Gokul Chairman : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीचा घातक पायंडा!

Gokul Chairman

सतीश घाटगे, कोल्हापूर : दूध उत्पादक कोल्हापूर सांगली आणि सीमाभागातील. संचालक मंडळी सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील. नेतृत्वही कोल्हापूरचेच. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ अध्यक्षपदाची निवड कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांनीच घेतला पाहिजे अशी सर्वांची भावना आहे.  पण यावेळी मात्र गोकुळ अध्यक्ष निवडीचा घातक पायंडा पडल्याची भिती दूध उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर ऐवजी गोकुळ अध्यक्ष मुंबईतून निवड जाणार असल्याने कोल्हापूरच्या सहकार जगतात चिंता व्यक्त केली जात आहे. (Gokul Chairman)

गोकुळवर सध्या मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, सतेज पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. या गटाने महादेवराव महाडिक, पी.एन.पाटील आणि अरुण नरके यांच्या गटाकडून पाच वर्षापूर्वी सत्ता खेचून आणली. त्यासाठी मुश्रीफ, कोरे आणि पाटील गटाला आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक यांची साथ लाभली. पहिल्या चार वर्षात पहिली दोन वर्षे ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांना संधी दिली. त्यानंतरची दोन वर्षे अरुण डोंगळे यांना संधी दिली. शेवटच्या वर्षात सतेज पाटील गटाला संधी देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. पण विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा न देण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पहिल्यांदाच गोकुळ अध्यक्षपद निवडीचा वाद मुंबईत मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांच्या दरबारात गेला आहे. (Gokul Chairman)

पाच वर्षापूर्वी गोकुळची सत्ता महादेवराव महाडिक, पी.एन. पाटील आणि अरुण नरके यांच्याकडे होती. तीस वर्षात त्यांनी अनेकांना गोकुळ अध्यक्षपदाची संधी दिली. महाडिक, पीएन आणि नरके हे एकत्रित चर्चा करायचे. आणि त्यानंतर महादेवराव महाडिक एका पाकिटातून अध्यक्षपदासाठी संचालकाचे नाव, सूचक आणि अनुमोदकाची नावे पाठवत असत. गोकुळचा अध्यक्ष हा कोल्हापूर शहरातूनच निवडला जावा, अशी त्यांनी काळजी घेतली होती. काही वर्षापूर्वी शिरोळचे संचालक दिलीप पाटील यांनी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावली होती. पण महाडिक यांनी राज्याच्या नेत्यांचा हस्तक्षेप गोकुळमध्ये होऊ दिला नव्हता. कालांतराने दिलीप पाटील यांनाही महाडिक यांनी अध्यक्षपदाची संधी दिली होती. (Gokul Chairman)

सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी गोकुळची सुत्रे कोल्हापूरातूनच हलवण्याची काळजी घेतली होती. गोकुळ अध्यक्षपदाचा निर्णय कोल्हापूरात होत असताना डोंगळे यांनी मात्र थेट राज्याच्या नेतृत्वाकडे धाव घेतल्याने कोल्हापूरहून ही सुत्रे मुंबईला गेली आहेत. पण स्थानिक नेतृत्व सजग राहिल्याने एकीकडे सर्व संचालकांची भक्कम एकी दिसून आली आणि दुसरीकडे डोंगळे एकटे पडले आहेत. तरीही त्यांना राज्य नेतृत्वाची साथ मिळाली आहे. गोकुळ अध्यक्षपदसंदर्भात उद्या मंगळवारी मुंबईत बैठक होणार आहे. अध्यक्षपद निवडीचा हा घातक पायंडा पडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी काळजी घेण्याची गरज गोकुळचे ज्येष्ठ संचालक, सहकारातील तज्ज्ञ आणि दूध उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याचे नेतृत्व राज्य नेतृत्वाची समजावून अध्यक्ष निवडीचा तिढा कसा सोडवणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.  (Gokul Chairman)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर