मुंबई : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी आंदोलक कार्यकर्त्यांसह मुंबईकडे कूच केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. (CM on Reservation)
महाराष्ट्र शासन मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. कुणावर अन्याय करुन कुणाला आरक्षण देण्याचा प्रश्न नाही, दोघांचेही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावे की आम्ही त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाचे सगळे प्रश्न आम्हीच सोडवले आहेत. इतर कुणी सोडवलेत ते सांगावे? मी मुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना प्रश्न सुटले आणि आम्हीच सोडवणार आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आश्वस्त केले आहे. (CM on Reservation)
सरकारने तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करावी : सपकाळ
दरम्यान, सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण ते करत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजधर्माचे पालन करीत तातडीने घोषणा करावी आणि दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील समाजासह मुंबईत पोहचत असताना सरकारने या आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. आता केवळ एक दिवसाची परवानगी दिली ती हास्यास्पद आहे. तीन महिन्याआधी आंदोलनाची घोषणा केली होती तर सरकार एवढे दिवस काय झोपा काढत होते का? (CM on Reservation)
काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. महाराष्ट्र विधिमंडळात भाजपा युती सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा ठराव पास केला त्याला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. सत्तेत येताच ७ दिवसात मराठा आरक्षण देतो, अशी भीमगर्जना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याचे काय झाले? धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले होते, त्याचे काय झाले?, असा सवाल सपकाळ यांनी केला.
‘सागर’ बंगल्यावर मंथन करून अमृत पिऊन विष मात्र समाजावर व विरोधी पक्षावर टाकण्याचे पाप फडणवीस व भाजपा करत आहे. असा आरोप करून ते म्हणाले की, फोडा व राज्य करा या इंग्रजी नीतीप्रमाणे भाजपा व फडणवीस काम करत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन गुलाल उधळला होता, त्याचे काय झाले? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली पाहिजेत. आज जे तीन पक्ष सत्तेत आहेत तेच त्यावेळीही सत्तेत होते. आरक्षणावर जातनिहाय जनगणना हा रामबाण उपाय आहे हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले असून त्यासाठी त्यांचा आग्रहही आहे. काँग्रेसशासित तेलंगणा व कर्नाटकात जातनिहाय जनगणना केलेली आहे. भाजपने जातनिहाय जनगणना करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशीही मागणी त्यांनी केली.