IPL Foreign Players : परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये परतणार?

IPL Foreign Players

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना १७ मेपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएल संघांमधील परदेशी खेळाडू पुन्हा भारतात परतणार का, याविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ११ जूनपासून सुरू होणार असल्यामुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंच्या आयपीएल सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. (IPL Foreign Players)

गुजरात टायटन्स संघामधील इंग्लंडचा जोस बटलर आणि दक्षिण आफ्रिकेचा गेराल्ड कोएत्झ हे दोघेच खेळाडू आयपीएल स्थगित झाल्यावर मायदेशी परतले होते. हे दोघेही बुधवारपर्यंत संघात परततील, असे गुजरातर्फे सांगण्यात आले. गुजरात संघातील शर्फेन रुदरफोर्ड, राशीद खान, करीम जनत, दासून शनाका, कॅगिसो रबाडा हे अन्य परदेशी खेळाडू भारतातच आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघातील पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड हे ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी परतले होते. हे दोघेही भारतात परत येणार आहेत. कमिन्सकडे हैदराबाद संघाचे नेतृत्व असून हेड हा संघातील प्रमुख फलंदाज आहे. (IPL Foreign Players)

कोलकाता नाइट रायडर्स संघातील आंद्रे रसेल, रोव्हमन पॉवेल हे कॅरेबियन बेटांवरून गुरुवारपर्यंत भारतात येणे अपेक्षित आहे. संघाचा मेंटॉर ड्वेन ब्राव्हो हा सध्या दुबईमध्ये असून तोसुद्धा एका दिवसात भारतात परतेल. संघातील दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किया हा मालदीव्जहून बेंगळुरूला परतणार आहे. याशिवाय संघातील अष्टपैलू मोईन अली इंग्लंडमध्ये, तर स्पेन्सर जॉन्सन ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ते भारतात परतणार का, याविषयी केकेआरतर्फे अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पंजाब किंग्ज संघाच्या झेव्हियर बार्लेट, अझमतुल्ला ओमरझाई आणि मिचेल ओवेन या परदेशी खेळाडूंनी भारतात परतणार असल्याचे कळवले आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग, तसेच सहायक प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन व जेम्स होप्स हे आयपीएल स्थगितीनंतरही भारतातच थांबले आहेत. पुढील दोन दिवसांत सर्व खेळाडूंना संघात दाखल होण्याच्या सूचना पंजाब किंग्जतर्फे देण्यात आल्या आहेत. (IPL Foreign Players)

दरम्यान, जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मंगळवारी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली. आफ्रिका संघातील कॅगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ट्रिस्टन स्टब्ज, एडन मार्करम, रायन रिकलटन, मार्को यान्सन आणि वियान मुल्डर हे खेळाडू सध्या आयपीएल खेळत आहेत. या अंतिम सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ ३१ मे रोजी इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार आयपीएलच्या प्ले-ऑफ लढतींना २९ मेपासून सुरुवात होणार असून ३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामना रंगेल. या पार्श्वभूमीवर आफ्रिकेचे खेळाडू आयपीएलच्या प्ले-ऑफ लढती खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ऑस्ट्रेलिया संघात निवड झालेले जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क यांना टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यापूर्वी दुखापत न होण्याची खबरदारी क्रिकेट ऑस्ट्रेलिया घेईल. त्यामुळे, हेझलवूड रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे, तर स्टार्क दिल्ली कॅपिटल्सकडे परतणार का, हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा :
स्मृतीची दुसऱ्या स्थानी झेप

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर