बेळगाव : प्रतिनिधी : ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही’ अशा घोषणा देऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या हजारो मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याचा पुन्हा एकदा निर्धार व्यक्त केला. भाषावार प्रांतरचना करताना मराठी भाषिक बहुसंख्येने असूनही बेळगावसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला. तेव्हापासून सीमाभागातील मराठी भाषिक कर्नाटकच्या राज्योत्सव दिनी काळा दिन पाळून आपला निषेध व्यक्त करून महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्त करतात. (Black Day in Belgaum)
पोलीस प्रशासनाने निषेध फेरीला परवानगी दिली नसताना देखील मराठी भाषिकांनी दडपशाहीला न जुमानता कर्नाटकच्या राज्योत्सव दिनी काळा दिन पाळून आपल्या अस्मितेचे दर्शन घडवले.काळ्या दिनाच्या फेरीत घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी अक्षरशः उचलून पोलीस वाहनात घातले.
धर्मवीर संभाजी उद्यान येथून काळ्या दिनाच्या फेरीला प्रारंभ झाला. दंडाला काळ्या फिती बांधून, काळे ध्वज घेऊन हजारो मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले होते. फेरीत महिला आघाडीच्या महिला आघाडीवर होत्या. यावर्षीच्या काळ्या दिनाच्या फेरीत मराठी भाषिकांची पाचवी पिढी सहभागी झालेली पाहायला मिळाली. शहरातील विविध भागात फिरून फेरीची सांगता गोवावेस येथील मराठा मंदिर येथे झाली. फेरीची सांगता झाल्यावर झालेल्या सभेत न्यायाच्या लढाईत आपल्याला निश्चित यश मिळणार अशी आशा सभेत मार्गदर्शन करताना समिती नेत्यांनी व्यक्त केली. माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उप महापौर रेणू किल्लेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्यासह हजारो मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले होते.परवानगी नसताना फेरी काढल्याबद्दल समिती नेत्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलीस आयुक्तानी सांगितले. (Black Day in Belgaum)
कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांना रोखले
बेळगावात काळा दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी होण्यासाठी निघालेल्या खासदार धैर्यशिल माने, शिवसेनेचे उप नेते संजय पवार, विजय देवणे यांना कोगनोळी नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी अडवले. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. (Black Day in Belgaum)