मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर जाणारा भारतीय कसोटी संघ तुलनेने नवखा असून परदेश दौऱ्यात प्रत्येकच खेळाडूवर काही प्रमाणात दडपण असते. परंतु, अशाप्रकारच्या दडपणाची आता आम्हाला सवय झाली असल्याचे विधान भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलने केले. (Gill Conference)
भारतीय संघ इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी नवा कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाल्यामुळे मला भरून आल्याचे गिल म्हणाला. मागील काही वर्षांमध्ये भारतीय संघ प्रथमच या दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय खेळणार आहे. अद्याप आम्ही नवा फलंदाजी क्रम निश्चित केलेला नाही. इंग्लंडला पोहोचल्यानंतर लंडनमध्ये आमचे दहा दिवसांचे सराव शिबीर होणार आहे. त्यादरम्यान, भारत अ संघाविरुद्ध आम्ही एक सराव सामनाही खेळणार आहोत. त्यादरम्यान, आमचा फलंदाजी क्रम निश्चित होईल, असे गिल म्हणाला. रोहित व विराटची उणीव संघास जाणवणार असली, तरी त्यांच्या अनुपस्थितीचे दडपण वेगळे नसेल. परदेश दौऱ्यामध्ये सर्व खेळाडूंवर काही प्रमाणात दडपण असते. परंतु, हे दडपण हाताळण्याची आम्हाला सवय आहे, असेही गिलने नमूद केले. (Gill Conference)
यावेळी, गंभीर यांनीही विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या दौऱ्यातील पाच कसोटींपैकी दोन कसोटींमध्ये विश्रांती देण्याचा विचार आहे. मात्र, त्या दोन कसोटी कोणत्या असतील, याविषयीचा निर्णय अद्याप झालेला नाही. मालिकेची स्थिती पाहून याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे गंभीर म्हणाले. श्रेयस अय्यरला वगळण्याच्या निर्णयाचेही स्पष्टीकरण गंभीर यांनी दिले. आम्ही या दौऱ्यासाठी अठराच खेळाडू निवडू शकतो. निवडकर्त्यांनी अगोदरच अय्यरविषयी स्पष्टीकरण दिले आहे, असे गंभीर यांनी सांगितले. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारत-अ संघातर्फे प्रभावी फलंदाजी करणाऱ्या करुण नायरचेही गंभीरने यावेळी कौतुक केले. (Gill Conference)
आयपीएलविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या सत्कार समारंभावेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीवरही गंभीर यांनी भाष्य केले. ‘रोड शो’चा मी कधीच समर्थक नव्हतो. २००७ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही आपण रोड शो करू नये, असे विधान मी केले होते. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल मला सहवेदना आहे. यापुढे आपण अधिक जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे, असे गंभीर म्हणाले.
हेही वाचा :
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर
चेंगराचेंगरीप्रकरणी ‘आरसीबी’वर गुन्हा