नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारतीय उत्पादनावर ५० टक्क कर लावल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा धक्का भारताला दिला आहे. एच- वन व्हिसाच्या प्रत्येक अर्जासाठी एक लाख डॉलर्स शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे भारताच्या अडचणीत भर पडणार आहे.
.जागतिक व्यापार युद्धात पहिल्यांद भारतावर २५ टक्के कर लादला होता. रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवरुन ट्रम्प यांनी आणखीन २५ टक्के कर लावल्याने भारतातील उत्पादन साहित्य, वस्तू, मालांवर ५० टक्के कर द्यावा लागतो. आता अमेरिकेत नोकरी, व्यवसायासाठी एच- वन बी व्हिसा कार्यक्रमात मोठे बदल करण्याच्या विधेयकावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर एच वन बी व्हिसाच्या प्रत्येक अर्जासाठी एक लाख डॉलर्स शुल्क भरावे लागेल. ट्रम्प म्हणतात की त्यांचे उद्दिष्ट परदेशी कामगारांऐवजी अमेरिकन लोकांना नोकऱ्या देणे आहे. व्हाईट हाऊसमध्ये आदेशावर स्वाक्षरी करताना ट्रम्प म्हणाले, “आम्हाला आमच्या नोकऱ्या आमच्या नागरिकांना मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे. आम्हाला चांगल्या कामगारांची गरज आहे आणि हे पाऊल त्या दिशेने आहे.” (H-1 visa fees increased)
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनीही या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले की आता मोठ्या कंपन्या परदेशी कामगारांना स्वस्त दरात कामावर ठेवणार नाहीत कारण त्यांना प्रथम सरकारला एक लाख डॉलर्स द्यावे लागतील आणि नंतर कर्मचाऱ्यांचा पगार द्यावा लागेल. हा निर्णय कंपन्यांना परवडणार नाही. कंपन्यांनी आपल्या देशातील चांगल्या विद्यापीठातून अलीकडेच पदवीधर झालेल्या एखाद्याला प्रशिक्षण द्यावे, अमेरिकन लोकांना प्रशिक्षण द्यावे. आमच्या नोकऱ्या घेण्यासाठी लोकांना आणणे थांबवा. हेच येथील धोरण आहे.
नवीन नियमानुसार, एच- वन बी व्हिसा जास्तीत जास्त सहा वर्षांसाठी वैध असेल, मग तो नवीन अर्ज असो किंवा नूतनीकरण असो. या व्हिसाचा गैरवापर होत होता, त्यामुळे अमेरिकन कामगारांना हानी पोहोचत होती आणि तो अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सुरक्षेसाठी हानिकारक आहे, असे आदेशात म्हटले आहे. (H-1 visa fees increased)
चाबहार बंदरावरील अमेरिकेच्या निर्बंधांचा भारतावर परिणाम
ट्रम्प प्रशासनाने जाहीर केले आहे की या महिन्याच्या अखेरीस इराणच्या चाबहार बंदराचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींवर अमेरिकेचे निर्बंध लादले जातील. या निर्णयाचा परिणाम भारतावरही होईल, जो या धोरणात्मक बंदराच्या विकासात सहभागी आहे. चाबहार बंदर इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात ओमानच्या आखातावर आहे. भारत आणि इराण व्यापार आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ते विकसित करत आहेत. चाबहार बंदर चालवण्यासाठी भारताने १३ मे २०२४ रोजी इराणसोबत १० वर्षांचा करार केला. भारताने पहिल्यांदाच परदेशी बंदराचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. (H-1 visa fees increased)
वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि दुसऱ्या दिवशी एच- वन व्हिसा
डोनाल्ड ट्रम्प यांनी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी भारताच्या खूप जवळचा आहे. मी भारताच्या पंतप्रधानांच्या खूप जवळचा आहे मी त्यांच्याशी बोललो आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर दोनच दिवसात एच-वन व्हिसाद्वारे भारतीयांच्या पोटावर लाथ मारली अशी प्रतिक्रिया उमटत आहे. (H-1 visa fees increased)