Attack on Election Commission corruption : निवडणूक आयोगाच्या करप्शनवर महाराष्ट्रातून महाहल्ला

Attack on Election Commission corruption

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे पुरावे सादर करून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात  उभे केल्यानंतर आता त्याच प्रकाशात महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मतदार याद्यांमध्ये सुधारणा केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. आता निवडणूक कुणासोबत नव्हे, तर कधी आणि कशी होणार, याचीच उत्कंठा असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्याचीच उत्कंठा आहे...

विजय चोरमारे

विधानसभा निवडणुकीनंतर जुलै महिन्यापर्यंत मतदारयाद्या अद्ययावत करण्यात आल्या. याद्यांमध्ये समाविष्ट झालेल्या किंवा वगळलेल्या नावांची यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. मतदारयादीबाबत एवढी गुप्तता का, असा सवाल महाविकास आघाडी आण मनसेच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला केला. राजकीय पक्षांच्या संयुक्त शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन याबाबत चर्चा केली. (Attack on Election Commission corruption)

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. राज्यात दोन निवडणूक यंत्रणा काम करतात. एक असते ती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येणारी यंत्रणा. त्याचे राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी आहेत एस. चोक्कलिंगम. आणि दुसरा राज्य निवडणूक आयोग. त्याचे राज्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे. शिष्टमंडळाने काल चोक्कलिंगम यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्याच्या आयोगाकडे येतात, असे सांगितले. आणि राज्याच्या आयोगाने मतदार याद्यांचे काम केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आज शिष्टमंडळाने चोक्कलिंगम आणि वाघमारे यांच्यासोबत एकत्रित बैठक घेऊन आपले म्हणणे मांडले. त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद घेण्यात आली. (Attack on Election Commission corruption)

या शिष्टमंडळात समाविष्ट होण्यासाठी भारतीय जनता पक्षालाही निमंत्रण देण्यात आले होते, असे सांगण्यात आले. कारण हा विरोधकांचा नव्हे, तर सर्वच राजकीय पक्षांसाठीचा विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एक वेगळा मुद्दा मांडला. आमचे आक्षेप निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत, यासंदर्भात आम्हाला निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण हवे आहे. भाजपच्या नेत्यांकडून किंवा प्रवक्त्यांकडून स्पष्टीकरण अपेक्षित नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे विधानसभेतील नेते विजय वडेट्टीवार यांनी तर भाजपचे सोशल मीडियाचे काम करणाऱ्या देवांग दवे यांचा नामोल्लेख केला. देवांग दवे हेच निवडणूक आयोगाची वेबसाइट चालवत असून मतदार यादीतील नावे वगळण्याचे किंवा नवी नावे समाविष्ट करण्याचे काम भाजपशी संबंधित असलेला देवांग दवे करीत असल्याचा त्यांनी आरोप केला.

 हा मुद्दा कधी आला, तर काही संशयास्पद नावांची चर्चा मंगळवारी दुपारी माध्यमांमधून झाली. सायंकाळपर्यंत ही संशयास्पद नावे यादीतून गायब झाली. हे कोणी केले हे राज्यातील यंत्रणेला माहीतच नाही. निवडणूक आय़ोगाच्या वर कुणीतरी भलताच बिग बॉस काम करीत असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. (Attack on Election Commission corruption)

विरोधकांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे आहेतः

मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करा, त्याशिवाय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत.

विरोधकांनी महाराष्ट्रातल्या मतदार यादीमधल्या असंख्य चुका राज्यातल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दाखवल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तुमचे म्हणणे पाठवतो. दुरुस्त करण्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करू, अशे त्यांनी आश्वासन दिले आहे. मात्र त्यासाठी पुरेसा कालावधी देत नसल्याचा आक्षेप आहे.

मतदार यादीमध्ये अनेक पत्ते अपूर्ण आहेत. अनेक लोक दिलेल्या पत्त्यावर राहात नाहीत. एकेका घरात शंभरपासून आठशेपर्यंत लोक राहात असल्याची उदाहरणे आहेत. घर क्रमांकासमोर शून्य किंवा डॅश आहे. निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरचेच कुणीतरी चालवते. राज्य, केंद्रीय निवडणूक आयोगाची एकूण सिस्टिम बाहेरून कुणीतरी ऑपरेट करतेय, असं गंभीर आरोप करण्यात आले. राज्यातल्या विविध भागांमध्ये मतदारयादीतले काही घोळ प्रातिनिधिक स्वरुपात निदर्शनास आणण्यात आले आहेत. विधानसभेच्याच मतदारयाद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वापरणार असतील तर घोळ असाच सुरू राहील. त्यामुळे मतदार याद्या दुरुस्त करा. त्या पूर्ण तपासा. त्यातील दुबार नावे, बोगस मतदार काढून टाका, अशा मागण्याही करण्यात आल्या. आपण विधानसभेला वीस हजार मतदार बाहेरुन आणल्याचे एका सत्ताधारी आमदाराचे वक्तव्यही आयोगाच्या निदर्शनास आणण्यात आले…..

दोन्ही निवडणूक आयोगांच्या अधिकाऱ्यांना भेटून आमचं समाधान झालेलं नाही. सध्याच्या घोळासह निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही. निकोप निवडणूक हा लोकशाहीचा पाया आहे आणि तोच उद्ध्वस्त केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

राज ठाकरे यानी मतदारयादीतले अनेक घोळ निदर्शनास आणून दिले. निवडणूक आयोग राजकीय पक्षांन मतदार याद्या दाखवत नसेल तर तिथे निश्चित घोळ असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. या मतदारयाद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. पाच वर्षे जर अशीच गेली असली तर याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तरी फार फरक पडत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. निवडणुका कुणासोबत होतात यापेक्षा त्या कधी आणि कशा घेतात हे महत्त्वाचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोग आमच्या मागण्यांवर काय निर्णय़ घेतो त्यावर आम्ही पुढची पावले टाकू, असे ते म्हणाले.

मतदार याद्यांमधील घोळाचा विषय गेल्या विधानसभेपासून असल्याचे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, २०२४च्या  विधानसभा निवडणुकीच्या आधी १९ ऑक्टोबरला मविआकडून आयोगाला एक पत्र दिले होते. काही भाजपचे कार्यकर्ते मतदारयादीशी छेडछाड करीत असल्याचे निदर्शनास आणले होते. राज्य आयोगाला पत्र नेऊन दिले होते आणि केंद्रीय आयोगालाही पाठवले होते. त्याची दखल घेतली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या निकालात घोळ झाले.

उद्धव ठाकरे यांनी राज्यातले निवडणूक आयुक्त आणि अधिकारी हे कठपुतळी असल्याचा आरोप केला. त्यांच्याकडे कुठलेही अधिकार नाहीत. निवडणुका निष्पक्ष घेणे शक्य नसेल तर इलेक्शनऐवजी सिलेक्शन करा, असेही ते म्हणाले.

निवडणूक आय़ोग सुप्रीम कोर्टाचा दाखला देतोय. परंतु सदोष निवडणुका घ्या, असे सुप्रीम कोर्ट म्हणत नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले. सत्ताधा-यांच्या सत्ताप्राप्तीच्या चोरवाटा मतदार यादीतून जातात. आम्ही त्या चोरवाटा अडवल्या असल्याचे ते म्हणाले.

मतदार याद्यांमध्ये घोळ करणारी यंत्रणा कार्यरत आहे.त्यांनी मतदार यादीवर लाल आणि हिरव्या शाईने खुणा केल्या होत्या. लाल खुणा केलेली नावे वगळण्यात आली. आम्ही तक्रार करूनही निवडणूक आयोगाने दखल घेतली नव्हती.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेकापक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी विरोधकांची एकजूट यानिमित्ताने पाहायला मिळाली.

निवडणूक आयोगाची यंत्रणा भाजपकडून हाताळली जात असल्याचे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे. त्याचमुळे भाजपच्या सोयीची यंत्रणा उभी केली जाते. याबाबत राज ठाकरे जे म्हणाले, ते खूप महत्त्वाचे आहे. निवडणुका वर्षानुवर्षे होताहेत. मग हे सगळे घोळ आताच का घातले जात आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. निवडणूक आयोग हा भाजपच्या हातातले बाहुले बनले असल्याचा आरोप यानिमित्ताने सर्वच विरोधी पक्षांनी केला.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर