Arun Gawli granted bail : सर्वोच्च न्यायालयाकडून गँगस्टर अरुण गवळीला जामीन

Arun Gawli granted bail

मुंबई : प्रतिनिधी :  शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्याची सुटका होणार आहे.  गवळीला १८  वर्षांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. (Arun Gawli granted bail)

शिवसेना नगरसेवक जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी याला हत्या, हत्येचा कट रचणे या आरोपांखाली मोक्कांतर्गत २००८ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ मध्ये मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावत १४ लाखांचा  दंड ठोठावला होता.  विशेष  न्यायालयाच्या निकालाला अरुण गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. (Arun Gawli granted bail)

अरुण गवळीने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.  यांच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एमएम संद्रेश आणि न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठात पार पडली. यावेळी अरुण गवळीची बाजू अ‍ॅड. हडकर आणि अ‍ॅड. मीर नगमन अली यांनी मांडली. त्यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, अरुण गवळी यांच्यावरील नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाशी विसंगत आणि अन्यायकारक आहे. तसेच, त्यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. तर सरकारी वकिलांनी अरुण गवळी यांच्या वकिलांच्या युक्तीवादाला जोरदार विरोध केला. परंतु दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अरुण गवळीला सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणी अंतिम सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये निश्चित करण्यात आली आहे. गवळीला ट्रायल कोर्टाने घालून दिलेल्या अटी-शर्तींवर आधारित जामीन देण्यात आला आहे. (Arun Gawli granted bail)

शिवसेनेचे नगरसेवक जामसंडेकर यांचे सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीबरोबर प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या हस्तकांमार्फत जामसंडेकर यांची सुपारी दिली होती. गँगस्टर अरुण गवळीने प्रताप गोडसेकडे ही सुपारी सोपवली. या प्रकरणी नाव न येण्यासाठी नवे शूटर्स शोधण्यात आले. गोडसेने या कामगिरीसाठी श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली होती. यासाठी दोघांनाही प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे निश्चित करून प्रत्येकी २० हजार रुपयांचे अ‍ॅडव्हान्स सुद्धा देण्यात आले होते. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वाल सोबत जवळपास १५ दिवस जामसंडेवर पाळत ठेवली. त्यानंतर २ मार्च २००७  रोजी जामसंडेकर यांची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या