एकनाथ शिंदेकडून नवी मुंबईत मोठी लूट : गणेश नाईक यांचा घणाघात

चोराच्या उलट्या बोंबा - एकनाथ शिंदे

जमीर काझी :  मुंबई : राज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्या महायुतीतील सत्तेत महत्वाचा घटक असलेल्या आणि मुंबई, ठाणेसह अनेक महापालिका निवडणुकीत एकत्र लढत असलेल्या भाजपा व शिवसेना शिंदे गटात नवी मुंबईत मात्र जोरदार घमासान सुरु आहे. गेल्या पाच वर्षापासून प्रशासकाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी तीन लाख कोटीची लूट केली आहे, असा गंभीर आरोप भाजपाचे जेष्ठ नेते व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केला आहे. 

महापालिका निवडणुकीत तीनही पक्षाचे नेते राज्य मंत्रीमंडळात एकत्र असले तरी त्यांच्यात जुंपली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा नेत्यांमधील वाद सुरू असतानाच, वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या प्रचारात थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. (Ganesh Naik criticizes DCM Shinde)

कोविडच्या काळात नवी मुंबईत औषधे लंपास केली

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून निवडणूक जाहीनामा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. यावेळी मंत्री नाईक म्हणाले, “सिडको प्रशासनात बिल्डरांचे दलाल बसले असून, भूखंड थेट बिल्डरांच्या खिशात घातले जात आहेत. कोविडच्या भीषण संकटात नवी मुंबईत येणारी औषधे आणि इंजेक्शन्स लंपास करण्यात आली. रबाळे एमआयडीसीमध्ये हॉस्पिटलसाठी तयार होणारा ऑक्सिजन गॅसही चोरून नेण्यात आला. औषधं चोरली, गॅस चोरला आणि पाणीही चोरलं,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. (Ganesh Naik criticizes DCM Shinde)

गणेश नाईकांची नगरविकास खात्यावर टीका

ते म्हणाले, “सध्याची यूडीसीपीआर योजना नेमकी कोणत्या शहाण्याने तयार केली? असा प्रश्न आहे. पूर्वी मुंबईत एकच एफएसआय दिला जात होता. साधी गॅलरी काढली तरी एनजीओ आणि नागरिक विरोध करत असत, त्यामुळे मुंबईचे वेगळे महत्त्व होते. मात्र, यूडीसीपीआरमुळे आज एफएसआय खैरातीसारखा वाटू लागला आहे,” असा आरोप त्यांनी केला. “उद्या या शहरांमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, तर संपूर्ण परिसर काँक्रीटने भरून जाईल. मोटरसायकल चालवणेही अशक्य होईल. एक-दोन नव्हे, तर अनेक उन्नत रस्ते करावे लागतील,” अशी भीती व्यक्त करून नाईक म्हणाले,’ गेली पाच वर्षे महापालिकांमध्ये प्रशासकाचा कारभार आहे. या कालावधीसाठी आम्हाला कोणीही दोष देऊ शकत नाही. या पाच वर्षांत जे काही वाटोळं झालं आहे, ते सर्व प्रशासकीय काळातच घडलं आहे. त्या काळाचं नेतृत्व कोण करत होतं, हे सांगण्याची गरज नाही,” असे म्हणत नाईक यांनी नगरविकास खाते असलेल्या शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. (Ganesh Naik criticizes DCM Shinde)

चोराच्या उलट्या बोंबा – एकनाथ शिंदे

 गणेश नाईक यांच्या आरोपांना उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले,’यांनी “नवी मुंबईमध्ये इतकी वर्ष सत्ता कोणाची आहे? मग आम्ही चोराच्या उलट्या बोंबा आहेत असं म्हणू शकतो. पण, आम्ही आरोपांना आरोपाने उत्तर न देता कामाने उत्तर देतो. नवी मुंबईची जनता सुज्ञ आहे.”असे सांगितले. 

नवी मुंबईतील नाईक यांच्या साम्राज्य संपविण्यासाठी शिवसेनेची जोरदार तयारी केली आहे. विविध भागात ‘नवी मुंबई, नवं सरकार’ या आशयाचे बॅनर झळकत असून, ‘हुकूमशाही संपवणार’, ‘भ्रष्टाचारमुक्त कारभार’, ‘लाडक्या बहिणींचा तारणहार’, ‘हक्काच्या घराचे स्वप्न साकार’ अशा घोषणांद्वारे गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे.

Related posts

२८ लाखांची लाच घेताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात

सासूने मारला जावयाच्या घरातील साडेसोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

प्रायश्चित म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ