणून “भीष्म” ठरला. परंतु इथेच भिष्माचे मोठेपण संपते कारण तो “कुरूवंशीय पुरूषी नेतृत्वा”चे यंत्रवत रक्षण करीत राहिला. सोबतीला चातुर्वर्ण्यव्यवस्थेचे अन्यायी तत्वज्ञान होतेच. (Krishna and Bhishma)

कृष्णाचे सारे बालपण बहुजनांसोबत गेले. कृषक पार्श्वभूमीवर कृष्णाची सर्व जडणघडण झाल्याने तो सृजनतेवर भर देत गेला. लोकांच्या कल्याणाचे तो नियम बनवत गेला आणि त्यासाठी चातुर्वर्ण्यव्यवस्थेतील अमानवी नियम तोडत गेला. हे करताना तो तथाकथित बलाढ्यांचीही पत्रास ठेवत नव्हता. उच्चभ्रू आर्यांचा प्रमुख देव असलेल्या इंद्राला त्याने तीनवेळा पराजीत केले. गमतीचा भाग असा की हाच इंद्र कृष्णाचा सखा असणाऱ्या अर्जुनाचा नियोगाधारित पिता होता. कृष्णाने इंद्राची गोकुळातील यज्ञजन्य पूजा बंद करवली कारण ही पूजा एक अंधश्रद्धाच होती. पाऊस तर नैसर्गिक नियमानुसार पडतो. इंद्र पाऊस पाडत नाही. भीष्म मात्र चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या अन्यायी नियमांमध्ये व त्यांच्या मूढ राजकीय निष्कर्षांमध्ये अडकला नि द्रौपदीचं वस्रहरण असहाय्यपणे पहात राहिला. स्रियांना कस्पटासमान लेखण्याची भिष्माची ही पहिली वेळ नव्हती. अंबा, अंबिका व अंबालिकेचा उपमर्द केल्यानंतर त्याने आपल्या पराक्रमाच्या धाकाने गांधारीला अंध धृतराष्ट्राशी विवाह करायला लावले. बहिणीवरील या सक्तीचा बदला शकुनीने संपूर्ण कौरव सत्तेचा विनाश घडवून घेतला. महाभारताच्या शांतीपर्वात भीष्म युधिष्ठीराला राजकारण, प्रशासन याबाबतीतला सल्ला देतो. द्रौपदीला पणास लावणाऱ्या युधिष्ठीराला जागीच न थांबवणारा आजोबा नि  स्वतः गोंधळलेला असा हा भीष्म  सल्ला देतो हे गमतीशीरच. अर्थात चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या तत्वज्ञानाचे आजही गोडवे गाणाऱ्या महाभागांना हे शांतीपर्व आणि भीष्मवचन मोलाचे वाटते, याबाबत आश्चर्य वाटू नये. उच्चवर्गीय आर्यांच्या वसाहतीला ‘स्वर्ग’ म्हणजे आर्यांचा सुवर्ग हे नाव पडले. या सुवर्गातही वर्ण होते – जसा  बृहस्पती हा पुरोहित तर इंद्र हा रक्षक – क्षत्रीय. बाकी वरुण, अश्विनीकुमार हे होतेच.)

          कृष्णाने आयुष्यभर स्रियांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. स्वतःची आई देवकी, नंतर कुंती, रुक्मिणी, सुभद्रा, द्रौपदी, नरकासुराने बंदिस्त केलेल्या हजारो कन्या इ. अनेक स्रियांच्या अधिकारांसाठी लढताना त्याने चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या चौकटीलाच झिडकारले. एवढे करून तो थांबला नाही. वैश्य वर्णातील सत्यभामेशी व आदिवासी समाजातील जाम्बुवंतीशी त्याने विवाह केला. आपल्या “नेटवर्क”मध्ये अठरापगड जातींचे सहकारी असावेत म्हणून अर्जुनाचे लग्न नागकन्येशी, आपल्या नातवाचे लग्न बळीराजाच्या नातीशी म्हणजे बाणासुराच्या मुलीशी  लावण्यात त्याने पुढाकार घेतला. मुळात “असुर” हा शब्द अहुर किंवा अस्सुरियन या शब्दातून तयार झाला ज्याचा अर्थ “बलवान” असा होतो. ऋग्वेदाच्या प्रारंभिक भागात इंद्र व अग्नीचा उल्लेखही ‘असुर’ असाच आहे. नंतर मात्र सुर आणि असुर असा मतलबी व लबाड गोंधळ केला गेला. बहुजनांचे म्हणजेच सिंधूजनांचे लाडके दैवत असणाऱ्या शंकराचे कृष्णाशी असणारे नाते हे आजोळचे आहे. महावैज्ञानिक असणाऱ्या शंकराचा “तर्क व विवेका”चा वारसा कृष्ण पुढे चालवतो. परशुरामाचे शिष्य असणाऱ्या भिष्माला, द्रोणाचार्यांना व कर्णाला युद्धात पराभूत करण्यासाठी कृष्ण हा अर्जुनाला शंकराची भेट घ्यायला लावतो. शंकर हे युद्धशास्रातील परशुरामाचे गुरू होते. गुरुच्या गुरुला भेटण्याची ही व्युहात्मक कल्पना कृष्ण खूप आधीच अंमलात आणतो कारण तो भविष्यवेधी होता. कौरवांचं वागणं हे कपटाचं आहे हे पुनःपुन्हा जवळून पाहून – अनुभवूनही भीष्म मात्र दुर्योधन, दुःशासन व शकुनीस सत्तेबाहेर हाकलत नाही. कुरुवंशाच्या सिंहासनावर तो विदुराला बसवू शकला असता. धृतराष्ट्र व विदुर हे दोघेही महर्षी व्यासांचे नियोगजन्य पुत्र, मग विदुराला भिष्माच्या डोळ्यासमोर दुर्योधन व धृतराष्ट्र हे अपमानास्पद का बोलायचे ? जशी विदुराची आई परीश्रमी ही बहुजन समाजातील होती तशीच व्यासांची आई सत्यवती ही सुद्धा बहुजन समाजातीलच होती. भिष्मानी विदुराला सिंहासनावर बसवले असते तर इतिहास काही वेगळाच घडला असता. शांतीदूत कृष्ण मात्र दुर्योधनाचा पाहुणचार नाकारून विदुराच्या घरी राहतो. दुर्योधन व धृतराष्ट्र या जोडीने केलेला अन्याय पाहवत नाही म्हणून विदुर आपले प्रधानपद सोडतो. भीष्म मात्र याच अन्यायींची बाजू घेऊन तब्बल नऊ दिवस पांडवांविरुद्ध लढतो. ही कसली राजनीती ? हे कसले समाजकारण ? हा कसला न्याय ?म्हणजे भिष्माच्या इतक्या मातब्बर गुरुंनी त्याला दिलेले शिक्षण वाया गेले की मुळात शिक्षणच अयोग्य दिले गेले ? एकलव्य व कर्णावर झालेला ‘जातीबद्ध’ अन्याय भीष्म टाळू शकले असते. आखीर कर्णाच्या जोरावरच दुर्योधन फुशारक्या मारत होता. नियतीने अनेकवेळा भिष्माला सुयोग्य वागण्याची संधी दिली होती जी त्याने नीटपणे वापरलीच नाही.

        आज २१व्या शतकातही भिन्न भिन्न उद्देशांमधील लढाई ही चालू आहेच. आर्टिफिशल इंटिलिजंसच्या आजच्या वातावरणात शस्त्र हाती न घेता पांडवांना महायुद्ध जिंकवून देणारा कृष्ण हा त्याच्या न्यायाधिष्ठित व्यूहनीतीमुळे संस्मरणीय व अनुकरणीय ठरतो. सारी शास्त्रे अवगत असणारा भीष्म मात्र शस्त्र हाती घेऊनही कौरवांना युद्ध जिंकवून देऊ शकत नाही. हे असे नेमके का नि कसे घडते ? आजच्या क्लिष्ट मानसशास्त्रीय भाषेत आपण म्हणू शकतो की वर्चस्ववादी पांडित्य नाकारत कृष्ण हा आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरत गेला. भीष्म मात्र याच वर्चस्ववादी मूर्ख नियमांमध्ये अडकत गेला. मन आणि मस्तिष्क यांचा विवेकी आणि मानवीय वापर न करणारे अनेक आचार्य, बाबा, बापू व गुरू आज फोफावलेत जे आपल्या शिष्यांचे आचरण सुधारू शकत नाहीत परंतु तत्वज्ञानाच्या पोकळ गप्पा मारतात. हेच तथाकथित अध्यात्मिक “नेटवर्कर” छुप्या पद्धतीने भ्रष्ट उद्योगपती, प्रशासक व राजकारण्यांची तळी उचलत असतात. कृष्णाने मात्र सत्राजीत या उद्योगपतीचे ‘पेटंट’ (स्यमंतक धातूशास्र) राजकोषात जमा करायला लावले होते. तो प्रत्येक अन्यायी बलाढ्य राजसत्तेविरुद्ध दुर्बळांची बाजू घेऊन उभा राहिला. सारी प्रबळ सत्ता हाताशी असूनही भीष्म मात्र कोणताही न्याय करू शकला नाही. कृष्ण हा औपचारिकपणे द्वारकेचा राजा नसूनही द्वारकाधीश होता कारण हा ‘मनमोहन’ जनतेच्या मनावर राज्य करायचा. कुरूवंशाचा रक्षक, अजेय धनुर्धारी व निग्रह करु शकणारा भीष्म मात्र हताश सुरात युधिष्ठीराला शेवटी सांगतो, “अर्थस्य पुरूषो दासः”. आज जेव्हा उद्योगपती व छद्म धार्मिक गुरूंच्या गोतावळ्यात अडकलेले राजनेते मी पाहतो तेव्हा त्यांच्यातला भीष्म प्रतीत होतो. आम्हाला मात्र कृष्णाच्या मार्गाने जायचंय !

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर