दिल्लीमध्ये आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट नियोजनातील त्रुटींमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत होती. परंतु गलगोटियास युनिव्हर्सिटीच्या प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बदनामी झाली. गलगोटियास युनिव्हर्सिटीने ओरायन नावाचा रोबोटिक कुत्रा स्वतःची निर्मिती म्हणून सादर केला, तो प्रत्यक्षात चिनी रोबोट निघाला. त्यावरून या विद्यापीठाची आणि भारताचीही एवढी फजिती झाली की, प्रसिद्धी नको, पण हा एआयचा कुत्रा आवर म्हणण्याची पाळी संयोजकांवर आली.या एकूण प्रकरणाची आणि गलगोटियास विद्यापीठाच्या भाजपसोबत असलेल्या संबंधांची चर्चा करणार आहोत.
विजय चोरमारे
इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये नॉएडाच्या गलगोटियास युनिव्हर्सिटीने ‘ओरायन’ नावाचा रोबोटिक कुत्रा सादर केला. आपल्याच विद्यापीठाने विकसित केलेला रोबोट असल्याचा अप्रत्यक्ष दावा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात ‘ओरायन’ हा युनिट्री या चीनी कंपनीचे युनिट्री गो टू मॉडेल म्हणून ओळखले जाते. हा एक व्यावसायिक (कमर्शियल) रोबोट आहे आणि तो भारतातही ऑनलाइन मागवता येतो.
हा रोबोट गलगोटिया विद्यापीठात विकसित करण्यात आल्याचा दावा विद्यापीठाच्या एका प्रतिनिधींनी दूरदर्शन आणि पीटीआय यांसारख्या माध्यमांना सांगितले. पण सोशल मीडियावर बनावटगिरी उघड केल्यानंतर विद्यापीठाने आपली भूमिका बदलली. (Galgotias University and BJP’s connection)
विद्यापीठाने आरोप नाकारले आणि संपूर्ण वादासाठी माध्यमांनाच जबाबदार धरले. विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “एक व्हायरल ट्वीट चुकीच्या दिशेने गेले. आम्ही हा रोबोट तयार करतो किंवा डिझाइन करतो, असा दावा आम्ही कधीही केला नाही. आम्ही फक्त एवढेच म्हटले की एआय क्षेत्रात आम्ही ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहोत. मात्र टीव्हीवरून ही बाजू स्पष्टपणे सांगितली गेली नाही. दूरदर्शनच्या एका रिपोर्टरने या ‘आधुनिक शोधा’ची स्तुती केली, पण तो रोबोट ऑनलाइन खरेदी करता येतो, याची माहिती घेतली नाही. त्यांनी रोबोटला ‘गोंडस’ आणि ‘खट्याळ’ असे संबोधत त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. आयओएस अॅप्स, थ्रीडी प्रिंटर, ड्रोन आणि विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सचा उल्लेख करून त्यांनी, “गलगोटियासारख्या विद्यापीठांमुळे भारत २०४७ पर्यंत विकसित देश बनेल.” असे कौतुक केले.
दरम्यान, पीटीआय वृत्तसंस्थेनेही एक बातमी दिली. एआय इम्पॅक्ट समिटमध्ये ३५० कोटींच्या एआय प्रदर्शनामुळे गलगोटिया युनिव्हर्सिटीचे पॅव्हेलियन प्रमुख आकर्षण ठरले. त्यात ‘ओरायन’ हा मुख्य आकर्षण असल्याचे सांगितले गेले. ओरायन नावाच्या रोबोटिक कुत्र्याने दरम्यानच्या काळात मेनस्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडियावरही धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती.
दरम्यान या कथेत नवा ट्विस्ट आला. कारण युनिट्री गो-टू रोबोट यावेळी ‘टीजे’ या नावाने माध्यमांमधून झळकू लागला. पीटीआयच्या एका व्हिडिओ कॅप्शनमध्ये दावा करण्यात आला की विप्रोने समिटमध्ये ‘आपला’ डॉग रोबोट सादर केला आहे. कॅप्शनमध्ये म्हटले होते की, “विप्रोने एआय-आधारित रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमधील प्रगती दाखवण्यासाठी आपला डॉग रोबोट सादर केला.”
रोबोट त्यांनीच तयार केल्याचा त्यांनी थेट दावा केला नसला तरी तो त्यांच्या शोधासारखाच सादर करण्यात आला. न्यूज एटीन इंडियाने ‘एआय सम्मेलन में छाया टीजे डॉग’ या शीर्षकाखाली बातमी दिली. त्यात रोबोटच्या वैशिष्ट्यांचे कौतुक करण्यात आले. एनडीटीव्हीनेही ‘एआय समिट में रोबॉटिक डॉग ने जमाई धाक!’ या शीर्षकाखाली रिपोर्ट दिला, ज्यात ‘टीजे’चा मोठ्या उत्साहाने उल्लेख करण्यात आला. (Galgotias University and BJP’s connection)
म्हणजेच, एकाच चिनी रोबोटला आधी ‘ओरायन’ आणि नंतर ‘टीजे’ अशी वेगवेगळी नावे देऊन विविध न्यूज रूममध्ये सादर करण्यात आले. मात्र कुठेही मूलभूत प्रश्न विचारले गेले नाहीत. हा विषय केवळ टीव्हीपुरता मर्यादित राहिला नाही. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाच्या अधिकृत एक्स हँडलवरूनही या रोबोटचे कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर करण्यात आल्या. त्यामुळे सरकारचाही या सगळ्या प्रकरणाला पाठिंबा असल्याचे दिसून आले. वाद वाढल्यानंतर हे ट्वीट हटवण्यात आले.
प्रत्यक्षात या ‘चिनी रोबोट’ चा वाद फक्त एका प्रदर्शनापुरता मर्यादित नाही. तो आपल्याकडच्या एकूण व्यवस्थेचा प्रश्न आहे. ‘विकसित’ किंवा ‘अविष्कार’ यांसारख्या शब्दांचा गांभीर्याने वापर न करता त्यांचा फक्त दिखाव्यासाठी वापर केला जातो. प्रेस रिलीजवरून बातमी देताना वस्तुस्थितीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जात नाही. नाव बदलणे किंवा रीब्रँडिंग करणे म्हणजेच संशोधन असे समजले जाते. माध्यमे तथ्य तपासण्यापेक्षा सादरीकरणावर भर देतात. त्यातून असे मोठे घोटाळे होत असतात.एआय म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता. तर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या या प्रदर्शनात मानवी बुद्धीमत्तेच्या मर्यादांचेच प्रदर्शन घडले.
हे सगळे घडत असताना गलगोटियास विद्यापीठाची सगळीकडे चर्चा होती. यापूर्वीही गलगोटियास हे नाव कानावरून गेले असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. २०११ साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाचा भारतीय जनता पक्षाशी जवळचा संबंध असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. हे विद्यापीठ भाजपच्या अनेक उपक्रमांना आणि धोरणांना पाठिंबा देत असल्याचे दिसते. सोशल मीडियावर गलगोटियासच्या मालकाचा एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात ते नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘टॉप युनिव्हर्सिटी’चा सन्मान स्वीकारताना दिसतात. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, पण राष्ट्रीय पातळीवर त्यांचा प्रभाव वाढलेला होता.
२०१४ साली पंतप्रधान मोदी यांनी एका पुरस्कार समारंभात गलगोटिया युनिव्हर्सिटीला अकॅडमिक्स आणि ग्लोबल लिंकेजमध्ये ‘टॉप प्रायव्हेट युनिव्हर्सिटी’चा पुरस्कार दिला होता. त्या वेळी युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शिक्षणाच्या गुणवत्तेचे कौतुक करण्यात आले होते. मात्र अलीकडील घटनांमुळे या यशांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हा पुरस्कार शिक्षणाची गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि प्लेसमेंटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आला होता. सोशल मीडियावर आणखी काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात सुनील गलगोटिया भाजप नेत्यांकडून पुरस्कार स्वीकारताना किंवा त्यांना सन्मानित करताना दिसतात. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत सुनील आणि ध्रुव गलगोटियांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी विविध प्रसंगी गलगोटिया युनिव्हर्सिटीचे कौतुक केले आहे.
गलगोटिया विद्यापीठाने २०१८ मधील भाजपच्या “संपर्क फॉर समर्थन” मोहिमेत भाग घेतला होता. तसेच त्यांनी नवीन शिक्षण धोरण आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला पाठिंबा दर्शवला आहे. भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्यासोबत सुनील गलगोटियांचा फोटोही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता, जो त्यांनी स्वतः ट्वीट केला होता.
गलगोटिया विद्यापीठ आणि भाजप- मोदी यांच्यातील संबंध दर्शवणारे अनेक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा केला जातो. विद्यापीठाने आपल्या कॅम्पसमध्ये मोदींच्या ‘बाल नरेंद्र’ पुस्तकाचे प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच २०२४च्या लोकसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसविरोधी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पाठविल्याचे आरोप झाले होते. मोदी सरकारच्या धोरणांना उघड पाठिंबा देण्याचा आरोपही विद्यापीठावर करण्यात येतो.गलगोटिया विद्यापीठाचे विद्यार्थी काँग्रेसविरोधी आंदोलनात सहभागी झाल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
गलगोटिया युनिव्हर्सिटी वादात सापडण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. २०२० मध्ये विद्यापाठाचे संशोधक धर्मेंद्र कुमार यांनी एक पेपर प्रकाशित केला होता. ज्यात दावा करण्यात आला होता की ‘थाळी किंवा घंटेच्या आवाजातील कंपनांमुळे कोरोना विषाणू नष्ट होऊ शकतो’. नंतर संबंधित जर्नलने हा पेपर मागे घेतला, कारण तो वैज्ञानिकदृष्ट्या आधारहीन असल्याचे सांगण्यात आले. ही घटना कोविड-१९ महामारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘थाळी वाजवण्याच्या’ आवाहनाशी जोडली गेली होती. मात्र या संशोधनावर ‘छद्म विज्ञान’ (प्स्यूडोसायन्स) असल्याची टीका झाली आणि विद्यापीठाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
एआयवर साडेतीनशे कोटींचा खर्च करण्याचा दावा करणा-या विद्यापीठाने चीनचा रोबोट आपलाच असल्याचे दाखवून प्रसिद्धी मिळवली, परंतु त्यामुळे त्यांची फजिती झालीच, शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचेही हसे झाले. या विद्यापीठाची एआय इम्पॅक्ट समिटमधून हकालपट्टी करून गेलेली अब्रू परत मिळणार नाही. (Galgotias University and BJP’s connection)