कोल्हापूर : प्रतिनिधी : भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ५ एप्रिल ते बुधवार ८ एप्रिल या कालावधीत सांगली येथे कृष्णा नदीमध्ये या स्पर्धा होतील. महाराष्ट्रात प्रथमच या स्पर्धा आयोजित केल्या जात असून त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सांगली येथील कै. वसंतदादा पाटील स्मृती स्मारक कृष्णा नदी घाट येथील रॉयल बोट क्लब येथे स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत देशभरातील ४० विद्यापीठांमधून ६८५ पुरुष व महिला खेळाडू सहभागी होतील. खेळाडू प्रशिक्षक व पंच यांची निवास व्यवस्था मिशन हॉस्पिटल मिरज येथील विद्यार्थी विद्यार्थिनी वसतीगृहामध्ये केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंचांची निवास व्यवस्था मिशन हॉस्पिटलच्या गेस्ट हाऊस येथे करण्यात आली आहे. (All India Inter-University Canoeing and Kayaking Competition)
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील नौकानयनातील उदयोन्मुख खेळाडू व क्रीडाप्रेमी यांना सदर स्पर्धा पाहण्याची मोठी संधी प्राप्त झाली असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागाचा अनुभव व वातावरण निर्मितीच्या दृष्टीने विद्यापीठाच्या वतीने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (All India Inter-University Canoeing and Kayaking Competition)
यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी सांगितले की, स्पर्धेचे उद्घाटन रविवारी ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सांगली येथील कै. वसंतदादा पाटील स्मारक कृष्णा नदी घाट येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सांगलीचे जिल्हाधिकारी मैनक घोष, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव कुलसचिव डॉ. विलास शिंदे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी आणि स्पर्धा निरीक्षक यांचीही यावेळी उपस्थिती असेल.
प्रत्यक्ष स्पर्धा ५ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता सुरू होतील. स्पर्धेत कयाकिंग मध्ये के वन, के टू, के फोर तसेच कनोईंग मध्ये सी वन, सी टू असे २०० मी. ५०० मी. व १००० मी. या जलक्रीडा प्रकारात स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ८ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता होणार असून यामध्ये यशस्वी खेळाडूंना मेडल व सांघिक विजेता, उपविजेता व तृतीय क्रमांक यांना चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. विलास शिंदे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉ. कबीर खराडे, उपकुलसचिव विलास सोयम उपस्थित होते. (All India Inter-University Canoeing and Kayaking Competition)