मुंबई : विशेष प्रतिनिधी : ऑपरेशन सिंदूरविषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना दहशतवादी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख त्यांनी केला नाही. वाजपेयी सरकार असताना संसदेवर हल्ला झाला. त्यावर ते गप्प का, असा सवाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. (congress attacks shah)
अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला आणि कंदहार विमान अपहरण प्रकरणी तर मंत्री जसवंत सिंह हे सुरक्षेसह पाच कुख्यात दहशतवाद्यांना कंदहारला सोडून आले. पाकिस्तानी आयएसआयला पठाणकोटला बोलावण्याचे पापही भाजपा सरकारनेच केले. खरे पाहत देशाशी गद्दारी करण्याचे काम भाजपा सरकारनेच केले आहे, असा हल्लाबोल लोंढे यांनी केला.
अमित शहा यांनी संसदेत केलेल्या निवेदनाची चिरफाड करताना लोंढे म्हणाले की, शहा यांनी काँग्रेस सरकारवर खोटे आरोप केले, काँग्रेस सरकार असताना अतिरेक्यांचे मृतदेह परत दिलेले नाहीत. अफजल गुरु आणि कसाबला फाशी दिली आणि जेलमध्येच गाडले. या उलट १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला २०१५ साली फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह मेमनच्या कुटुंबीयांना देण्यात आला, याची माहिती शहा यांनी घ्यावी. हुर्रियत कॉन्फरन्सबरोबर वाजपेयी सरकारनेच सर्वांत जास्त चर्चा केली आहे पण अमित शहा मात्र काँग्रेसवर आरोप करत आहेत.
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म पाकिस्तानचा. ते १० वर्षे पंतप्रधानपदी होते पण ते कधीही पाकिस्तानला गेले नाहीत पण नरेंद्र मोदी आमंत्रण नसताना पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफ यांची बिर्याणी खाऊन आले. मोदींनी शपथविधीलाही नवाज शरिफ यांना आमंत्रण दिले होते, याची आठवण लोंढे यांनी करून दिली.
शहा यांची हिम्मत नाही
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तान फक्त पुढे होता, खरा सूत्रधार तर चीन होता, तोच सर्व करत होता असे लष्कराचे उपप्रमुख राहुल के. सिंग यांनी सांगितले आहे. पण अमित शहा यांनी चीनचे नाव घेण्याची हिम्मत दाखवली नाही. संयुक्त राष्ट्राच्या मुद्द्यावर बोलतानाही अमित शहा खोटे बोलले. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना ही १९४५ साली झाली व अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन व रशिया हे त्याचे सदस्य होते, त्यावेळी भारत स्वतंत्र झालेला नव्हता याकडेही अतुल लोंढे यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा :
सगळे सांगता, पण पहलगाम घडले कसे ते का सांगत नाही? : प्रियंकांचा सवाल
काँग्रेसलाही नसेल तेवढी तुम्हाला नेहरूंची आठवण येते : कनिमोळी यांचा शहांवर हल्ला