नवी दिल्ली : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताच्या प्राथमिक तपास आला आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या तीन सेकंदात विमानाला इंधनपुरवठा करणारा स्वीच ऑफ झाला. त्यामुळे दोन्ही इंजिन्स बंद पडली आणि विमान कोसळले, असे त्यात म्हटले आहे. (Plane crash report)
उड्डाणानंतर या विमानातील एक पायलट दुसऱ्याला, इंधनाचा स्वीच ऑफ का केलास असे विचारतो. मात्र मी तसे काही केले नाही, असे उत्तर दुसरा पायलट देतो, हे संभाषणही कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगवर नोंदवण्यात आले आहे.
अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालानुसार, गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे इंधन नियंत्रण स्विच विमान हवेत उडल्यानंतर तीन सेकंदांनी कट ऑफ स्थितीत गेले. नंतर इंजिन थ्रस्टमध्ये घट झाली आणि दोन्ही इंजिन्स बंद पडली. त्याची परिणती बोईंग ७८७-८ विमान कोसळण्यात झाली. या अपघातात किमान २६० जणांचा मृत्यू झाला, असे अहवालात म्हटले आहे. (Plane crash report)
शुक्रवारी रात्री उशिरा विमान अपघात तपास ब्युरोने सादर केलेल्या अहवालानुसार, दोन्ही इंजिनांचे इंधन कट ऑफ स्विच ०१ सेकंदाच्या वेळेच्या अंतराने एकामागून एक रनवरून कट ऑफ स्थितीत बदलले गेले. विमानाने उड्डाण केल्यानंतर अगदी तीन सेकंदांनी दुपारी १:३८:४२ वाजता ही घटना घडली. (Plane crash report)
तीस सेकंदांनंतर, एका वैमानिकाने आपत्कालीन परिस्थितीची जाणीव करून देणारा ‘‘मेडे मेडे मेडे’’ सिग्नल दिला. हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्याने उड्डाण ओळखण्यासाठी कॉल साइनबद्दल चौकशी केली, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तथापि, काही सेकंदांनंतर, त्यांना दुपारी १:३९ वाजता विमानतळाच्या सीमेबाहेर विमान कोसळताना दिसले.