कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत चुरशीच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात दिलबहार तालीम मंडळने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा ३-२ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Dilbahar’ Enters Semifinals of Satej Cup Football Tournament)
पूर्वार्धात ११ व्या मिनिटाला दिलबहारने गोल करत सामन्यात आघाडी घेतली. थांगजालेन हाओकिपने मोठ्या डीमधून दिलेल्या पासवर स्वयंम साळोखेने हेडव्दारा गोल नोंदवून संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २६व्या मिनिटास दिबहारने फुलेवाडीला दुसरा धक्का दिला. लॅमखोलेन दौंगेलच्या पासवर प्रथम भोसलेने गोल केला. दोन गोलच्या आघाडीमुळे फुलेवाडी संघ दबावाखाली खेळू लागला त्याचा फायदा घेत ३९ व्या मिनिटाला दिलबहारच्या आघाडी फळीने यशस्वी आक्रमण केले. स्वयंम साळोखेने मारलेला फटका आविष्कार राऊतने रोखण्याचा प्रयत्न केला पण चेंडूवर ताबा मिळवत स्वयंमने गोल केला. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला फुलेवाडीकडून झालेल्या चढाईत विशाल पाटीलने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक जयकुमार मेथेकडून रिबॉन्ड झाला त्यावर सत्येन पाटीलने गोल नोंदवून आघाडी कमी केली. मध्यंत्तरास दिलबहारने ३-१ अशी आघाडी घेतली. (Dilbahar’ Enters Semifinals of Satej Cup Football Tournament)
उत्तरार्धात डी टॉपवरून दौंगेलने मारलेला फटका गोलपोस्टवरून गेला. स्वयंम साळोखेने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची संधी हुकली .त्यांच्या प्रथम भोसले, माणिक पाटील, फेबिन गिब्स, संकेत वेसणेकर, थांगजालेन हाओकिप यांनी गोलची आघाडी वाढवण्यासाठी खोलवर चाली रचल्या परंतु त्यांना त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात आले नाही. फुलेवाडीकडून सत्येन पाटील, मारुती कोळी, विशाल पाटील, सिध्दार्थ पाटील, अक्षय मंडलिक, आयुष पाटील, अक्षय पाटील यांनी गोलची आघाडी कमी करण्यासाठी वेगवान चाली रचल्या. अखेर जादावेळेत सत्येन पाटीलने गोल नोंदवून आघाडी ३-२वर आणली. उर्वरित वेळेत मात्र त्यांना गोल करण्यात यश मिळाले नाही, त्यामुळे दिलबहारने ३-२ अशा गोलफरकाने सामना जिंकून उपांत्य फेरी गाठली. (Dilbahar’ Enters Semifinals of Satej Cup Football Tournament)
स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीतील सामना रविवारी (दि.१२) पाटाकडील तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात दुपारी चार वाजता होईल.