Kolkata Metro : भारतातील ‘मेट्रो’ चा ४१ वा वाढदिवस

Kolkata Metro

सतीश घाटगे : कोल्हापूर :  भारतात दुरदर्शनवर सुरु झाल्यावर १९८८ मध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गाण्यात पश्चिम बंगालची झलक दाखवताना पहिल्यांदा मेट्रोचे दर्शन भारतीयांना झाले. या मेट्रोतून बंगालमधील बुद्धिजिवी, कलाकार, खेळाडू उतरताना दाखवले आहेत. त्यामध्ये श्याम बेनगेल, मृणाल सेन, क्रिकेटपटू अरुणलाल फुटबॉलपटू पी.के. बॅनजी, चुनी गोस्वामी ठळकपणे दिसून आली. हीच ती भारतातील पहिली मेट्रो. (Kolkata Metro)

डाव्यांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदा मेट्रो सुरू

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीपूर्वी विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे. चकाचक रस्ते, पूल, हायवे, मेट्रो या पायाभूत सुविधा गेल्या ११ वर्षात झाल्या असल्याचा दावा केला जात आहे. नागपूर, पुणे शहरानंतर मुंबईतही मेट्रोची सुरुवात झाली आहे. मेट्रोची सुरुवात एनडीएच्या काळात सुरू झाल्याचा दावा काही मंडळी करत आहेत. पण भारतातील पहिली मेट्रो सुरु झाली ती एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्ये. २४ ऑक्टोबर १९८४ रोजी भारतातील पहिली मेट्रो कोलकोता शहरात जमिनीखालून धावली.  सुरवातीला ती फक्त ३.४ किलो मीटर अंतर होती. पण दाट वस्तीत मेट्रोचे महत्व लक्षात आल्यावर आता तिचा विस्तार ६० किलोमीटरपर्यंत झाला आहे आहे आणि अजूनही तिचा विस्तार होत आहे. कोलकोत्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या काळात दिल्लीत मेट्रो सुरू झाल्यानंतर त्यानंतर आता देशभर मेट्रोचे जाळे विस्तारत चालले आहे. (Kolkata Metro)

इंदिरा गांधीच्या हस्ते मेट्रो कामाची पायाभरणी

२४ ऑक्टोबर १९८४ रोजी देशातील पहिल्या मेट्रो ट्रेनचे उद्घाटन झाले. भारताने आधुनिक शहरी वाहतुकीच्या प्रवासाला सुरुवात केली. कोलकोता मेट्रो ही भारतातील पहिली कार्यरत जलद वाहतूक व्यवस्था म्हणून उदयास आली. कोलकोता मेट्रोची संकल्पना १९२० च्या दशकापासून सुरू झाली होती. पण प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यास ७० दशक उजडावे लागले. १९ डिसेंबर १९७२ मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते मेट्रोची पायाभरणी झाली. निधी, बांधकामातील अडथळ पार करुन १९८४ ला तब्बल १२ वर्षानंतर मेट्रो धावू लागली. (Kolkata Metro)

साडेतील किलोमीटरची मेट्रो ६० किलोमीटरवर पोचली

सुरवातीला मेट्रोचा पहिला भाग एस्प्लेनेड ते भवानीपूर असा होता. आता नेताजी भवनापर्यंत धावत आहे. कोलकोत्यातील दाट लोकवस्तीला मेट्रो हा वाहतुकीचा विश्वासार्ह पर्याय प्रवाशांना मिळाला. सुरवातीला मेट्रोचा मार्ग लहान होता. फक्त पाच स्थानके होती. पण प्रवाशांच वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मेट्रोचा विस्तार झपाट्याने मूळ ३.४ किलोमीटवर मेट्रो ६० किलो मीटरपर्यंत वाढली. ज्यामध्ये अनेक मार्ग आणि स्थानके आहेत. हावडा आणि कोलकोता यांना जोडणारी हुगळी नदीखालील ही मेट्रो भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो मार्गिका ठरली. मेट्रोमुळे लाखो लोक रोज सुलभ प्रवास करतात. सध्या दिल्ली मेट्रोनंतर सर्वात व्यस्त मेट्रो नेटवर्क कोलकोत्यात आहे.

कोलकोत्यानंतर दिल्लीत मेट्रो सुरू झाली. दिल्ली मेट्रोने शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला आणि भारतीय राजधानीला टॉपच्या शहरात नेऊन ठेवले. आता नागपूर, पुण्याबरोबर मुंबईतही मेट्रो सुरू झाली आहे. देशातील महानगरबरोबर प्रमुख शहरातही मेट्रोची उभारणी सुरू आहे. पण भारतातील पहिल्या मेट्रोचा मान कोलकाता शहरालाच मिळतो आहे. (Kolkata Metro)

अंडरवॉटर मेट्रो

कोलकोता मेट्रो रेल कार्पोरेशनने अंडर वॉटर मेट्रो टनेल तयार केला आहे. कोलकोता ते हावडा असा मार्ग  आहे. २००९ सुरू झालेला हा प्रोजेक्ट २०२४ ला पूर्ण  झाला. कोलकोत्यातील हुगळी नदीमधून टनेल बनावण्यात आला आहे. ईस्ट वेस्ट प्रोजेक्ट १६ किलोमीटर लांब आहे. सॉल्ट लेक स्टेडियमपासून हावडा मैदान असा मार्ग आहे. हा मार्ग बनवताना रशिया आणि थायलंडच्या तज्ज्ञांची मदत घेतली होती. पाण्यातील बोगद्यातून प्रति ८०किलो मीटर वेगाने मेट्रो धावते. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन झाले.

Related posts

वाहन चालकांना मराठी भाषेची सक्ती राहणारच :  प्रताप सरनाईक

बुलढाण्यात आमदार गायकवाड यांच्या घरासमोर पोलिस आणि आंदोलकांत झटापट

पंतप्रधान मोदींनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद