Jemimah :  भारत अंतिम फेरीत

Jemimah

कोलंबो : जेमिमा रॉड्रिग्जचे शतक आणि दीप्ती शर्माच्या ९३ धावांमुळे भारताने तिरंगी महिला वन-डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेला २३ धावांनी हरवले. या मालिकेतील भारताचा हा तिसरा विजय असून याबरोबरच भारताने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे. (Jemimah)

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३३७ धावा केल्या. जेमिमाने वन-डे कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावताना १०१ चेंडूंमध्ये १५ चौकार व एका षटकारासह १२३ धावा फटकावल्या. तिची ही वन-डेतील सर्वोच्च खेळी ठरली. दीप्तीने ८४ चेंडूंमध्ये १० चौकार व २ षटकार ठोकून ९३ धावा केल्या. तिचे शतक मात्र अवघ्या ७ धावांनी हुकले. जेमिमा व दीप्तीने पाचव्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी रचली. भारताकडून पाचव्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली. त्यांनी मिताली राज आणि वेदा कृष्णमूर्ती यांचा १०८ धावांच्या भागीदारीचा विक्रम मागे टाकला. याशिवाय, सलामी फलंदाज स्मृती मानधनाने ५१ धावांची खेळी केली.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघानेही तुल्यबळ लढत दिली. आफ्रिकेतर्फे ॲनेरी डर्कसनने ८० चेंडूंमध्ये ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ८१ धावा केल्या. आफ्रिकेची कर्णधार क्लोई ट्रायनने अखेरपर्यंत विजयासाठी प्रयत्न करत ४३ चेंडूंमध्ये ४ चौकार व ५ षटकारांसह ६७ धावा फटकावल्या. अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर दीप्ती शर्माने ट्रायनला बाद करून भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. अखेर आफ्रिकेला ७ बाद ३१४ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून अमनज्योत कौरने तीन, तर दीप्तीने २ विकेट घेतल्या.(Jemimah)

संक्षिप्त धावफलक : भारत – ५० षटकांत ९ बाद ३३७ (जेमिमा रॉड्रिग्ज १२३, दीप्ती शर्मा ९३, स्मृती मानधना ५१, मसाबाता क्लास २-५१, नॅडिन डेक्लार्क २-५४) विजयी विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५० षटकांत ७ बाद ३१४ (क्लोई ट्रायन ६७, ॲनेरी डर्कसन ८१, मियान स्मिट ३९, अमनज्योत कौर ३-५९, दीप्ती शर्मा २-५७).

हेही वाचा :
रबाडाला खेळण्यास परवानगी

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !