मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा असून राज्यातले सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे शेतकऱ्यांना मदत करणे सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार ती पार पाडेल. पण शेतकऱ्यांआडून राजकारण करू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सुनावले. (Ajit pawar slams opponants)
शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालू नये, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यास सरकार तयार नसल्याने विरोधकानी सरकारचा निषेध करीत सभात्याग केला. त्याबाबत अजित पवार म्हणाले की, विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. सरकार चर्चेपासून पळ काढणार नाही, विरोधी पक्षांना त्यांच्या उद्याच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणतीही अडचण असो, सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे आणि राहणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्याने आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही, असे अजित पवार म्हणाले.