मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मते कशी वाढली ?

मुंबई : विशेष प्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानादिवशी सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के, तर दुसऱ्या दिवशी, २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले. यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसते. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ आहे. हा टक्का कसा वाढला, असा प्रश्न उपस्थित करून आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्रांचे व्हिडिओ फुटेज जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

काँग्रेसचे सर्व पराभूत उमेदवार  व प्रमुख नेत्यांची  बैठक टिळक भवन येथे झाली. त्यात बहुताश उमेदवारांनी ईव्हीएम मशीनचा घोळ असल्याचे मत मांडले.  त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला असल्याचा आरोप करून पटोले यांनी मतांची आकडेवारी देत आयोगाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते  म्हणाले, की मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघांवर अशा रांगा लागल्या होत्या ते आयोगाने पुराव्यासह दाखवावे.

काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही, तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री के. सी. पाडवी, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजित कदम, आ. भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ