Congress Tiranga Yatra : काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा पहेलगाम हल्ल्यावर बोला

Congress Tiranga Yatra

कोल्हापूर : प्रतिनिधी : दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करून विषयांतर करण्यापेक्षा मूळ विषयावर बोलावे, असे आव्हान काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी (२४ मे) तिरंगा यात्रा काढली. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. (Congress Tiranga Yatra)

आमदार सतेज पाटील यांनी यावेळी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. दहशतवाद मोडून काढण्यासाठी सैन्यदल जे पाऊल उचलेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल. त्यामुळे सैन्य दलाच्या सन्मानार्थ काँग्रेसकडून आम्ही तिरंगा यात्रा काढत असल्याचे त्यांनी सांगितले. पहेलगाम हल्ल्यानंतर, भाजपकडून सातत्याने काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे. यावर बोलतांना त्यांनी जे सत्य आहे ते जनतेसमोर आले पाहिजे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही प्रश्न संसदेत उपस्थित केले. या विषयावर विशेष अधिवेशन बोलवण्याची काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. यावर भाजपने बोलले पाहिजे. (Congress Tiranga Yatra)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेसवर होत असलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी, काँग्रेसवर टीका करून पहेलगाम हल्ल्याचा विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा त्यांनी मूळ विषयावर बोलावे, असा टोलाही फडणवीस यांना लगावला.

गांधी परिवाराचे देशासाठी बलिदान

काँग्रेस म्हणून सैन्य दलाला पाठबळ देणे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणे ही काँग्रेसची भूमिका असल्याचेही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. देशाच्या पंतप्रधानांनी शस्त्रसंधी जाहीर करणे गरजेचे असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत-पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी जाहीर करतात. हे दुर्दैव आहे. जनतेसमोर ही सर्व माहिती आली पाहिजे. या मुद्द्यावर लोकसभेतही चर्चा झाली पाहिजे. शस्त्रसंधीबाबत जे निर्णय घेण्यात आले ते उघडपणे सांगितले पाहिजेत. पहेलगाम हल्ल्याचे राजकारण करून भाजपकडून गांधी परिवारावर होत असलेली टीका दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले. गांधी परिवाराचे देशासाठीचे बलिदान संपूर्ण जनतेला माहिती आहे. ते पुसून टाकण्यासाठी भाजपकडून सातत्याने परिवार आणि काँग्रेसवर टीका होत आहे. मात्र देशातील जनता सुज्ञ आहे. खरे काय आणि खोटे काय हे जनतेला माहीत आहे, असेही त्यांनी सांगितले. (Congress Tiranga Yatra)

देशाच्या सैनिकांनी जीवाची बाजी लावून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र भाजपचे काही मंत्री सैनिकांविषयी आक्षेपार्ह विधान करत आहेत. भाजपचे मंत्री विजय शहा यांचे विधान पाहता, भाजपने त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणे अपेक्षित होते, असेही त्यांनी सांगितले.

पहेलगाम हल्ल्याचे भाजपकडून राजकारण

भाजपकडून पहेलगाम हल्ल्याचे राजकारण होत असल्याबाबत खासदार शाहू महाराज यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. दहशतवादी हल्ल्यामागील सर्व सत्य बाहेर आले पाहिजे. संसदेचे विशेष अधिवेशनाची मागणी काँग्रेसने केली आहे. मात्र त्याला अद्यापही तारीख मिळाली नसल्याचे ते म्हणाले. या तिरंगा यात्रेवेळी, माजी सैनिकांचाही मोठा सन्मान राखण्यात आला. यात्रेच्या सुरुवातीला माजी सैनिक होते. यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाच्या झेंड्याऐवजी, काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने हातात तिरंगा घेतला होता. ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत यावेळी एक प्रकारे सैनिकांचेही मनोधैर्य वाढवण्याचे काम करण्यात आले.

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून एके-४७ मधून फायरिंग