Incoming BJP in Solapur : सोलापुरात भाजपामध्ये जोरदार इनकमिंग 

Incoming BJP in Solapur

जमीर काझी : मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत राहिलेल्या सोलापुर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या भाजपा प्रवेशाबाबतचा बुधवारी सस्पेन्स संपला. मोहोळ तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार व सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, मोहोळचे शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर, माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह  भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.  सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी, नेत्यांनी तसेच मराठवाड्यातील शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. (Incoming BJP in Solapur)

 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यावेळी ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालक मंत्री जयकुमार गोरे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस आमदार संजय केनेकर, अनुराधा चव्हाण, सचिन कल्याणशेट्टी, भाजपा सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते. 

मंत्री  गोरे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड शक्ती असलेल्या नेत्यांनी परिसराच्या विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पक्ष ताकदीने सर्वांच्या पाठीशी उभा राहील आणि प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.  रणजीतसिंह शिंदे यांचे बंधू पंचायत समिती माजी सभापती विक्रम शिंदे, जि.प. माजी सभापती शिवाजी कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास तोडकर, रमेश पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजी पाटील, तुकाराम ढवळे, शंभुराजे मोरे आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. 

मोहोळ तालुक्यातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस वि‌द्यार्थी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, मोहोळचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, दीपक माळी आदींचा समावेश आहे. (Incoming BJP in Solapur)

वडूज चे माजी नगराध्यक्ष गोडसे यांचाही प्रवेश   

खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, पंचायत समितीचे माजी सभापती बळवंतराव माने, माजी सदस्य मोहनराव बुधे, पं. स.माजी उपसभापती हिराचंद पवार आदींचा समावेश आहे. तसेच माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी भाजपा प्रवेश केला. वडूज नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष सुनिल गोडसे, माजी उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, मार्केट कमिटीचे माजी संचालक काकासाहेब मोटे,तसेच संभाजीनगर येथील निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, निवृत्त उपसंचालक भाऊसाहेब तुपे पाटील, जालन्याचे माजी शिक्षणाधिकारी रमेश पाटील, हिंगोलीचे माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पाटील, नांदेडचे माजी उपशिक्षणाधिकारी व्यंकटेश कोमटवार, शिक्षक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. (Incoming BJP in Solapur)

 दिलीप माने ‘वेटिंग’ वर

 सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप माने यांचाही आज भाजपात प्रवेश होणार होता. मात्र त्यांच्या प्रवेशाला स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध असल्याने त्यांना सध्या  ‘ होल्ड ‘वर ठेवण्यात आला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करून माने यांना पक्षात घेतले जाईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले 

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या