Dr. Jakhotia : जगाला संपूर्ण नाशापासून कसे वाचवणार ?

Dr. Jakhotia

बहुतेक युवकांना आर्थिक समृद्धी व विविधांगी सांस्कृतिक आनंद हवा आहे. यास्तव त्यांना कट्टरपंथी जुनाट विचारांपेक्षा सर्वसमावेशक उदारमतवाद हवा आहे. दुर्दैवाने आज राष्ट्रवादाच्या आड काही मोजके वर्चस्ववादी हे युवकांना भरकटविण्याच्या कुटील खेळ्या खेळताहेत. (Dr. Jakhotia)
– डॉ. गिरीश जाखोटिया

नमस्कार मित्रांनो ! एखादी उत्तम इमारत बांधायला किमान ३६५ दिवस व करोडो रुपयांची साधनसामग्री लागते. ती पूर्णपणे जमीनदोस्त करायला दोन सेकंदांचा मिसाईल भडिमार पुरेसा असतो. करोडो नागरिकांच्या करातून – श्रमातून देश उभा रहात असतो नि काही मुर्खांच्या विकृत नेतृत्वामुळे तो कोसळत जातो. विनाश करणे खूप सोपे असते, निर्मिती करणे प्रचंड अवघड !
यास्तव पूर्वी अमेरिकेविरूद्ध युद्ध झेललेल्या व्हिएतनामी जनतेला नीटपणे कळलेले आहे की राष्ट्रउभारणी महत्त्वाची, कलह नको. “Economics of Survival” या माझ्या ग्रंथात विकृतांच्या कलहातून निर्माण होणाऱ्या तिसऱ्या महायुद्धाची संभाव्यता जिथे असेल अशा जगातील सहा ठिकाणांबद्दल मी लिहिले होते. अर्थात जागतिक राजकारण – अर्थकारण अभ्यासणारा कुणीही ही ठिकाणे सहजपणे सांगू शकेल. “युक्रेन – रशिया – युरोप” हे एक आणि सध्याचे “इस्राएल – इराण – जॉर्डन -कुवेत” हे या यादीतील दुसरे. या सहाही शक्यता त्या – त्या संबंधित देशांच्या “महत्वाकांक्षी – आततायी नेत्यां”च्या अमानवी करामतींचा परीपाक बहुतांशी आहेत. साधारणपणे सामान्य जनतेला युद्ध अजिबात पेलवत नसते जेव्हा ते तिच्यावर दुर्दैवाने लादले जाते ! आततायी नेत्यांची युद्धखोर खुमखुमी ही त्यांच्या जनतेने केलेल्या जयजयकाराने वाढत जात असते. हा युद्धज्वर टिपेला पोहोचेपर्यंत नेत्याचे नालायक साथीदार मूर्ख जनतेला उचकवत राहतात. अर्थात या साऱ्या दुर्दैवी जागतिक घटनांमधून अनेकांचे मुखवटेही गळून पडतात. अनेक सत्तांध राष्ट्रीय नेते स्वतःच्या व स्वतः पोसलेल्या चौकडीच्या स्वार्थासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरतात. असे करताना मूर्ख जनतेला मात्र “राष्ट्रभक्ती”चे उत्तेजक रस पाजले जाते जेणेकरून चौकडीच्या कुटील कारवाया या “राष्ट्राभिमाना”च्या वाटाव्यात ! सध्याच्या जागतिक खडाजंगीने धर्मामुळे होणाऱ्या “एकते”बाबत खूप गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. धार्मिक अहंकार आणि अस्मितांच्या फुग्याला या युद्धांनी जोरदार पिन मारली आहे. अमेरिकेचे युद्धतळ हे इराण भोवतीच्या कुवेत, ओमान, जॉर्डन, इराक, सिरीया, युएई इ. मुस्लीम देशांत आहेत जे ज्यू धर्मीय इस्राएलसाठी ख्रिश्चन अमेरिकेला मदत करताहेत ! यूरोपियन युनियनमध्ये ख्रिश्चनांचीच वेगवेगळी अशी तीस राष्ट्रे आहेत. श्रीलंका, म्यानमार आणि थाईलंड या बौद्ध देशांमधील सामान्य जनता विविध आर्थिक व सामाजिक प्रश्नांनी आज खूप त्रस्त आहे. या देशांना भेटी दिल्यावर असे वाटावे की हे लोक बौद्ध धर्माची उदात्तता विसरले की काय ? (Dr. Jakhotia)
भारतातही सातव्या – आठव्या शतकापर्यंत मुस्लीम इथे येण्यापूर्वी धर्माच्याच चौकटीत आपल्या बांधवांचे प्रचंड शोषण – दमन चालू होते जे आजही विविध मार्गांनी चालू आहे. दुर्दैवी परंतु हास्यास्पद गमतीचा भाग असा की विनाशकारी जातीयवादाच्या निर्मितीची पार्श्वभूमी असणारेच अनेक उच्चभ्रू भारतीय वर्णवादी आज वरकरणी जाती विसरा म्हणून सांगताहेत. हेच लबाड लोक सामान्य व्याख्येनुसार बंदिस्त नसलेल्या “धर्मा”ला आज धोका आहे म्हणून सांगत जातीय वर्चस्वाच्या पुनर्स्थापनेची दूरगामी व्यूहरचना राबविण्याचा चलाख प्रयत्न करताहेत. उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय हे बहुतांशी हिंदू असले तरी यांची संस्कृती अगदीच भिन्न आहे. दक्षिण भारतीय हे बहुतेक परीमाणांवर उत्तर भारतीयांपेक्षा खूपच सरस आहेत. तरीही उच्चभ्रू उत्तर भारतीयांच्या मूर्ख वर्चस्वी धारणांमुळे ‘अग्रेसर’ दक्षिण व ‘अडाणी’ उत्तर दरम्यान सर्व प्रकारचा ‘भेद’ हा वेगाने वाढत चाललाय. थोडक्यात असे की उत्तरेकडील धार्मिक अहंकार व दक्षिणेकडील सांस्कृतिक सुधारणावाद यामधील संघर्ष हा भारताला नजिकच्या भविष्यकाळात मोठ्या अडचणीत टाकू शकतो. जगभरातील सांस्कृतिक भेदाभेद हे धर्माच्या महत्तेला नामोहरम करताहेत. युक्रेनचे रशियाकडून किंवा बलुचिस्तानचे पाकिस्तानकडून होणारे दमन आज धोकादायक वळणावर पोहोचले आहे, जरी हे देश एकधर्मी असले तरी ! फिलिस्तिनी मुस्लीम, इस्राएली ज्यू (यहुदी) व अमेरिकन ख्रिश्चन हे “अब्राहमी” धर्म जेरूसलेमच्या एकाच प्राचीन परीघातले आहेत परंतु आपली समान मुळे विसरत हे त्या परीघालाच युद्धाचा आखाडा बनवून लढताहेत. अर्थात अमेरिकी व इस्राएलींच्या राक्षसी मतलबांमुळे आजची परिस्थिती मुख्यत्वे उद्भवली आहे. (इस्राएली ज्यू किंवा यहुदी उद्योगपतींचा अमेरिकेतील प्रचंड वरचष्मा हा अभ्यासाचा विषय आहे.) (Dr. Jakhotia)
बहिर्गत राजकीय परिस्थितीत इराणवर अन्याय होत असला तरी इराणच्या अंतर्गत होणाऱ्या महिलांवरील अन्यायाचे समर्थन करता येत नाही. दहाव्या शतकातील प्रशंसनीय इस्लामी वैज्ञानिक संशोधन व त्यापूर्वीच्या पर्शियन संस्कृतीचा मोठा व प्रभावी वारसा असलेला इराण हा अनेक मुस्लीम भावंडे असणाऱ्या शेजारी देशांच्याच मतलबी वागण्यामुळे आज एकाकी पडत चाललाय. म्हणजे “वैश्विक इस्लाम” असा कुठे आज आढळत नाहीच. शंभर वर्षांची अमेरिकन दादागिरी व तिला मिळणारा स्वार्थी युरोपीय पाठिंबा मोडून काढण्यासाठी रशिया व चीन आज एकत्र आलेत. अर्थात हे दोघेही आपापल्या परीघात स्वतःचे वर्चस्व वाढविण्यासाठी छोट्यांची असह्य गळचेपी करताहेत. दोन्हीकडील युद्धांची व्याप्ती वाढत गेल्यास अनेक देश इच्छा नसतानाही विनाशाच्या तांडवात सहभागी होतील.(Dr. Jakhotia)
जगाची नाशाकडे होणारी वाटचाल ज्या कारणांमुळे दिसते आहे ती कारणे आपण संक्षेपाने जाणून घेतल्यास हा नाश थोपविण्याचे प्रभावी व वास्तववादी उपायही शोधता येतील. ही कारणे अशी – १. व्यक्तीवादी वर्चस्वाची भूक व देशांतर्गत अर्थकारणात आणि समाजकारणात आलेले मोठे अपयश (इस्राएलच्या नेत्यान्याहूंची देशांतर्गत असलेली छवी बरीच घाण आहे.) २. भूराजकीय प्रसरण (अखंड चीनची पूर्वापार घडवलेली धारणा ही चिन्यांच्या मानगुटीवर बसलेली असल्याने झी साहेबांना प्राचीन चीनचा विस्तार खुणावतोय. किंबहुना ते सर्व चिन्यांचे राष्ट्रवादी स्वप्न आहे.) ३. धार्मिक कट्टरतावाद, अंधश्रद्धा आणि त्यातून आलेला धार्मिक उन्माद (इसिसचे अतिरेकी सदस्य जिहादचा मूळ अर्थ लपवत इस्लामलाच एक प्रकारे वेठीस धरताहेत. यामुळे मुस्लीम कट्टरपंथियांना उत्तर म्हणून अन्य धर्मियांचा कट्टरतावाद आक्रमक होत चाललाय.) ४. अनेक भस्म्या भांडवलदार कार्पोरेट समूहांचा उद्योजकीय व म्हणून राजकीय उच्छाद (बहुतेक वर्चस्ववादी राष्ट्रप्रमुख हे आपापल्या लाडक्या उद्योगपतींना खनिजे, तेल व अन्य बाजार मिळावेत म्हणून छोट्या दुर्बळ देशांना वेठीस धरताहेत. पुतीनचा “युक्रेन पराक्रम” हे याचे स्पष्ट उदाहरण.) ५. श्रीमंत आणि गरीबांमधील वाढणारी भयावह आर्थिक दरी (पाकिस्तान व बलुचिस्तानमधील काही विशिष्ट सामाजिक घटक हे भ्रष्टाचाराच्या आणि राजकीय – सैनिकी जाळ्यांचा वापर करीत प्रचंड अमीर झालेत. येथील अनेक असंतोषी समूह उद्या स्वतःच्याच देशात संधी मिळताच अणूबॉम्बचा स्फोट करू शकतील.) ६. सांस्कृतिक वर्चस्व (सुन्नी सौदी अरेबिया आणि शिया इराण या दोन इस्लामी देशांच्या सत्ताधारी समूहांमध्ये सांस्कृतिक वरचढपणावरून खूप जुनी तेढ आहे. चीनने या दोघांत समेट घडवूनही सौदी अरेबियाने इस्राएल व अमेरिकेला पाठिंबा दर्शवला आहे.)(Dr. Jakhotia)
७. वैज्ञानिक वापराचा अतिरेक (आण्विक ऊर्जेपेक्षा आण्विक बॉम्बची मोठी निर्मिती करण्यात विज्ञानाचा विनाशकारी वापर झाल्याने संपूर्ण जग आज महास्फोटाच्या उंबरठ्यावर उभे आहे.) ८. आक्रमकांचं स्वार्थी स्थलांतर (प्राचीन व अर्वाचीन जागतिक इतिहासात आक्रमकांनी अनेक स्थानिक संस्कृतींना नामोहरम करीत व कृतघ्न होत आपल्या वसाहती उभारल्या. स्थानिकांच्या आजच्या पिढ्या हे वास्तव जाणून घेत बाह्य आक्रमकांविरुद्ध हिंसक विद्रोह करताहेत. आफ्रिकेतील विदेशी व्यापारी व वसाहतकारांविरुद्ध विद्रोहाचा मोठाच विस्फोट होतोय.) ९. नैसर्गिक आपत्ती (इराकची मेसापोटेमिया ही महान प्राचीन संस्कृती मुख्यत्वे नैसर्गिक आपत्तींमुळे लयास गेली. आज जागतिक तापमानातील वेगवान वाढीमुळे व समुद्रात टाकल्या जाणाऱ्या भरावांमुळे समुद्राची पातळी वाढते आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावरील अनेक शहरे येत्या पन्नास वर्षांत जलसमाधी घेतील.) १०. निरागस समाज आणि त्यांचे दुभंगलेले नेतृत्व (भारतात तब्बल अकरा कोटी आदिवासी आहेत जे एकी व सुजाण नेतृत्व नसल्याने राजकारणी, भ्रष्ट उद्योगपती, नोकरशहा, नक्सली गट इ.च्या प्रचंड शोषणाला बळी पडताहेत.) या कारणांचा आढावा घेताना जाणवते की ज्या आडव्या उत्तर भारतीय पट्ट्यात भारतातील बरीच पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत तेथे सामान्य माणुसकीचा मोठा र्हास झालेला आहे. एखाद्या वसाहतीचा किंवा समाजाचा विनाश म्हणजे त्याच्या सांस्कृतिक मुल्यांचा र्हास होय. चालतीबोलती माणसे तर दिसतात परंतु एक सशक्त व सुजाण समाज मात्र दिसत नाही. ग्रीकांची, गांधारची, रोमची, इजिप्तची, इराकची व चीनची संस्कृती जी अगदी अलिकडच्या काळात सुदृढ होती ती आज तशी दिसत नाही. नाशाचं वैशिष्ट्य असं की ते बऱ्याचदा शरीराला जिवंत ठेवतं परंतु त्यातील आत्मा गायब असतो.
जगाला संपूर्ण नाशापासून वाचविणाऱ्या उपायांची चर्चा करण्यापूर्वी एखाद्या अत्युत्तम गोष्टीचा “सार” किंवा “दर्जा” घसरण्याची सुरुवात कशी होते हे अगदीच सारांशाने पाहूयात. भारतीय अध्यात्मातील भावनिक उत्कटता आणि साधेपणा हा चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या कर्करोगामुळे झपाट्याने कमी होत गेला. भोलेनाथ शंकराला आपल्या भक्ताकडून कोणतीच अपेक्षा नसते. नंतर मात्र अध्यात्मातील अवडंबरे जसजशी वाढत गेली, तस तसे भारतीय अध्यात्मातील सार कमी होत गेले. भारतीय बहुजनही येथील उच्चभ्रूंच्या भोंगळपणालाच अध्यात्म समजत त्याचे अंधानुकरण करु लागले. याच चातुर्वर्ण्यव्यवस्थेतेने युरोपीय राजेशाही इथे आणली. त्यापूर्वी भारतीय उपखंडात जनतंत्र मानणारी गणराज्ये होती. या राजेशाहीने देशातील सारी संसाधने एका छोट्या त्रिकुटाच्या नियंत्रणाखाली आणली. जगभरात हाच प्रयत्न हल्ली वाढला आहे. इस्लाम मधील तत्वज्ञानात्मक घसरणही अशीच होत गेली. इस्लामचा ‘नमाज’ म्हणजे अगदी सोपी – साधी प्रार्थना जी कुठेही – केव्हाही करता येऊ शकते. मंदिर – मूर्तीची गरज नाही, किचकट पूजा नाही, दक्षिणा नाही, पुरोहिताचा वरचष्मा नाही, मंदिरातील प्रवेश – बंदीची भानगड नाही, लहान – मोठे अशी देवांची तुलना नाही आणि खर्चिक व वेळखाऊ असे स्थान – महात्म्य नाही. निराकार, दयाळू व सर्वश्रेष्ठ अल्लाहशी डायरेक्ट नाते जोडणारी ‘नमाज’ म्हणजे प्रार्थनेचा मनविभोर करणारा असा मनस्वी संवाद ! नंतर मात्र मुल्ला – मौलवींनी आपल्या धार्मिक वर्चस्वासाठी शरियाचा आधार घेत अनेक निर्बंध (विशेषतः स्रियांवर) लादले. या निर्बंधांमधूनच इस्लामच्या सोप्या गोष्टी क्लिष्ट होत गेल्या. येशूच्या शिकवणीतही नंतर अनेक चमत्कार घुसविले गेले. कॅथलिक संप्रदायात अनेक अंधश्रद्धांचा शिरकाव झाल्याने सुधारणावादी अशा प्रोटेस्टंट पंथाचा उगम झाला. ‘महायान’ या बौद्ध धम्माच्या विदेशी रचनेत असेच काही चमत्कार घुसले नि तथागतास अभिप्रेत असणारा विवेक कमी झाला. थोडक्यात असे की सर्व धर्मांची निर्मिती ही मानवांनी (पुरुषांनी) केलेली असल्याने मानवांचे गुणदोष त्या त्या धर्मात झिरपणे नैसर्गिकच होते. जसजसा दोषांचा प्रभाव वाढत गेला तसतशी धर्मांची क्षती गंभीर होत गेली. मूळ संस्कृतीमधूनच प्रत्येक धर्माची निर्मिती झाल्याने आज संस्कृतींच्या ढासळण्याने जग विनाशाकडे वाटचाल करीत आहे.
जगाला संपूर्ण नाशापासून वाचविण्याचा प्रारंभ होतो आमच्या अशा पक्क्या धारणेने की आपण सारे एकाच चैतन्याचा (Super Consciousness) भाग आहोत. वंश, वर्ग, वर्ण, जात, धर्म व राजकीय वाटण्या या माणसांनी आपापल्या सोयीसाठी किंवा वर्चस्वासाठी केलेल्या आहेत. जागतिक व्यापार व माहिती तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे जे तरुण पिढी उत्कटतेने अनुभवू लागली आहे. बहुतेक युवकांना आर्थिक समृद्धी व विविधांगी सांस्कृतिक आनंद हवा आहे. यास्तव त्यांना कट्टरपंथी जुनाट विचारांपेक्षा सर्वसमावेशक उदारमतवाद हवा आहे. दुर्दैवाने आज राष्ट्रवादाच्या आड काही मोजके वर्चस्ववादी हे युवकांना भरकटविण्याच्या कुटील खेळ्या खेळताहेत. प्रत्येक युवकाने असा विचार केला पाहिजे की “मी माझे परीघ मोठे कसे करू शकतो ?” इथे माझंच उदाहरण घेऊयात. मी मुंबईतल्या पार्ल्याचा महाराष्ट्रीयन माहेश्वरी हिंदू आहे. अधिक मोठ्या परीघानुसार मी भारतीय, आशियाई आहे. अंतीमतः मी एक “वैश्विक नागरिक”ही आहे. मोठे होण्याची ही माझी सर्वाधिक मोठी उपाधी. हां, आपली सूर्यमाला व अथांग अवकाशाचा मी विचार केलेला नाही.
विनाशापासून जगाला वाचविण्यासाठी मी दहा उपाय इथे असे सुचवतो
* आज धर्मापेक्षा जगाला एका परीपूर्ण नीतीशास्राची गरज आहे. व्यक्तीने कुटुंबासाठी, कुटुंबाने समाजासाठी, समाजाने देशासाठी व देशाने जगासाठी या चढत्या भाजणीत गरजेनुसार योग्य तो त्याग करावा. या त्यागाची संपूर्ण, सुयोग्य व वेळेवर भरपाई उतरत्या भाजणीने व्हावी.
* एक वैश्विक संविधान बनवावे ज्याचा आधारस्तंभ ही चार मूल्ये असावीत – आर्थिक सुबत्ता व समाधान, बौद्धिक महत्ता व नम्रता, सामाजिक किंवा मानवीय समता व प्रगल्भता आणि एकमेकांच्या संस्कृतींचा आनंद व आदर
* मनुष्य, संसाधने, ज्ञान इ. चे गरजेनुसार स्थलांतर व वाटप. यातून श्रीमंत – गरीब अशी दरी मिटविण्याचे प्रामाणिक व पुरेसे प्रयत्न
* शोषक कार्पोरेट्स ऐवजी सहकारावर भर आणि सर्वत्र जनतंत्र
* वैश्विक नियमन संघटना ( कुणाकडेही व्हेटो पॉवर नाही.) यांत पुढाऱ्यांपेक्षा सुजाणांचे प्रतिनिधी असावेत.
* सर्व घातक अण्वस्त्रे नष्ट करणे
* विवेक व विज्ञानाचे प्रयोजन, नियोजन आणि आयोजन
* पृथ्वीच्या प्रत्येक दृश्य – अदृश्य घटकाचे संरक्षण व संवर्धन
* दुर्बळांच्या पोषणासाठी विशेष प्रयत्न आणि
* उद्याचे जग सातत्याने आनंदी राहण्यासाठी युवक आणि स्रियांच्या प्रत्येक सहभागावर भर.
माझी ही संकल्पना आदर्शवादी वाटू शकते, परंतु तिला अधिक चांगले पर्याय मला तरी आज दिसत नाहीत. माझे पहिले पाऊल म्हणून “वैश्विक नीतीशास्रा”च्या एकूण रचनेचा मी विचार चालू केलाय. जगाला विनाशापासून वाचविण्याचे आमचे मोठे व कठीण उत्तरदायित्व हे आमच्या उद्याच्या पिढ्यांसाठी आहे !

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर