पुणे : प्रतिनिधी : वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मूत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित हागवणे पिता पुत्रांना बावधन पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेले राजेंद्र हगवणे हे वैष्णवीचे सासरे असून सुशील हा त्यांचा दीर आहे. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबून खून आणि शरीरावर मारहाणीच्या १९ जखमा असल्याने हगवणे कुटुंबांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Bavdhan police arrested)
वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी पती, दीर, सासरे, सासू आणि नणंदेच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी पोलिसांनी वैष्णवीची सासू लता, नणंद करिश्मा आणि पती शशांक अटक केली आहे. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. पण गेले सात दिवस या गुन्ह्यातील मुख्य संशयित राजेंद्र आणि सुशील हे फरारी होते. राजेंद्र हगवणे हे मुळशी तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष होते. तसेच हगवणे कुटुंबांचे नातेवाईक वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याने त्यांना अटक होत नसल्याचा आरोपी विरोधी पक्षाकडून होत होता. राज्यातील हुंडा प्रथा आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असल्याने सरकारवरही दबाव आला होता.
हगवणे पिता पुत्राच्या अटकेसाठी पोलिसांची तीन पथके कार्यरत होती. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या पथकांमध्ये आणखीन वाढ करण्यात आली होती. दरम्यान बावधन पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता राजेंद्र आणि सुशील हगवणेंना अटक केली. आज शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे. फरार काळात दोघांना कोणी आश्रय दिला याचा तपास पोलिस करत आहेत. (Bavdhan police arrested)
संशयितांना व्हीआयपी वागणूक
संशयितांना यापूर्वी व्हीआयपी वागणूक मिळाली होती असा आरोप वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे. माध्यमांनी हे प्रकरण उजेडात आणले. संशयितांना मकोका कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा, अशी मागणी केली आहे.
हगवणे पिता पुत्रांचा मटणावर ताव
हगवणे पिता पुत्रांचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. राजेंद्र आणि सुशील एका हॉटेलमध्ये थार गाडीतून आले. दोघे मटणाच्या जेवणांवर ताव मारत आहेत. त्यानंतर ते तिथून ते निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये चित्रण आहे. अटकेपूर्वी गेले सात दिवस त्यांना कोणी आश्रय दिला होता याचा पोलिस शोध घेत आहेत.
निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल
वैष्णवी हगवणेचे वडील आणि कुटुंबिय तिच्या बाळाला नेण्यासाठी गेले. पण राजेंद्र हगवणे यांच्याशी संबधित निलेश चव्हाण याने बंदूक दाखवून धमकी दिली. त्यामुळे मुलाला न घेताच परतले. अखेर या प्रकरणात निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Bavdhan police arrested)
दोषींवर कारवाईच होणारच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार हे दोघे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. उजळाईवाडी विमानतळावर वैष्णवी हगवणेच्या मृत्यू संदर्भात हगवणे पिता पुत्राच्या अटकेसंदर्भात त्यांनी माहिती दिली. या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार असे स्पष्ट केले. या गुन्ह्यात कोणाला सोडणार नाही असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिला आहे.