Attack on Pravin Gayakwad : संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याने संतापाची लाट

Attack on Pravin Gayakwad

मुंबई : प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासल्याने संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा राज्यातील विरोधी पक्षांसह, सामाजिक संघटना, मराठा समाज, बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे. (Attack on Pravin Gayakwad)

प्रविण गायकवाड हे अक्कलकोट यथील फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातील सत्कार समारंभासाठी रविवारी (१३ जुलै) गेले होते. संभाजी ब्रिगेडचे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड करावे, या मागणीसाठी त्यांच्या तोंडाला काळे फासले असल्याचा दावा शिवधर्म फाउंडेशनने केला आहे. या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष दीपक काटे हा भारतीय जनता युवा मोर्चाचा राज्य सचिव असल्याची माहिती सोशल मीडियावरुन पुढे आली आहे. प्रविण गायकवाड यांनीही काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे.

या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना प्रविण गायकवाड म्हणाले, या आधीच छत्रपती संभाजी ब्रिगेड यांचे नाव देण्यात यावे असा अर्ज धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आला आहे. पण हे केवळ छत्रपती संभाजी महाराजांचे नाव संस्थेला द्यावे, या पुरताच हा प्रकार मर्यादित नाही. “तुम्हाला हे माहिती आहे की हे सरकार कुणाचे आहे. हा एक विचार संपवण्याचा प्रयत्न आहे. पण विचार कधी संपत नसतात. ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्याविषयी मला मनात काही राग नाही. त्यांना या गोष्टीचा कधी ना कधी पश्चाताप होईल.” (Attack on Pravin Gayakwad)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.  या घटनेबद्दल खासदार संजय राऊत म्हणाले, प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. शिवरायांच्या मुलुखात हे काय सुरू आहे? भाजपाने पेरलेल्या विषाला उकळी फुटली आहे! महाराष्ट्र अराजकाच्या कड्यावर उभा आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आहे. अशा रितीने जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रकार केला जात आहे.  यामागे कोणती डोकी आहेत? हे आपल्याला माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनेचा निषेध करताना, पुरोगामी संघटनांनी आता बोलायचेच नाही, त्यांच्या नेत्यांनी विरोधाचा आवाज काढायचाच नाही, यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे. पण प्रवीण दादा आणि त्यांच्यासारखे लाखो पुरोगामी अनुयायी अशा भ्याड हल्ल्याने गप्प बसणार नाहीत. आम्ही प्रवीणदादांच्या सोबत आहेत. त्यांच्यावरील हल्ल्याचा पुन्हा एकदा तीव्र निषेध, असे आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही  प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून निषेध व्यक्त करतो असे म्हटंले आहे.  प्रशांत कोरटकरवेळी हे हल्लेखोर कुठे होते? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

बहुजन चळवळीतील कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत आहे असा थेट आरोप शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आला आहे. सरकारने तातडीने आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असताना सोलापूर पोलीस काय करत होते? असा सवाल त्यांनी केला आहे.

संभाजी ब्रिगेडकडून निवेदन

संभाजी ब्रिगेडने याप्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे, “संभाजी ब्रिगेड संघटना २८ वर्षांपासून कार्यरत आहे. संघटनेच्या नावातून कोणत्याही प्रकारे एकेरी उल्लेख होत नाही. महापुरुषांचे नाव संघटनेला, पक्षाला, शहराला, गावाला दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्या भ्याड व्यक्तीने हा हल्ला केला त्या व्यक्तीच्या संघटनेचे नाव ‘शिव धर्म फाउंडेशन’ असे आहे, मग हे नाव एकेरी आहे की आदरार्थी हा प्रश्न त्या भ्याड हल्लेखोराने आधी स्वतःला का विचारला नाही?”

“विरोधी विचारसरणीच्या संघटनेचे नाव काय असावे हे ठरवायचा अधिकार यांना कुणी दिला? यामागे भाजपचे वेगळेच राजकारण शिजत आहे का, हा प्रश्न आहे. दीपक काटे हा गुंड भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय आहे,” असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.  (Attack on Pravin Gayakwad)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर