मुंबई : प्रतिनिधी : काही लोक आधी अंडी खात होते. आता कोंबडी खाण्यासाठी आले आहेत, अशी खरमरीत टीका एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेच्या युतीवर केली . आज बुधवारी शिवसेना आणि मनसे यांची मुंबईसह अन्य महानगरपालिकेच्या निवडणुकीत युती झाली. त्यावर शिंदे यांनी टीका केली आहे. (Eknath Shinde criticizes the Thackeray brothers)
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता उप मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकशाहीमध्ये युती आणि आघाड्या होत असतात. आमची महायुती महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी गेले साडेतीन वर्ष काम करत आहे. महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी आणि लोकाभिमुख योजना राबवण्यासाठी काम करत आहे. परंतु आता झालेली युती सत्ता, खुर्ची आणि आपलं अस्तित्व ठिकवण्यासाठी होत आहे, असा आरोप त्यांनी केला. (Eknath Shinde criticizes the Thackeray brothers)
एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली, पण विधानसभा निवडणूक महायुतीने जिंकली. त्यानंतर आता झालेल्या नगरपरिषदांमध्ये महाविकास आघाडीच्या एकूण जेवढ्या नगरराध्यक्षाच्या, त्यापेक्षा एकट्या आमच्या शिवसेनेच्या सर्वात जास्त जागा आल्या. त्यामुळे अशा युती सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी होत आहेत. पोपटामध्ये काही जणांचा जीव असतो. त्याप्रमाणे काही लोक मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहत आहेत. आधी अंडी खात होते, आता कोंबडी खाण्यासाठी आले आहेत, अशा शब्दात शिंदेंनी जहरी टीका केली. (Eknath Shinde criticizes the Thackeray brothers)
महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत, त्यात आणखी दोन टोळ्यांचा सहभाग झाला असून ते राजकीय मुले पळवतात, असा टोला राज ठाकरेंनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला लागवला होता. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांना विचारले असता, ते म्हणाले की, जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते मुंबई आणि राज्य काय सांभाळणार? असा सवाल उपस्थित करत शिंदेंनीच राज ठाकरेंवर पलटवार केला.