हेडिंग्ले : भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी गुरुवारी इंग्लंडचा १४ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला. वेगवान गोलंदाज जेमी ओव्हर्टनचा आश्चर्यकारकरीत्या संघात समावेश करण्यात आला असून जेकब बेथेल, ख्रिस वोक्स यांनीही संघात पुनरागमन केले आहे. (England Squad)
भारत-इंग्लंडदरम्यान २० जूनपासून हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटीस सुरुवात होत आहे. इंग्लंडचा मुख्य वेगवान गस ॲटकिन्सन हा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी ओव्हर्टनला संघात स्थान मिळाले. विशेष म्हणजे, मागील आठवड्यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे मालिकेतील पहिला सामना खेळताना ओव्हर्टनची उजव्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली होती. मात्र, भारताविरुद्धच्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होईल, या आशेने त्याला संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंड संघातील मार्क वूड, ऑली स्टोन आणि जोफ्रा आर्चर हे नियमित वेगवान गोलंदाजही पहिल्या सामन्याकरिता तंदुरुस्त नाहीत. त्यामुळे इंग्लंडला तुलनेने नवख्या माऱ्यासह या सामन्यात उतरावे लागेल. त्यानुसार, ब्रायडन कार्स, सॅम कूक, जोश टंग हे वेगवान गोलंदाज संघात असून त्यांना ख्रिस वोक्सच्या अनुभवाची जोड मिळेल. (England Squad)
बेन डकेट, झॅक क्राउली ही सलामी जोडी असून रूट, स्टोक्स, ब्रुक, बॅथेल, पोप अशी मधली फळी आहे. जेमी स्मिथ हा संघाचा यष्टिरक्षक आहे, तर शोएब बशीर या एकमेव फिरकीपटूची संघात निवड करण्यात आली आहे. (England Squad)
इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जो रूट, ब्रायडन कार्स, बेन डकेट, हॅरी ब्रुक, जोश टंग, झॅक क्राउली, जेमी स्मिथ, सॅम कूक, ऑली पोप, जेमी ओव्हर्टन, शोएब बशीर, जेकब बेथेल आणि ख्रिस वोक्स.
हेही वाचा :
सूर्यकुमार ठरला ‘मौल्यवान’ खेळाडू