मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर ऑनलाईन ‘जंगली रमी’ गेम खेळत असल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावरून सर्वसामान्यांतून तीव्र प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. नेटकऱ्यांनीही मंत्री कोकाटे यांना ट्रोल केले आहे. (Awhad criticizes Kokate)
या व्हिडीओवरून राजकारणही पेटले आहे. राष्ट्रवादी शरद्चंद्र पवार गटाचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते आ. डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच सरचिटणीस आ. रोहीत पवार यांनीही कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी खुलासेवजा उत्तर दिले आहे. ‘मोबाईल आलेली जंगली रमीची जाहीरात मी स्कीप करत होतो,’ असे त्यांनी म्हटले आहे. कोकाटे यांच्या खुलाशानंतर मंत्री कोकाटे हेच रमी खेळत होते, अजून किती व्हिडीओ देऊ, असे आव्हान डॉ. आव्हाड यांनी दिले आणि तसा व्हिडीओही सोमवारी (२१ जुलै) पोस्ट केला आहे. त्यामुळे मंत्री कोकाटे यांची पंचाईत झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. (Awhad criticizes Kokate)
आव्हाडांची पोस्ट…
जितेंद्र आव्हाड ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हणतात, ‘‘एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नोत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. (Awhad criticizes Kokate)
आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा… कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो.
महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय…!’’
टीका आणि प्रत्युत्तर
रमी प्रकरणानंतर मंत्री कोकाटे यांच्यावर जोरदार टीका होत आहे. विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सत्ताधारी मंत्री, आमदारांच्या वर्तनामुळे राज्याची मान शरमेने खाली गेली आहे. मात्र त्यांना जरासुद्धा लाज वाटत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केली. अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना ४ मंत्र्याना डच्चू देण्यास सांगितले आहे. त्यामध्ये कोकाटे यांचाही समावेश असल्याची माझी माहिती आहे, असा दावा केला आहे. त्यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, माजी राज्यमंत्री बच्चू कडू,आदींनी कोकाटेंवर टीका करत मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. (Awhad criticizes Kokate)
कोकाटे यांच्या या कृत्याबद्दल सत्ताधारी भाजपाचे जेष्ठ आमदार सुधीर मुनगटीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचे समर्थन केले आहे. अमीर खान, शाहरुख खान जर ते खेळत असतील तर त्यात वावगे काय आहे?, असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केला, तर कोकाटे हे जबाबदार मंत्री आहेत. त्यांनी व्हायरल व्हिडीओवर स्वतः खुलासा केला आहे. त्यांना काही सूचना द्यायच्या असतील तर त्या देईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
माणिकराव कोकाटे यांनी रमी खेळत नसल्याचा खुलासा केला. अचानक ती पॉप अप झाली वगैरे सांगितले आहे पण त्यांनी तसं सांगितलं असलं तरीही जे घडलं आहे ते आम्हाला भूषणावह नाही, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मला वाटतं की ही बाब अतिशय चुकीची आहे. विधानभवनात आपलं कामकाज नसलं तरीही, आपण त्या ठिकाणी गांभीर्याने बसणं आवश्यक आहे, असे ते म्हणाले.