Rabada Cleared : रबाडाला खेळण्यास परवानगी

Rabada Cleared

केपटाउन : उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यास परवानगी देण्यात आली. रबाडाचा बंदीचा कालावधी तीन महिन्यांवरून एक महिना इतका निश्चित करण्यात आला असून तो त्याने पूर्ण केल्यामुळे त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली. (Rabada Cleared)

आफ्रिकेतील ‘एसए-२०’ या टी-२० लीग स्पर्धेत खेळताना रबाडा उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला होता. या स्पर्धेत तो एमआय केपटाउन संघाचा सदस्य आहे. २१ जानेवारी रोजी एमआय केपटाउन व डर्बन सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर रबाडाची डोपिंग चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीतील निष्कर्षांनुसार त्याने सेवन केलेली उत्तेजक द्रव्ये ही कामगिरी सुधारण्यासाठी नसून आनंदासाठी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला १ एप्रिल रोजी याविषयी माहिती आली. त्यानंतर, आयपीएलमधील गुजरात टायटन्सकडून खेळणारा रबाडा ३ एप्रिल रोजी मायदेशी परतला होता. यंदाच्या आयपीएल मोसमात तो आतापर्यंत केवळ दोन सामने खेळला आहे. (Rabada Cleared)

साउथ आफ्रिकन इन्स्टिट्यूट फॉर ड्रग फ्री स्पोर्ट्स (सॅड्स) या संस्थेने याविषयी माहिती दिली आहे. रबाडाने अंमली पदार्थ प्रतिबंधाविषयक शिक्षण आणि जागृती कार्यक्रमामध्येही सहभाग घेतला. त्याला आता खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली असून आयपीएलमध्ये ७ मेच्या मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स सामन्यासाठी तो उपलब्ध असल्याचे सॅड्सने म्हटले आहे. रबाडाच्या बंदीचा कालावधी हा जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेच्या (वाडा) नियमांनुसार आहे. गांजा, कोकेन, मेथेम्फेटामाइन किंवा डायमॉर्फिन यांसारख्या उत्तेजक द्रव्यांच्या प्रथमसेवनासाठी एक ते चार महिन्यांच्या कारवाईची तरतूद आहे. मागील वर्षी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज डग ब्रेसवेलही कोकेनच्या सेवनाप्रकरणी दोषी आढळला होता, तेव्हा त्याच्यावरही हीच कारवाई करण्यात आली होती. (Rabada Cleared)

रबाडाने दोन दिवसांपूर्वी स्वत:च पत्रक जाहीर करून उत्तेजक द्रव्यसेवनाची कबुली देण्याबरोबरच यासाठी माफीही मागितली होती. दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका संघास रबाडाची आवश्यकता आहे. त्यामुळेच, त्याच्या बंदीचा कालावधी कमी करण्यात आल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :
अँडरसनला खेळणे सर्वांत कठीण

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर