बेंगळूरू : प्रतिनिधी : पद्मश्री सन्मानप्राप्त डॉ. सुबन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा मृतदेह कर्नाटक राज्यातील श्रीरंगपट्टन येथील कावेरी नदीत सापडला. त्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Subbanna ayyappan)
डॉ. अय्यपन हे कृषी आणि मत्स्यव्यवसाय शास्त्रज्ञ होते. तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सात मे पासून ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी विद्यापुरण्यपुरम पोलिस ठाण्यात केली होती. पण ते मिळून आले नव्हते. दरम्यान श्रीरंगपट्टन जवळील कावेरी नदीत त्यांचा मृतदेह आढून आला. नदीकाठी त्यांची दुचाकीही मिळून आली. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. (Subbanna ayyappan)
डॉ. अय्यपन हे अनेकदा ध्यान आणि आध्यात्मिक चिंतनासाठी रामकृष्ण आणि साई आश्रमात जात असत, अशी माहिती त्यांचे नातेवाईक वकील असलेले श्रीनिधी यांनी दिली. पण त्यांचा मृत्यू नदीत बुडून कसा झाला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्राथमिक तपासानुसार पोलिसांनी सांगितले की ६९ वर्षीय डॉ. अय्यपन यांचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असावा. त्यांनी आत्महत्या केली असावी अंदाज व्यक्त केला जात आहे. पण मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. त्यांच्या मृतदेहाचे विच्छेदन म्हैसूर येथील केअर रुग्णालयात करण्यात आले.
डॉ. सुब्बन्ना अय्यपन हे मूळ कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील येलंदूर येथील आहेत. त्यांनी मंगळूर येथून मत्स्य विज्ञानात पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये बेंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठातून पीएचडी मिळवली होती. तसेच हैद्राबादमधील राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळाचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले होते. (Subbanna ayyappan)
भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागात सचिवपदही भूषवले होते. दरम्यान भारताच्या ‘नील क्रांती’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०२२ मध्ये डॉ. सुबन्ना अय्यपन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचा :
न्यायव्यवस्थेने जनतेचा विश्वास कमावायचा असतो